लोरेन्ट्स, हेंड्रिक आंटोन : (१८ जुलै १८५३-४ फेब्रुवारी १९२८). डच भौतिकीविज्ञ. प्रारणाच्या (तरंगरूपी ऊर्जेच्या) आविष्कारावर चुंबकत्वाच्या होणाऱ्या परिणामासंबंधी त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना पीटर झीमान यांच्याबरोबर १९०२ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला.  

लोरेन्ट्स यांचा जन्म आर्नम येथे झाला. लायडन विद्यापीठात शिक्षण घेऊन त्यांनी १८७१ मध्ये गणित व भौतिकी या विषयांतील बी.एस्सी. पदवी संपादन केली. १८७२ मध्ये ते आर्नम येथे रात्रीच्या शाळेत शिक्षक झाले व त्याच वेळी त्यांनी डॉक्टरेटसाठी प्रबंध लिहिण्याचे काम चालू ठेवले. १८७५ साली त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली व पुढे तीन वर्षांनी लायडन विद्यापीठात गणितीय भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९१२ साली हार्लेम येथील टायलर फिजिकल कॅबिनेटचे अभिरक्षक व डच सोसायटी ऑफ सायन्सेसचे सचिव या दोन पदांचा कार्यभार स्वीकारल्यावरही त्यांनी लायडन येथे सन्माननीय प्राध्यापक म्हणून दर आठवड्याला व्याख्यान देण्याचे काम चालू ठेवले.  

डॉक्टरेटसाठी सादर केलेल्या आपल्या प्रबंधास लोरेन्ट्स यांनी प्रकाशाचे परावर्तन व प्रणमन (एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात शिरताना दिशेत होणारा बदल) यांचे अधिक समाधानकारक स्पष्टीकरण देता येईल अशा प्रकारे जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांच्या विद्युत् चुंबकीय सिद्धांतांचा [⟶मॅक्सवेल विद्युत् चुंबकीय समीकरणे] विस्तार केला. प्रकाशकी व विद्युत् या क्षेत्रांतील त्यांच्या मूलभूत कार्यामुळे द्रव्याच्या स्वरूपासंबंधीच्या त्या काळी प्रचलित असलेल्या संकल्पनांमध्ये मोठी क्रांती झाली. १८७८ मध्ये त्यांनी एखाद्या माध्यमातील प्रकाशाचा वेग आणि त्या माध्यमाची घनता व संघटन यांतील संबंधाविषयी एक निबंध प्रसिद्ध केला. हा संबंध दर्शविणारे सूत्र त्याच सुमारास लोरेन्ट्स यांच्याप्रमाणे डॅनिश भौतिकीविज्ञ एल्.व्ही लोरेन्ट्स यांनीही प्रतिपादित केले व त्यामुळे ते लोरेन्ट्स सूत्र या नावाने ओळखण्यात येते. 

लोरेन्ट्स यांच्या भौतिकीतील कार्याची व्याप्ती मोठी असली, तरी त्यांचा मध्यवर्ती हेतू विद्युत्, चुंबकत्व व प्रकाश यांच्यातील संबंध स्पष्ट करणारा एकच एकत्रित सिद्धांत मांडण्याचा होता. मॅक्सवेल सिद्धांतात विद्युत् चुंबकीय प्रारण विद्युत् भारांच्या आंदोलनांमुळे निर्माण होते असे प्रतिपादन केलेले असले, तरी प्रकाशाची निर्मिती करणारे प्रत्यक्ष विद्युत् भार अज्ञातच होते. पुढे लोरेन्ट्स यांनी द्रव्यातील अणूतही विद्युत् भार असू शकतील व विद्युत् भारित कणांची अणूतील आंदोलने हाच प्रकाशाचा उद्‌गम असावा असे सुचविले. हे खरे असेल, तर या कणांच्या आंदोलनावर व उत्पन्न प्रकाशाच्या तरंगलांबीवर तीव्र चुंबकीय क्षेत्राचा परिणाम व्हावयास पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. १८९६ मध्ये लोरेन्ट्स यांचे शिष्य झीमान यांनी या आविष्काराचे (चुंबकीय क्षेत्रामुळे वर्णरेषांचे विचलन होण्याचे याला ‘झीमान परिणाम’ म्हणतात) प्रात्यक्षिक दाखविले. याच कार्याबद्दल त्या दोघांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. 

लोरेन्ट्स यांनी गतिमान वस्तूसंबंधीच्या आविष्काराच्या अभ्यासात मूलभूत कार्य केले. प्रकाशाचे विपथन व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या समस्या यांवरील आपल्या व्यापक विवेचक ग्रंथात त्यांनी सर्व वस्तूंत मुक्तपणे प्रवेश करू शकणाऱ्या अचल ईथराच्या [⟶ईथर-२] अस्तित्वाचे ए.जे. फ्रेनेल यांचे गृहीतक स्वीकारले. हे गृहीतक गतिमान वस्तूंच्या विद्युत् व प्रकाशीय आविष्कारांच्या व्यापक सिद्धांताला पायाभूत ठरले. लोरेन्ट्स यांचा इलेक्ट्रॉन सिद्धांत मात्र मायकेलसन-मॉर्ली प्रयोगाच्या [निरनिराळ्या दिशांतील प्रकाशाच्या वेगांची तुलना करून पृथ्वीचा अवकाशातील वेग मोजण्याकरिता करण्यात आलेल्या प्रयोगाच्या ⟶प्रकाशवेग] नकारात्मक उत्तराचे स्पष्टीकरण देण्यात अयशस्वी ठरला. या अडचणीचे निराकरण करण्यासाठी त्यांनी १८९५ मध्ये स्थानिक कालाची (भिन्न स्थानी भिन्न काळ वेग असण्याची) संकल्पना मांडली. प्रकाशवेगाप्रत जाणाऱ्या गतिमान वस्तूंचे गतीच्या दिशेत आकुंचन होते या जी. एफ्. फिट्सजेरल्ड यांच्या प्रतिपादनाने प्रभावित होऊन लोरेन्ट्स यांनी आपल्या संकल्पनेचा विस्तार केला व तीद्वारेच सुप्रसिद्ध लोरेन्ट्स रूपांतरणे मांडली [⟶अवकाश-काल]. ही रूपांतरणे गणितीय सूत्रांच्या रूपात असून गतिमान वस्तूच्या द्रव्यमानातील वाढ, लांबीचे लघुकरण व कालाचे विस्तारण या वैशिष्ट्यांचे वर्णन करतात. ही रूपांतरणे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या मर्यादित सापेक्षता सिद्धांतास [⟶सापेक्षता सिद्धांत] आधारभूत आहेत.

नेदर्लंड्समधील झाइडर झी या सुप्रसिद्ध जमीन पुररुद्धार प्रकल्पाकरिता पुनरुद्धाराचे काम चालू असताना व ते पूर्ण झाल्यानंतर सागरी पाण्याच्या अपेक्षित असलेल्या हालचालीचा अभ्यास करण्यासाठी लोरेन्ट्स यांनी आठ वर्षे महत्त्वाचे सैद्धांतिक गणनकार्य केल, त्यांचे हे कार्यद्रायुयामिकीत महत्त्वाचे ठरले आहे. 

इंग्लंडच्या रॉयल सोसायटीचे व अमेरिकेच्या नॅशनल ॲकेडेमी ऑफ सायन्सेसचे ते सदस्य होते. लीग ऑफ नेशन्सच्या आंतरराष्ट्रीय बौद्धिक सहकार्यासाठी नेमलेल्या समितीचे १९२५ मध्ये ते अध्यक्ष होते. त्यांचे बहुतेक महत्त्वाचे निबंध पी. झीमान व ए.डी. फॉकर यांनी एच्. ए. लोरेन्ट्स : कलेक्टेड पेपर्स (९ खंड, १९३५-३९) या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. लोरेर्न्ट्स हार्लेम येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.