श्टेफान, योझेफ : (२४ मार्च १८३५-७ जानेवारी १८९३). ऑस्ट्रियन भौतिकीविज्ञ. वायूंचा गत्यात्मक सिद्धांत, द्रवगतिकी आणि विद्युत् सिद्धांत यांसंबंधी विशेष संशोधन त्यांनी केले. त्यांचा जन्म सेंट पीटर येथे झाला. व्हिएन्ना विदयापीठाची पीएच्.डी. पदवी मिळविल्यानंतर त्याच विदयापीठात त्यांची प्रारंभी भौतिकीचे प्राध्यापक व नंतर फिजिकल इन्स्टिट्यूटचे संचालक म्हणून नियुक्ती झाली. अनेक शास्त्रीय संस्थांशी त्यांचा संबंध होता.

गुस्टाफ रोबेर्ट किरखोफ या जर्मन भौतिकीविज्ञांनी परिपूर्ण कृष्ण पदार्थाची (सर्वच्या सर्व आपाती प्रारण शोषून घेणाऱ्या आदर्श व काल्पनिक पदार्थाची) व्याख्या मांडली [→ कृष्ण पदार्थ]. त्यानंतर १८७९ मध्ये श्टेफान यांनी कोणत्याही पदार्थापासून उत्सर्जित होणारी प्रारण ऊर्जा ही त्या पदार्थाच्या निरपेक्ष तापमानाच्या चतुर्थ घाताच्या समप्रमाणात असते असा अनुभवसिद्ध नियम मांडला. १८८४ मध्ये ⇨ लूटव्हिख बोल्टस्‌मान यांनी हा नियम ऊष्मागतिकीच्या साहाय्याने सिद्घ केला आणि तो कृष्ण पदार्थांना पूर्णांशाने लागू पडतो असे दाखविले. हा नियम आता ‘श्टेफान- बोल्टस्मान ’ सिद्धांत म्हणून ओळखला जातो. त्यातूनच पुढे प्रारणाच्या पुंजाची (क्वाँटमची) कल्पना उदयास आली.

श्टेफान व्हिएन्ना येथे मरण पावले.

भदे, व. ग.