कॉम्पटन, कार्ल टेलर : (१४ सप्टेंबर १८८७—२२ जून १९५४). अमेरिकन भौतिकीविज्ञ. त्यांनी अणुबाँबच्या निर्मितीत महत्त्वाचे कार्य केले. आर्थर हॉली कॉम्पटन यांचे बंधू होत. त्यांचा जन्म वूस्टर, ओहायओ येथे झाला. १९१२ साली प्रिस्टन विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविल्यानंतर त्यांनी सैन्याच्या संदेशवहन विभागात नोकरी केली. अमेरिकेच्या शेतकी खात्याचे व जनरल इलेक्ट्रिक कंपनीचे ते भौतिकीविषयक सल्लागार होते (१९२४—३०). १९३० मध्ये ते प्रिन्स्टन विद्यापीठाच्या भौतिकी विभागाचे प्रमुख व मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष झाले. अमेरिकेच्या राष्ट्रीय संरक्षण संशोधन समितीच्या शास्त्रीय संशोधन आणि विकास कार्यालयाचे ते प्रमुख होते (१९४३—४६).

 

प्रकाशविद्युत् (प्रकाशाच्या क्रियेमुळे निर्माण होणारी विद्युत्), वर्णपटविज्ञान आणि भौतिकीतील इतर काही विभागांत त्यांनी संशोधन केले. दुसऱ्या महायुद्धात व त्यानंतर त्यांनी अणुबाँब, रडार, रॉकेट आणि क्षेपणास्त्रे यांच्या विकासात महत्त्वाची कामगिरी केली.

अणुबाँबच्या परिणामांचे मूल्यमापन करण्यासाठी १९४६ साली नेमण्यात आलेल्या समितीचे व १९४८ मध्ये अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या संशोधन व विकास मंडळाचे ते अध्यक्ष होते. ते न्यूयॉर्क येथे मृत्यू पावले.

 

भदे, व. ग.