वेबर, व्हिल्हेल्म एडूआर्ट : (२४ ऑक्टोबर, १८०४–२३ जून, १९८१). जर्मन भौतिकीविज्ञ. विद्युत व चुंबकत्व यांसंबंधीच्या संशोधनकार्याकरिता प्रसिद्ध. त्यांनी ⇨कार्ल फ्रीड्रिख गौस (गाउस) यांच्याबरोबर ⇨भूचुंबकत्वासंबंधी संशोधन केले. वेबर यांना विद्युत राशींचे मापन करणाऱ्या आधुनिक पद्धतीचे जनक मानण्यात येते.

वेबर यांचा जन्म विटनबर्ग (जर्मनी) येथे झाला. त्यांचे शिक्षण हाल आणि गटिंगेन येथे झाले. त्यांनी जे. एस. सी. श्वाइगर यांच्या मार्गदर्शनाखाली १८२६ मध्ये डॉक्टरेट पदवी संपादन केली. गटिंगेन आणि लाइपसिक विद्यापीठांत त्यांनी भौतिकीचे अध्यापन केले. ते गटिंगेनच्या ज्योतिषशास्त्रीय वेधशाळेचे संचालक होते.

व्हिल्हेल्म वेबर यांनी ⇨एर्न्स्ट हाइन्रिख वेबर (१७९५–१८७८) या आपल्या बंधूंबरोबर वैज्ञानिक संशोधनाला प्रथम सुरुवात केली. नंतरही व्हिल्हेल्म यांनी आपले थोरले बंधू एर्न्स्ट व धाकटे बंधू एडूआर्ड फ्रीड्रिख वेबर (१८०६–७१) यांच्याबरोबर प्रसंगविशेषी संशोधन केले. त्यांचे हे दोघे बंधू शरीरक्रियावैज्ञानिक होते. Wellenhre, auf Experimente gegrundet या पुस्तकात जलतरंग व ध्वनितरंग यांसंबंधी व्हिल्हेल्म वेबर यांची प्रायोगिक संशोधने १८२५ मध्ये प्रसिद्ध झाली. गटिंगेन विद्यापीठात त्यांनी गौस या आपल्या मित्राबरोबर सहा वर्षे काम केले. १८३२ मध्ये गौस यांनी वेबर यांच्या सहकार्याने लिहिलेल्या निबंधात द्रव्यमान, लांबी आणि काल यांच्या मूलभूत एककांचा समावेश असलेल्या चुंबकत्व एककांची प्रथम तर्कशुद्ध मांडणी केली. १८४६ मध्ये वेबर यांनी विजेकरिता ही कल्पना पुन्हा मांडली. त्यांनी विद्युत चालक प्रेरणा आणि विद्युत रोध यांच्या एककांच्या व्याख्याही तयार केल्या. वेबर व गौस यांनी तयार केलेली विद्युत राशींच्या एककांची पद्धती १८८१ मध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्य करण्यात आली. [→ एकके व परिमाणे].

वेबर आणि गौस यांनी चुंबकीय वेधशाळांचे एक जाळे निर्माण करणे व तेथे होणाऱ्या मापनांचा समन्वय करणे यांसाठी गटिंगेन येथे एक संस्था स्थापन केली. १८८३ मध्ये त्यांनी भौतिकीय प्रयोगशाळा आणि ज्योतिषशास्त्रीय प्रयोगशाळा यांमध्ये विद्युत घटमालांवर चालणाऱ्या तारायंत्राच्या सु. २·७ किमी. लांबीच्या तारा टाकल्या. त्यामुळे चुंबकीय निरीक्षणे एकाच वेळी घेणे सुलभ झाले. त्यांनी संवेदनक्षम चुंबकीय क्षेत्रमापक आणि इतर चुंबकीय उपकरणांचा विकास केला. भूचुंबकत्वासंबंधी निरीक्षणे करण्यासाठी त्यांनी एक आरशाचा गॅल्व्हानोमीटर तयार केला.

धन व ऋण विद्युत भार हे संवाहकामध्ये सारख्याच वेगाने परंतु विरुद्ध दिशांनी वाहत असतात, या गुस्टाफ फेकनर याच्या दृष्टिकोनाचा उपयोग करून वेबर यांनी विद्युत भारांमधील प्रेरणांसंबंधीचा नियम तयार केला आणि या प्रेरणा मोजण्यासाठी एक विद्युत शक्तिमापकही तयार केला. त्यांनी विद्युत प्रेरणेचा हा नियम एका स्वतंत्र पुस्तकात १८४६ मध्ये प्रसिद्ध केला.

इ. स. १८४० मध्ये वेबर यांनी स्पर्शिका गॅल्व्हानोमीटरमध्ये सुधारणा केल्या. या उपकरणतील चुंबकीय सूचीच्या होणाऱ्या विचलनावरून विद्युत प्रवाहाच्या केवल विद्युत चुंबकीय एककाची (e.s.u.) व्याख्या करण्यासाठी त्याचा उपयोग झाला. एक एकक विद्युत प्रवाह एक सेकंद वाहिल्यामुळे (एक एकक विद्युत भारामुळे) विघटन झालेल्या पाण्याची राशी त्यांनी ठरविली.

वेबर यांनी गटिंगेन येथे काही वर्षे ⇨विद्युत गतिकी आणि द्रव्याची विद्युत संरचना यांसंबंधी संशोधन केले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला वेबर यांच्या कल्पनेप्रमाणे धातूंच्या इलेक्ट्रॉन उपपत्तीचा विकास होण्यास सुरुवात झाली.

वेबर यांना इंग्लंड, फ्रान्स आणि जर्मनी या देशांकडून अनेक बहुमान मिळाले. त्यांचे अनेक दीर्घ लेख Resultate aus den Beobachtungen des magnetischen Vereins (१८३७–४३) या ग्रंथाच्या सहा खंडांमध्ये प्रसिद्ध झाले. हा ग्रंथ त्यांनी व गौस यांनी संपादित केला. व्हिल्हेल्म वेबर यांनी विद्युतीय व चुंबकीय ह्या परस्परसंबंधित क्षेत्रांमध्ये केलेल्या कार्याच्या गौरवार्थ १९३५ मध्ये चुंबकीय स्रोताच्या मीटर-किलोग्रॅम-सेकंद पद्धतीतील व्यावहारिक एककाकरिता ‘वेबर’ ही संज्ञा अधिकृतपणे मान्य करण्यात आली.

    वेबर गटिंगेन येथे मृत्यू पावले.                   

भदे, व.ग. सूर्यवंशी, वि.ल.