एम्‌. जी. के. मेनन.मेनन, माम्‌बिलिकाल्‌थिल गोविंद कुमार: (२८ ऑक्टोबर १९२८– ). भारतीय भौतिकविज्ञ. त्यांनी प्रामुख्याने ⇨ विश्वकिरण व ⇨ मूलकण भौतिकी या विषयांत संशोधन केलेले आहे.

 

मेनन यांचा जन्म मंगलोर येथे झाला. त्यांचे शिक्षण जोधपूर येथील जसवंत कॉलेज, मुंबई येथील रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि इंग्लंडमधील ब्रिस्टल विद्यापीठ येथे झाले. त्यांनी मुंबई विद्यापीठाची एम्. एस्‌सी. व ब्रिस्टल विद्यापीठा ची पी. एच्. डी. या पदव्या संपादन केल्या. ते ब्रिस्टल विद्यापीठात संशोधन सहाय्यक होते (१९५२–५३). त्यानंतर त्यांनी मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेन्टल रिसर्च या संस्थेत प्रपाठक (१९५५–५८), सहयोगी प्राध्यापक (१९५८ ६०), भौतिकी विद्यापीठात प्राध्यापक व अधिष्ठाते (१९६०–६४), वरिष्ठ प्राध्यापक व उपसंचालक (भौतिकी, १९६४–६६) आणि होमी भाभा यांच्या अपघाती निधनानंतर संस्थेचे संचालक (१९६६–७५) या पदांवर कामे केली. यांखेरीज भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिकी विभागाचे सचिव व इलेक्ट्रॉनिकी आयोगाचे अध्यक्ष (१९७१–७८), संरक्षण खात्याच्या संशोधन व विकासाचे सचिव आणिसंरक्षण संशोधन व विकास संघटनेच्या महासंचालकाचे वैज्ञानिक सल्लागार (१९७४–७८), कौन्सिल ऑफ सायंटिफिक ॲन्ड इंडस्ट्रियल रिसर्चचे महासंचालक (१९७८–८१), भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रविद्या विभागाचे सचिव (१९७८ पासून), पर्यावरण विभागाचे सचिव (१९८० पासून), अतिरिक्त उर्जा उद्‌गम आयोगाचे सचिव (१९८१ पासून), वगैरे विविध पदे त्यांनी भूषविली आहेत. फेब्रुवारी १९८६ मध्ये पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली.

मेनन यांनी ब्रिस्टल येथे अणुकेंद्रीय मूलकणांच्या छायाचित्रण पायस [⟶ कण अभिज्ञातक] तंत्र व त्याचा मूलकणांच्या अभ्यासातील उपयोग यांसंबंधी संशोधन केले. त्यांनी केलेल्या तांत्रिक विकास कार्यामुळे बदलत्या उर्जेच्या म्यूऑनांचे, उच्च उर्जाभारित व ज्यांच्या उर्जा अतिशय अरुंद कक्षेत सामावलेल्या आहेत अशा पायॉनांचे आणि भारी मेसॉनच्या (K-मेसॉनच्या) क्षयक्रियेत दुय्यम कण म्हणून उद्‌भवणारे इलेक्ट्रॉन यांचे अस्तित्व प्रथमच दाखविता आले. त्यांच्या कार्यामुळे विचित्र कणांच्या गुणधर्माचे (विशेषतः K – मेसॉनांच्या Kπ2, Kμ3 व Ke3 या क्षयक्रियांचे) स्पष्टीकरण देणे शक्य झाले. त्यांनी अणुकेंद्रीय पायस तंत्राबाबत केलेल्या संशोधनामुळे हे तंत्र १९५४ पर्यंत १५ लि. इतका प्रचंड स्तरयुक्त पायसाच्या राशीचा उपयोग करण्याइतके विकसित झाले. भारतात परतल्यावर त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमध्ये अतिशय उंचीवरील (सु. ३,३०० मी.) बलून उड्डाणा चे तंत्र विकसित केले आणि त्याच्या साहाय्याने चुंबकीय विषयवृत्ताच्या नजीक प्राथमिक विश्वकिरणांचा अभ्यास कार्यक्रम प्रस्थापित केला. बलून उडविणे, त्याचे मार्गनिरीक्षण करणे, पुनर्प्राप्ती करणे व लागणारी उपकरण सामग्री तयार करणे या सर्व गोष्टींचा या कार्यक्रमात समावेश होतो. १९६० सालापासून मेनन यांनी कोलारच्या सोन्याच्या खाणीत अतिशय खोल जागी म्यूऑन, न्यू ट्रिनो, दुर्बल आंतरक्रिया व इतर संबंधित आविष्कार यांविषयी अभ्यास करण्यासाठी प्रयोगांची उभारणी केलेली आहे. सध्या यांमध्ये प्रोटॉनाचे आयुर्मान (१०३० – १०३२ वर्षे) मोजण्याची योजना आहे याकरिता १५० टन वजनाचा अभिज्ञातक तयार करण्यात आला आहे.

मेनन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ रॉयल कमिशन फॉर द एक्झिबिशन ऑफ १८५१ याचा वरिष्ठ पुरस्कार (१९५३–५५), शांतिस्वरुप भटनागर पुरस्कार (१९६०), रॉयल एशियाटिक सोसायटीचे दुर्गाप्रसाद खेतान स्मृती पदक (१९७८), जवाहरलाल नेहरु विज्ञान पुरस्कार (१९८३), सी. व्ही. रामन संशोधन प्राध्यापक पुरस्कार (१९८५), तसेच पद्मश्री (१९६१) व पद्मभूषण (१९६८) हे सन्मान आणि जोधपूर, दिल्ली, अलाहाबाद, जादवपूर, सरदार पटेलव बनारस या विद्यापीठांच्या सन्मानीय पदव्या मिळालेल्या आहेत. ते इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (अध्यक्ष १९७४–७६), इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी (अध्यक्ष १९८१), महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स, रॉयल सोसायटी (लंडन), रशियाची ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्टस् ॲन्ड सायन्सेस वगैरे अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. यांखेरीज भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. बंगलोर भारत सरकारचा अवकाश आयोग संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांची विज्ञान व तंत्रविद्या अनुप्रयोग सल्लागार समिती (१९७२–७९, दोन वर्षे अध्यक्ष) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इन्स्टिट्यूट्‌स  फॉर ॲडव्हान्सड स्टडी, स्टॉकहो म कॉस्मिक रे कमिशन ऑफ इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर ॲन्ड ॲप्लाइड फिजिक्स (१९६३–६९, सचिव १९६९–७२, अध्यक्ष १९७२–७५) इ. अनेक सरकारी, खाजगी, आंतरराष्ट्रीय व भारतीय संस्थांचे आणि आयोगांचे सदस्य, सल्लागारवा संचालक या नात्याने त्यांनी कामे केली आहेत वा अद्यापही करीत आहेत. विश्वकिरण व मूलकण भौतिकी या विषयांवरील त्यांचे ८१ शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत.

फाळके, धै. शं.