हेव्हिसाइड, ऑलिव्हर : (१८ मे १८५०–३ फेब्रुवारी १९२५). इंग्रज भौतिकीविज्ञ. त्यांनी आयनांबराच्या अस्तित्वाबद्दल भाकीत केले होते. आयनांबर हा संपूर्ण पृथ्वीभोवताली उच्च वातावरणात आढळणारा विद्युत् संवाहक हवेचा थर असून त्यातून रेडिओ तरंगांचे परावर्तन होते [→ आयनांबर]. 

 

हेव्हिसाइड यांचा जन्म लंडन येथे झाला. ते १८७० मध्ये ग्रेट नॉर्दर्न टेलिग्राफ कंपनीत तारायंत्र चालक झाले परंतु वाढत्या बहिरेपणामुळेत्यांना १८७४ मध्ये सेवानिवृत्त व्हावे लागले. त्यानंतर त्यांनी स्वत:ला विद्युत् क्षेत्रातील संशोधनात वाहून घेतले. त्यांनी इलेक्ट्रिकल पेपर्स (१८९२) या ग्रंथात तारायंत्रविद्या आणि विद्युत् यांतील प्रेषणाच्या समस्या सोडविण्यासाठी सैद्धांतिक दृष्टिकोन मांडला. त्याकरिता त्यांनी कृत्य--कलन पद्धतीचा उपयोग केला होता. आता ती पद्धत जालकातील अस्थिर प्रवाहांच्या अभ्यासाकरिता लाप्लास रूपांतरण पद्धत म्हणून वापरली जाते. त्यांनी दूरध्वनीसंबंधी सैद्धांतिक कार्य केल्यामुळे व्यावहारिक दृष्ट्या दूर अंतरावरील सेवा प्रत्यक्षात आली. 

 

हेव्हिसाइड यांनी इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी (१८९३–१९१२) या ग्रंथात द्रव्यमानाचा प्रवेग वाढत राहिल्यास त्याचा विद्युत् भारसुद्धा वाढू शकतो, असे गृहीत धरले होते. आइन्स्टाइन यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धांतात ही गोष्ट अपेक्षित धरण्यात आली होती. फार दूर अंतरापर्यंत बिनतारी तारायंत्रविद्या परिणामकारक रीत्या सिद्ध झाल्यानंतर हेव्हिसाइड यांनी १९०२ मध्ये सिद्धांत मांडला की, वातावरणात अस्तित्वात असलेला संवाहक थर रेडिओ तरंगांना सरळ रेषेत अवकाशात जाऊ न देता पृथ्वीचे वलन अनुसरण्यास कारणीभूत ठरतो व ते तरंग पृथ्वीकडे परावर्तित होतात. त्यानंतर लगेचच अमेरिकेत संशोधन कार्य करणाऱ्या आर्थर ई. केन्ली यांनीही तसेच भाकीत केले. १९०२ ते १९३० पर्यंतच्या कालावधीत आयनांबर ‘केन्ली-हेव्हिसाइड थर’ या नावाने ओळखले जात होते. 

 

हेव्हिसाइड १८९२ मध्ये रॉयल सोसायटीचे सदस्य झाले. त्यांचेटॉर्की (डेव्हन, इंग्लंड) येथे निधन झाले. 

 

भदे, व. ग. एरंडे, कांचन