मित्र, शिशिर कुमार: (२४ ऑक्टोबर १८९०–१३ ऑगस्ट १९६३).भारतीय भौतिकीविज्ञ. ⇨ यनांबर (पृथ्वीभोवती सु. ८० ते ३०० किमी. उंचीच्या दरम्यानचे विद्युत्‌ संवाहक हवेचे आवरण) व रेडिओ तरंग यांविषयी महत्त्वाचे संशोधन.

मित्र यांचा जन्म कलकत्ता येथे झाला. त्यांचे शिक्षण भागलपूर येथील टी.एन्‌. जे. महाविद्यालयात व कलकत्ता येथील प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झाले. १९१९ मध्ये त्यांना कलकत्ता विद्यापीठाची डी.एस्सी. पदवी मिळाली. नंतरते सॉर्‌बॉन येथे पॅरिस विद्यापीठात शार्ल फाब्री यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करण्याकरिता गेले. वर्णपटातील दृश्य प्रकाशानजीकच्या जंबुपार भागाची (जांभळ्या रंगाच्या पलीकडील भागाची २,१०० ते २,३७०ÅÅ = अँगस्ट्रॉम एकक = १०-८ सेंमी.) वर्णपटीय मानके (प्रमाणभू त बाबी) निश्चित करण्यासंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल १९२३ मध्ये त्यांना पॅरिस विद्यापीठाची डी.एस्सी.पदवी मिळाली. सॉर्‌‌बॉन येथील अध्ययन संपल्यानंतर काही काळ त्यांनी नॅन्सी विद्यापी ठातील इन्स्टि‌ट्यूट ऑफ फिजिक्स येथे प्राध्यापक गटन यांच्याबरोबर त्यावेळी बिनतारी संदेशवहनात व इतर क्षेत्रात नुकत्याच वापरात येत असलेल्या त्रिप्रस्थ नलिकांच्या [तीन विद्युत्‌ अग्रे असलेल्या इलेक्ट्रॉन नलिकांच्या, व्हाल्व्हच्या →इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ति] उपयोगांसंबधी माहिती करून घेतली आणि त्रिप्रस्थ नलिकांच्या अनुप्रयोगांचा विकास पुढील काळात जलद गतीने होईल याचा त्यांना अंदाज आला. यामुळे १९२३ कलकत्ता विद्यापीठात भौतिकीचे खैरा प्राध्यापक झाल्यावर त्यांनी तेथे पदव्युत्तर स्तरावर बिनतारी संदेशवहनाच्या शिक्षणाची योजना अंमलात आणली. त्यांनी आपल्या प्रयोगशाळेत बिनतारी संदेशवहन आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या विषयांवर संशोधनास प्रारंभ केला. नंतर भारतातील अनेक विद्यापीठांमधून भौतिकीच्या एम्‌.एस्सी. अभ्यासक्रमामध्ये बिनतारी संदेशवहनाचा विशेष अभ्यासाकरिता नेमलेल्या (ऐच्छिक) विषयांमध्ये समावेश झाला. १९३५–५५ मध्ये ते भौतिकीच्या सर रासविहारी घोष प्राध्यापक पदावर होते. तेथून निवृत्त झाल्यानंतर १९५६–६२ मध्ये ते पश्चिम बंगाल माध्यमिक शिक्षण मंडळाच्या प्रशासक पदावर होते. १९६२ मध्ये भारताच्या केंद्र शासनाने त्यांची भौतिकी विषयाचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक म्हणून नेमणूक केली.

मित्र यांचे रेडिओ क्षेत्रातील संशोधन भारतात करण्यात आलेले सर्वप्रथम व महत्त्वाचे असे समजले जाते. त्यांनी कलकत्ता येथे आयनांबरावर संशोधन करणाऱ्या कार्यक्षम संशोधनशाळेची स्थापना केली. त्यांच्या प्रयत्नांमुळे हरिंघट (कलकत्त्याचे एक उपनगर) येथे भारतातील पहिले आयनांबर क्षेत्र संशोधन स्थानक प्रस्थापित करण्यात आले. कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चच्या रेडिओ संशोधन समितीची स्थापना करण्यात मित्र यांचा पुढाकार होता. या समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून त्यांनी पाच वर्षे (१९४३–४८) काम केले. कलकत्ता विद्यापीठात १९४९ मध्ये त्यांच्याच पुढाकाराने रेडिओ भौतिकी व इलेक्ट्रॉनिक्स या विषयांचा पदव्युत्तर विभाग सुरू करण्यात आला.

त्यांनी १९४७ मध्ये द अपर टमॉस्फि  अर हा आपला सुपरिचित ग्रंथ प्रसिद्ध केला. हा ग्रंथ या विषयावरील पहिलाच व अनेक दृष्टीने मूळ संशोधन कार्यावर आधारलेला असा होता. या ग्रंथाला तत्काळ जगामध्ये सर्वत्र मान्यता मिळाली व १९५२ मध्ये त्याची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. या ग्रंथाचे रशियन भाषेत भाषांतर झालेले आहे ही गोष्ट ल्लेखनीय आहे. त्यांचे अनेक संशोधनपर निबंध आणि टॉमिक एज टॉमिक वेपन्स अँड देअर लॉजिक हे अन्य ग्रंथही प्रकाशित झाले आहेत.

उच्चस्तरीय वातावरणामधील आविष्कारांवरील संशोधन कार्याबद्दल १९५८ मध्ये मित्र यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली. एशियाटिक सोसायटी (१९५१–५२),इंडियन सायन्स न्यूज ॲसोसिएशन (१९५६–५८)आणि नॅशनल इन्स्टि ट्यूट ऑफ सायन्सेस ऑफ इंडिया (१९५९–६०) या संस्थांचे ते अध्यक्ष होते. ⇨ आंतरराष्ट्रीय भूभौतिकिय वर्षाच्या भारतीय राष्ट्रीय समितीचे ते सदस्य होते. तसेच अनेक भारतीय आणि विदेशी शास्त्रीय नियतकालिकांच्या संपादकीय मंडळांवर त्यांनी काम केले.

मित्र यांना राजे पंचम जॉर्ज रौप्य महोत्सवी पदक (१९३५), इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे जय किसन मुखर्जी सुवर्ण पदक (१९४३), एशियाटिक सोसायटीचे सायन्स काँ ग्रेस पदक (१९५६) आणि कलकत्ता विद्यापीठाचे सर देवप्रसाद सर्वाधिकारी सुवर्ण पदक (१९६१)हे बहुमान मिळाले. १९६२ मध्ये त्यांना पद्मभूषण हा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. 

सूर्यवंशी, वि. ल.