कार्य, शक्ति व ऊर्जा : कार्य ही एक अदिश राशी असून त्याची एकके अर्ग, फूट-पौंड व जूल ही आहेत. शक्तीचे कोणतेही एकक गुणिले काल हेही कार्याचे एकक होते. उदा., अश्वशक्ति-तास; किलोवॅट-तास.

एखाद्या पदार्थांवर प्रेरणा लावली असता होणारे स्थानांतर व स्थानांतराच्या दिशेतील प्रेरणेचा घटक (किंवा लावलेली प्रेरणा व प्रेरणेच्या दिशेतील स्थानांतराचा घटक) यांचा गुणाकार म्हणजे त्या पदार्थांवर होणारे कार्य होय. स्थानांतर व प्रेरणा किंवा तिचा स्थानांतराच्या दिशेतील घटक, एकाच दिशेत असल्यास कार्य धन व दोन्ही एकमेकांच्या विरुद्ध दिशेत असल्यास कार्य ऋण मानतात.

कार्याच्या काल-त्वरेस शक्ती म्हणतात. एखाद्या कारकाची दिलेल्या कालावधीतील सरासरी शक्ती म्हणजे कारकाने दिलेल्या कालावधीत केलेले कार्य भागिले तो काला‌वधी होय. कार्याचा वेग अखंड बदलता असल्यास तत्क्षणिक शक्ती

या सूत्राने काढता येते.

येथे क = कार्य आणि ट = काल होय. सेंमी.– ग्रॅम-सेकंद, मी.-किग्रॅ.-सेकंद व ब्रिटिश या पद्धतींतील शक्तीची एकके अनुक्रमे अर्ग/से., जूल/से. (किंवा वॉट) व फूट-पौंड/से. ही आहेत. अभियांत्रिकीमध्ये अश्वशक्ती हे एकक वापरतात. एक अश्वशक्ती म्हणजे ५५० फू. पौंड/से. किंवा ३३,००० फू. पौंड/मि. [→अश्वशक्ति].

कार्य करण्याची क्षमता म्हणजे ऊर्जा होय. हीच व्याख्या पुढीलप्रमाणे दिल्यास समजण्यास अधिक सुकर होते : ऊर्जा म्हणजे (ऊर्जेच्या उगमाकडून) कार्य झाले असता जेवढे कार्य झाले तेवढ्याने घटते अशी एक राशी होय. ऊर्जेची व कार्याची एकके सारखीच आहेत.

पहा : ऊर्जा; एकके व परिमाणे.

शिरोडकर, सु. स.