रसेल ॲलन हल्स

हल्स, रसेल ॲलन : (२८ नोव्हेंबर १९५०). अमेरिकन भौतिकीविद. पीएसआर १९१३ + १६ हा पल्सार एका युग्मताऱ्याचा घटक असल्याचा शोध सर्वप्रथम लावल्याबद्दल हल्स यांना जोझेफ एच्. टेलर यांच्यासमवेत १९९३ सालचे भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक मिळाले. पल्सार ही संज्ञा Pulsating Radiostar या शब्दांतील अक्षरांपासून बनविण्यात आलेली आहे. [→ पल्सार].

 

हल्स यांचा जन्म न्यूयॉर्क सिटी (न्यूयॉर्क राज्य, अ. सं. सं.) येथे झाला. त्यांना कूपर युनियन कॉलेज (न्यूयॉर्क सिटी) या महा-विद्यालयातून भौतिकी विषयाची बी.एस्. पदवी मिळाली (१९७०). त्यानंतर त्यांनी ॲम्हर्स्ट येथील मॅसॅचूसेट्स विद्यापीठातून भौतिकी विषयाची एम्. एस्. (१९७२) आणि पीएच्. डी. (१९७५) या पदव्या संपादन केल्या. याच विद्यापीठात ते जोझेफ एच्. टेलर यांचे विद्यार्थी होते. त्यानंतर हल्स यांनी नॅशनल रेडिओ ॲस्ट्रॉनॉमी ऑब्झर्व्हेटरी या वेधशाळेत संशोधन केले (१९७५–७७).

 

हल्स यांनी आरेसीबो (प्वेर्त रीको) येथीलरेडिओ दूरदर्शक वापरून अनेक पल्सार ताऱ्यांचे शोध लावले. सामान्यतः ताऱ्यांपासून होणाऱ्या प्रारणाचे (तरंगरूपी ऊर्जेचे) उत्सर्जन अखंडपणे होत असते. ३ मिमी. ते ३० मी. तरंगलांबी असलेल्या रेडिओ तरंगांचे उत्सर्जन ठराविक कालखंडाने पृथक् स्पंदाच्या स्वरूपात करणाऱ्या ताऱ्याला पल्सार म्हणतात. पल्सार हे वेगाने परिवलन करणारे न्यूट्रॉन तारे असून ते रेडिओ तरंग जलदपणे आणि नियमितपणे उत्सर्जित करतात. परंतु पीएसआर १९१३ + १६ या पल्सारच्या रेडिओ तरंग उत्सर्जनामध्ये अनियमितता दिसून आल्याने त्या ताऱ्यामध्ये सहचर न्यूट्रॉन तारा असून तो एका घट्ट कक्षेत बंदिस्त असतो असा निष्कर्ष हल्स व टेलर यांनी काढला (१९७४).

 

पीएसआर १९१३+ १६ हा पल्सार गुरुत्व तरंगांचे अभिज्ञान होण्यास सर्वप्रथम साहाय्यक ठरल्याने महत्त्वाचा ठरला. दोन ताऱ्यांच्या गुरुत्वीय क्षेत्रांमध्ये प्रचंड प्रमाणात आंतरक्रिया होत असल्यामुळे नियमित रेडिओ स्पंदांवर परिणाम होतो आणि त्यांच्यातील वेळा आणि फेरबदल पडताळून पाहिले असता हल्स आणि टेलर यांना असे आढळून आले की, हे तारे वाढत राहणाऱ्या घट्ट कक्षेत एकमेकांभोवती अतिशय वेगाने परिवलन करीत असतात. या कक्षेचा ऱ्हास घडण्याअगोदर या प्रणालीतून गुरुत्व तरंगांच्या रूपात ऊर्जेचा क्षय होतो, असे गृहीत धरण्यात आले. हा शोध हल्स आणि टेलर यांनी १९७८ मध्ये लावला. या शोधामुळे ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या व्यापक सापेक्षता सिद्धांतामध्ये गुरुत्वीय तरंगांच्या अस्तित्वाबद्दल केलेल्या भाकिताला प्रथमच प्रायोगिक पुरावा मिळाला.

 

हल्स यांनी १९७७ मध्ये खगोल भौतिकी हे क्षेत्र बदलूनआयनद्रायू भौतिकी निवडले. ते प्रिन्स्टन विद्यापीठातील आयनद्रायू भौतिकी प्रयोगशाळेत प्रमुख संशोधन भौतिकीविद होते (१९७७–८०). तेथे त्यांनी अणुकेंद्रीय संघटन विक्रियेची सुविधा असलेल्या टोकामार्क फ्युजन टेस्ट रिॲक्टर या विक्रियकाशी संबंधित अनेक संशोधने केली. १९९४ पासून हल्स हे प्रिन्स्टन विद्यापीठातील ॲडव्हान्स्ड मॉडेलिंग लॅबोरेटरी या प्रयोगशाळेचे प्रमुख आहेत.

 

हल्स अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो (१९९३) आणि प्रिन्स्टन विद्यापीठाचे सन्मान्य निवासी फेलो (१९९४) आहेत. त्यांनी पल्सार ज्योतिषशास्त्र, नियंत्रित संघटन आयनद्रायू भौतिकी आणि संगणक प्रतिरूपे या विषयांवर व्यावसायिक ज्ञानपत्रिकांमध्ये अनेक लेख लिहिले.

 

खोब्रागडे, स्नेहा दिलीप