फेर्मी , एन्‍रीको  :  ( २९ सप्टेंबर १९०१ – २९ नोव्हेंबर १९५४ ). इटालियन – अमेरिकन भौतिकीविज्ञ .  नियंत्रित अणुकेंद्रीय भंजन विक्रिया साखळी  ( अणुऊर्जा )  साध्य करून पहिला प्रायोगिक अणुकेंद्रीय विक्रिय क  ( अणुभट्टी )  उभारण्याबद्दल विशेष प्रसिद्ध .  ते १९३८ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते होते .  त्यांचा जन्म  रोम येथे झाला .  १९२२ मध्ये त्यांनी पीसा विद्यापीठाची भौतिकी विषयाची डॉक्टरेट पदवी मिळविली .  १९२३ मध्ये त्यांना इटालियन सरकारची शिष्यवृत्ती मिळाली व ग टिं गेन विद्यापीठात माक्स बोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले .  नंतर १९२४ मध्ये रॉकफेलर शिष्यवृत्ती मिळाल्यावर लायडन विद्यापीठात त्यांनी पॉल एव्हरेनफेस्ट यांच्याबरोबर काम केले .  त्याच वर्षी ते फ्लॉरेन्स विद्यापीठात गणितीय भौतिकी व सैद्धांतिक यामिकी  ( वस्तूंवर प्रेरणांची होणारी क्रिया व तीमुळे होणारी गती यांविषयीचे शास्‍त्र )  या विषयांचे अध्यापक झाले .  तेथे दोन वर्षे काम केल्यानंतर १९२७ – ३८ या कालखंडात ते रोम विद्यापीठात सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक होते .

 एन्रीको फेर्मी

 फ्लॉरेन्स येथे असताना १९२६ मध्ये त्यांनी नीच तापमानाला वायूच्या रेणूंच्या होणाऱ्या वर्तनाचे गणितीय स्पष्टीकरण करण्यासाठी सांख्यिकीय नियम शोधून काढले .  हे नियम  ‘ फेर्मी – डिरॅक सांख्यिकी ’  या नावाने ओळखण्यात येतात  [ ⟶ सांख्यिकीय भौतिकी ]  आणि या सांख्यिकीचे पालन करणाऱ्या कणांना  ( उदा .,  इलेक्ट्रॉन ,  प्रोटॉन ) ‘ फेर्मिऑन ’  असे संबोधितात .  रोम येथे सुरुवातीला त्यांनी पुंज विद्युत् ‌  गतिकीतील  [ ⟶ पुंजयामिकी ]  आणि आणवीय ,  रेणवीय व अणुकेंद्रीय वर्णपटविज्ञानातील विविध सैद्धांतिक समस्यांविषयी संशोधन केले .  १९३४ मध्ये त्यांनी अणुकेंद्रीय बी टा उत्सर्जनाने होणाऱ्या क्षयासंबंधीचा  [ ⟶ किरणोत्सर्ग ]  महत्त्वाचा सिद्धांत मांडला .  याकरिता त्यांनी अणुकेंद्रकातील एका न्यूट्रॉनाचे एक प्रोटॉन ,  एक इलेक्ट्रॉन व एक न्यूट्रिनो या तीन कणांत रूपांतर  ( क्षय )  होते ,  ही कल्पना आधारभूत धरलेली होती .  १९३४ मध्ये झॉल्यो – क्यूरी दांपत्याने कृत्रिम किरणोत्सर्गाचा शोध लावल्यानंतर फेर्मी यांनी न्यूट्रॉनांच्या भडिमाराने बहुतेक सर्व मूलद्रव्यांचे अणुकेंद्रीय रूपांतर होते ,  असे दाखविले .  त्यांनी युरेनियम अणूंवर मंदगती न्यूट्रॉनांचा भडिमार करून नेपच्यूनियम हे नवीन मूलद्रव्य तयार केले .  या प्रयोगातच अणूचे भंजन घडून आले  पण या विक्रियेचे महत्त्व त्या वेळी फेर्मी यांना ओळखता आले नाही .  या संशोधनातून मंदगती न्यूट्रॉनांच्या लागलेल्या शोधातूनच पुढे १९३९ मध्ये ओटो हान व फ्रिट्झ स्ट्रासमान यांनी अणुकेंद्रीय भंजन विक्रियेचा शोध लावला ,  तसेच ⇨  आवर्त सारणी तील त्या काळच्या ज्ञात ९२ मूलद्रव्यांच्या पलीकडील मूलद्रव्यांचे कृत्रिम रीत्या उत्पादन करणे शक्य झाले .  १०० अणुक्रमांकाच्या  ( अणुकें द्रा तील प्रोटॉनांची संख्या १०० असलेल्या )  कृत्रिम मूलद्रव्याला फेर्मी यांच्या बहुमानार्थ  ‘ फेर्मियम ’  हे नाव देण्यात आले .

 

 न्यूट्रॉनांच्या भडिमाराने तयार झालेल्या नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्यांचे अस्तित्व दाखवून देण्याबद्दल आणि मंदगती न्यूट्रॉनांद्वारे संबंधित अणुकेंद्रीय विक्रिया शोधून काढल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला .

 मुसोलिनी यांच्या हुकूमशाहीला कंटाळून फेर्मी यांनी स्टॉकहोमला नोबेल पारितोषिक घेण्याच्या निमित्ताने इटली सोडली व १९३९  मध्ये कोलंबिया विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापकपद स्वीकारण्यासाठी परस्पर अमेरिकेला प्रयाण केले .  युरेनियमाच्या भंजनाचे लष्करी महत्त्व ओळखून त्यांनी अमेरिकी सरकारला अणु बाँ ब योजना हाती घेण्यास उद्युक्त करण्यात महत्त्वाचा भाग घेतला .  फेर्मी व त्यांच्या सहका ऱ्यां नी युरेनियमाचा भंजनक्षम समस्थानिक  ( अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेला त्याच मूलद्रव्याचा प्रकार )  युरेनियम  ( २३५ )  हा आहे असे सिद्ध केले .  

 प्रथमतः कोलंबिया विद्यापीठात व नंतर शिकागो विद्यापीठात अणुकेंद्रीय ऊर्जा नियंत्रित स्वरूपात मिळविण्यासाठी भंजन विक्रियेच्या साखळीची योजना करण्यासंबंधी त्यांनी संशोधन केले .  २ डिसेंबर १९४२ रोजी पहिली नियंत्रित भंजन विक्रिया साखळी फेर्मी यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी रीत्या घडवून आणण्यात आली .  या विक्रिया साखळीचा कालावधी ४० मिनिटे होता व तिच्यापासून मिळणारी कमाल शक्ती केवळ ०·५ वॉट होती .  ही घटना अणुयुगाचा प्रारंभ म्हणून गणली जाते .  लॉस ॲलॅमॉस येथे अणु बाँ ब तयार करण्याच्या कामातही त्यांनी प्रामुख्याने भाग घेतला .  १९४४ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले व युद्ध संपल्यावर १९४५ सालाच्या शेवटी शिकागो विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर स्टडीज ( नंतर  ‘ ए न्‍री को फेर्मी इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्लिअर स्टडीज ’  असे नामांतरण झालेल्या )  या संस्थेत प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली .  तेथे त्यांनी उच्च ऊर्जा भौतिकीकडे आपले लक्ष वळवून पायॉन – न्यूक्लिऑन परस्परक्रियेसंबंधीच्या  [ ⟶ मूलकण ]  संशोधनात भाग घेतला .  अखेरच्या काही व र्षां त त्यांनी विश्वकिरणांच्या  ( बाह्य अवकाशातून पृथ्वीवर पडणाऱ्या भेदक किरणांच्या )  उद् ‌ गमासंबं धी संशोधन करून एक सिद्धांत मांडला .  या सिद्धांतात विश्वकिरणांतील कणांची विलक्षण ऊर्जा एका वैश्विक चुंबकीय क्षेत्रामुळे  ( हे क्षेत्र प्रचंड कणवेगवर्धकाप्रमाणे कार्य करीत असल्यामुळे )  निर्माण होते ,  असे त्यांनी प्रतिपादन केले .

 फेर्मी हे इटलीची रॉयल ॲकॅडेमी ,  अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस ,  इं ग्‍लं डची रॉयल सोसायटी व इतर अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते .  १९५४ मध्ये ॲटॉमिक एनर्जी कमिशनतर्फे ५०,००० डॉलरचे एक खास पारितोषिक प्रथम त्यांना देण्यात आले .  हे पारितोषिक आता त्यांच्याच नावाने देण्यात येते .  त्यांचे सर्व संशोधनात्मक निबंध एमील्यो सेग्रे व इतर शास्‍त्रज्ञांनी संपादित करून दोन खंडांत १९६२ – ६५ मध्ये प्रसिद्ध केले .  ते शिकागो येथे मृत्यू पावले .

 भदे ,  व .  ग .