ॲपलटन, सर एडवर्ड व्हिक्टर : (६ सप्टेंबर १८९२ – २१ एप्रिल १९६५). इंग्‍लिश भौतिकीविज्ञ. १९४७ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. त्यांचा जन्म यॉर्कशरमधील ब्रॅडफर्ड येथे झाला. त्यांचे शिक्षण केंब्रिज येथील सेंट जॉन्स कॉलेजमध्ये झाले, परंतु पहिल्या महायुद्धात सैन्यांत दाखल होण्यासाठी त्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागले. युद्धकालात सिग्नल ऑफिसर म्हणून काम करीत असताना त्यांना रेडिओसंबंधी आवड निर्माण झाली व युद्धानंतर केंब्रिजला परतल्यावर त्यांनी या विषयाचा अभ्यास सुरू केला. १९२० मध्ये कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत ते प्रयोगिक भौतिकीचे साहाय्यक निर्देशक आणि नंतर १९२२ मध्ये ट्रिनिटी कॉलेजमध्ये साहाय्यक प्राध्यापक होते. १९२४–३६ पर्यंत लंडन विद्यापीठात व त्यानंतर केंब्रिज विद्यापीठात ते भौतिकीच्या प्राध्यापकपदावर होते.

वातावरणातील केन्ली हेव्हीसाइड थराचे अस्तित्व त्यांनी प्रायोगिक रीत्या दाखवून दिले व त्याची उंचीही मोजली. या थराच्याही वरती व जमिनीपासून २३० किमी. उंचीवर पृथ्वीभोवती रेडिओ लघुतरंग परावर्तित करणारा आणखी एक थर ॲपलटन यांना आढळून आला. या थराला ‘ॲपलटन थर’ असे नाव आता मिळालेले आहे. अशाच प्रकारच्या अनेक थरांनी ⇨आयनांबर तयार झालेले आहे, असे त्यांनी प्रयोगाद्वारे दाखवले.

त्यांना रॉयल सोसायटीचे १९२६ मध्ये सदस्यत्व व १९४१ मध्ये ‘नाइट’ हा किताब मिळाला. ॲपलटन यांना मिळालेल्या अनेक सन्मानांत अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ रेडिओ एंजिनियर्सचे मॉरिस लीपमान पारितोषिक (१९३९), इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल एंजिनियर्सचे फॅराडे मेडल (१९४६) आणि १९४७ मध्ये वातावरणासंबंधीच्या भौतिकीतील संशोधनकार्याबद्दल मिळालेले नोबेल पारितोषिक यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल.

दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस ब्रिटनच्या शास्त्रीय व औद्योगिक संशोधन खात्याचे कायम चिटणीस व युद्धानंतर अणुशक्तीचा आणि कार्यक्षण शास्त्रज्ञांचा उपयोग कसा करून घ्यावा याकरिता ब्रिटिश सरकारने नेमलेल्या समित्यांचे सभासद म्हणून त्यांनी काम केले. तसेच ते दूरचित्रवाणी समितीचे सभासद आणि नॅशनल कमिटी ऑफ रेडिओ टेलिग्राफचे चिटणीस होते. ते एडिंबरो येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.