विद्युत् घंटा : घरगुती वापराचे एक सर्वसामन्य विजेचे साधन. या साधनाने विजेच्या साहाय्याने ऐकू विद्युत् घंटा : (१) विद्युत् चुंबक, (२) धात्र, (३) लोळी, (४) स्प्रिंग, (५) संपर्क स्क्रू, (६) दाब बटन, (७) अग्र.येणारा आवाज निर्माण करून त्याद्वारे इशारा देण्याचे काम केले जाते. उदा., दारावरील विद्युत् घंटेने बाहेर कोणी तरी आल्याची वर्दी घरातील माणसांना देता येते. घराशिवाय कार्यालयात व क्वचित बसमध्ये, तसेच आग, चोरी यांसारख्या धोक्यांची सूचना देण्यासाठी या घंटा वापरतात. वापरांनुसार घंटेचा प्रकार (एक ठोका देणारी, घंटानाद वा गजर करणारी) व आकारमान निरनिराळी असतात. विविध प्रकारचे आवाज करणारे इलेक्ट्रॉनीय कर्णे व घंटा यांच्यामुळे विद्युत् घंटा मागे पडू लागल्या आहेत. दारावरच्या सर्वपरिचित विद्युत् घंटेतील लोळी हातोडीप्रमाणे वाटीवर आपटून आवाज निर्माण होतो. लोळीचे लागोपाठ जलद ठोके पडून घंटानाद करणारी घंटा अधिक प्रचलित आहे. कंधीकधी एक ठोका पडणारी घंटाही वापरतात.

विद्युत् प्रवाहाने निर्माण होणाऱ्या चुंबकीय परिणामाचा वापर विद्युत् घंटेत केलेला असतो. या घंटेसाठी घरगुती वापराचा कमी दाबाचा प्रत्यावर्ती (मूल्य व दिशा सेंकंदात वारंवार उलटसुलट बदलणारा) विद्युत् प्रवाह आणि विशेषेकरून धोकासूचकांत एकदिश (एकाच दिशेत वाहणारा) विद्युत् प्रवाह (घटमाला) विजेचा स्त्रोत म्हणून वापरतात. दोन लोखंडी गाभ्याभोववती तांब्याच्या तारेची वेटोळी असणारा विद्युत् चुंबक (१) आणि एका (सुट्या) टोकाला लोळी (३) व दुसऱ्या टोकाला पट्टीसारखी स्प्रिंग (४) जोडलेला धात्र (आर्मेचर) (२) हे विद्युत् घंटेचे प्रमुख भाग आहेत (पहा आकृती). विद्युत् स्त्रोतापासून आलेली तार दाब बटनाच्या (६) मार्गाने विद्युत् चुंबक व धात्र यांच्याकडे गेलेली असते. दुसरी तार धात्राची स्प्रिंग ज्या संपर्क स्क्रूवर (५) टेकते त्या स्क्रूपासून अग्रांमार्फत (७) विद्युत् स्त्रोताकडे गेलेली असते. बटन दाबले की, विद्युत् मंडल पूर्ण होऊन घंटेचे कार्य चालू होते. मंडल पूर्ण झाल्यावर विजेचा प्रवाह तांब्याच्या तारेच्या वेटोळ्यांतून जातो. यामुळे लोखंडी गाभ्यात तात्पुरते चुंबकत्व निर्माण होते. या चुंबकत्वामुळे त्याच्या समोरील लोखंडी (वा पोलादी) धात्र त्याच्याकडे ओढला जातो. यामुळे धात्राला जोडलेली लोळी घंटेच्या वाटीवर हातोडीप्रमाणे आपटते व आवाज निघतो. याच वेळी धात्र ओढला गेल्याने तो संपर्क स्क्रुपासून अलग होतो आणि विद्युत् मंडल खंडित होते, परिणामी विद्युत् चुंबकातील तात्पुरते चुंबकत्व नाहीसे होते व त्याला चिकटलेला धात्र मोकळा होऊन व स्प्रिंगेच्या स्थितिस्थापकतेमुळे परत आपल्या मूळ जागी येऊन स्क्रूवर टेकतो. अशा प्रकारे परत विद्युत् मंडल पूर्ण होऊन विद्युत् चुंबक भारित होतो. व धात्र त्याच्याकडे खेचला जाऊन घंटेचा आणखी एक ठोका पडतो. घंटेचे बटन दाबून ठेवले असेपर्यंत विद्युत् मंडल पूर्ण व खंडित होण्याची ही क्रिया चालू रहाते. यामुळे जलदपणे ठोके पडत राहून घंटानाद होतो.

वरील क्रियेत प्रथम विद्युत् ऊर्जेचे चुंबकीय ऊर्जेत, मग चुंबकीय ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत आणि शेवटी यांत्रिक ऊर्जेचे ध्वनी ऊर्जेत व थोड्या प्रमाणात उष्णतेत) रूपांतर होत असते. अशा रीतीने ऊर्जेचे एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत होणारे रूपांतर आणि ऊर्जेची अक्षय्यता या कल्पना सोप्या रीतीने स्पष्ट करण्यासाठी विद्युत् घंटा हे चांगले साधन आहे. [⟶ द्रव्य आणि ऊर्जा यांची अक्षय्यता].

पहा : गृहोपयोगी उपकरणे धोकासूचक, विद्युत्.

घन, प. द.