प्रांटूल, लूटव्हिख : (४ फेब्रुवारी १८७५–१५ ऑगस्ट १९५३). जर्मन भौतिकीविज्ञ. आधुनिक द्रवगतिकी [⟶ द्रायुयामिकी] व ⇨ वायुगतिकी या विषयांचे जनक. या विषयांतील त्यांच्या संशोधनामुळे जहाजांच्या व विमानांच्या आकारांमध्ये विशेष सुधारणा झाल्या.

प्रांट्ल यांचा जन्म पश्चिम जर्मनीमधील फ्रायझिंग येथे झाला. १८९८ साली त्यांना अभियांत्रिकी विषयातील पदवी मिळाली. नंतर दोन वर्षांनी त्यांनी ‘वाकलेल्या तुळईचे पार्श्वीय अस्थैर्य’ यासंबंधीचा प्रबंध लिहून डॉक्टरेट पदवी संपादन केली. १९०१ साली ते हॅनोव्हर विद्यापीठात यामिकी विषयाचे (पदार्थावर होणारी प्रेरणांची क्रिया व तीमुळे उत्पन्न होणारी गती यांचा अभ्यास करणाऱ्या विषयाचे) प्राध्यापक झाले. १९०४ पासून मृत्यूपावेतो ते गटिंगेन विद्यापीठात अनुप्रयुक्त यामिकी या विषयाचे प्राध्यापक होते. १९२५ साली ते कैसर व्हिल्हेल्म (नंतर माक्स प्लांक) इन्स्टिट्यूट फॉर फ्ल्यूइड मेकॅनिक्स या संस्थेचे संचालक झाले.

इ. स. १९०४ मध्ये त्यांनी वायूतून किंवा द्रवातून जाणाऱ्या घन पृष्ठाभोवती तयार होणाऱ्या सीमास्तराचा (घन पृष्ठाला चिकटून त्याच्या बरोबरच जात राहणाऱ्या द्रायूच्या पातळ थराचा) शोध लावला. यामुळे त्वक्‌ घर्षण (द्रायूच्या श्यानतेमुळे–दाटपणामुळे–त्याच्यातून जाणाऱ्या घन पृष्ठावर कार्यकारी होणारी विरोधी प्रेरणा) कसे निर्माण होते ते समजले. त्याच बरोबर घन पृष्ठ प्रवाहरेखित केल्यास (पृष्ठाला द्रायूच्या प्रवाहरेषांनुरूप आकार दिल्यास) कर्षण प्रेरणा (गतीला विरोध करणारी प्रेरणा) का कमी होते, तेही समजून आले.

वातपर्णाच्या [⟶ वायुगतिकी] विषयीच्या सिद्धांतात पर्णाच्या पृष्ठभागालगत तयार होणाऱ्या भोवऱ्यांचे (आवर्तांचे) महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे द्रायूमध्ये अनुप्रवाह (द्रायू व घन पदार्थ यांच्यामध्ये परस्पर सापेक्ष गती असल्यास घन पदार्थांच्या मागे उत्पन्न होणारा संक्षुब्ध प्रवाह जहाजांच्या मागे त्याचप्रमाणे नद्यांवरील पुलांच्या स्तंभांमागे हे अनुप्रवाह स्पष्ट दिसू शकतात) कसे तयार होतात व त्यांचा गतीवर काय परिणाम होतो, हे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे स्वनातीत (ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त वेग असलेला) प्रवाह व संक्षुब्ध प्रवाह या क्षेत्रांतही त्यांनी संशोधन केले.

प्रांट्ल यांनी १९०९–१२ मध्ये पंख्यांच्या कसोट्यांसाठी नियमावली तयार केली. १९१४ साली त्यांनी द्रवातून जाणाऱ्या घन गोलाचा वेग विशिष्ट मर्यादेपलीकडे वाढविला असता त्याचा कर्षण गुणांक एकदम का कमी होतो या कूट प्रश्नाची समाधानकारक सोडवणूक केली.

विमानविषयक पंख सिद्धांतावरील त्यांचे संशोधन कार्य १९१८-१९ मध्ये प्रकाशित झाले. असेच संशोधन कार्य स्वतंत्रपणे एफ्‌. डब्ल्यू. लँचेस्टर यांनीही केले होते व त्यामुळे ते लँचेस्टर-प्रांट्ल पंख सिद्धांत म्हणून प्रसिद्ध आहे. प्रांट्ल यांनी आकार्यता सिद्धांत [⟶ आकार्यता] व वातावरणविज्ञान या विषयांवरही लेखन केले होते. ते गटिंगेन येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.