दिक्सूचक : (कंपास). दिशा दाखविणारे किंवा एका संदर्भ दिशेपासून इतर दिशा दाखविणारे साधन.
दिक्सूचक पुष्कळ प्रकारचे आहेत. एकात चुंबकीय सूचीचा उपयोग करतात, त्यास चुंबकीय दिक्सूचक म्हणतात. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे दिक्सूचकातील क्षैतिज (क्षितिजसमांतर) पातळीत फिरू शकणारी चुंबकीय सूच उत्तर–दक्षिण दिशा दाखवते. दुसऱ्यात ⇨ घूर्णीचा (जायरोस्कोपचा) उपयोग करतात, त्यास घूर्णी दिक्सूचक म्हणतात. कोनीय संवेगाच्या (पदार्थाचा कोनीय वेग व त्याचे निरूढी परिबल यांच्या गुणाकाराच्या निरूढी परिबल हे पदार्थाने कोनीय प्रवेगाला केलेल्या विरोधाचे माप असते) अक्षय्यतेच्या तत्त्वानुसार तो निश्चित दिशा दाखवितो. तिसऱ्यात घूर्णी व चुंबकाचा (वा चुंबकीय संचाचा) उपयोग केला जात असल्यामुळे त्याला घूर्णी–चुंबकीय दिक्सूचक म्हणतात. सूर्य किंवा तारे दिसत असल्यास त्यावरून दिशा दाखविणाऱ्या साधनास खगोलीय दिक्सूचक म्हणतात. फार पुरातन काळी जेव्हा चुंबकीय किंवा घूर्णी दिक्सूचक नव्हते व जेव्हा आकाश पूर्णपणे अभ्राच्छादित असून आकाशस्थ गोल दिसणे शक्य नसे, तेव्हा निरनिराळ्या वाऱ्यांच्या वाहणाच्या दिशेवरून खलाशी दिशा ठरवीत. ही क्रिया जणू पवन–दिक्सूचकासारखीच होत होती, असे म्हणण्यास हरकत नाही. चुंबकीय दिक्सूचकाच्या सुरुवातीच्या काळात त्याचा उपयोग दिशा ठरविण्यापेक्षा वाऱ्याने दाखविलेल्या दिशेचा पडताळा पहाण्याकडे केला जात असे. यावरून वाऱ्यांच्या दिशेचे महत्त्व कळून येते.
चुंबकीय दिक्सूचक : अयस्कांताचा (मॅग्नेटाइट या खनिजाच्या एका प्रकारचा) लहान तुकडा हवेत टांगून ठेवला, तर तो उत्तर–दक्षिण दिशेत स्थिर होतो, हे फार पूर्वीपासून अनेक देशांतील लोकांनी ठाऊक होते अगदी सुरुवातीचा चुंबकीय दिक्सूचक म्हणजे असा तुकडा पाण्यावरील तंरगत्या लाकडावर ठेवून दिशा ठरविली जात असे. सु. तेराव्या शतकाच्या मध्यास लोखंडाच्या सूचीवजा लहान तुकड्यावर अयस्कांत घासून त्याची चुंबकीय सूची बनविण्यात आली व तिला मध्यावर टेकूवर ठेवून तिच्या खाली रेखांकित वर्तुळाकृती मापनपट्टी ठेवण्यात आली त्यामुळे दिशा ठरविण्यास मदत होऊ लागली. तथापि त्या काळी व नंतरच्या काही शतकांपर्यंत चुंबकत्व निर्माण करण्याची चांगली पद्धती माहीत नव्हती. तसेच अयस्कांत घासून तयार केलेले चुंबकत्व फार काळ टिकत नसे पुन्हा सूचीला बरोबर मध्यावर–कीलकावर (टेकूवर)–ठेवण्यातही बऱ्याच अडचणी येत असत.
सोळाव्या शतकात दिक्सूचकात थोडी सुधारणा झाली. एकाऐवजी दोन वा अधिक सूची वापरण्यात येऊ लागल्या सूची बरोबर मध्यावर कीलकावर ठेवण्यासाठी दोन सूचींचे उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव एकमेंकास जोडत व मधल्या भागांना थोडा अंड्यासारखा आकार देत. तरीदेखील अशा सूचीचे चुंबकीय परिबल [ → चुंबकत्व] असमान रहात असल्यामुळे दिशा ठरविण्यात चुका रहात असत.
अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविन नाइट यांनी सूची करण्यासाठी चांगल्या पोलादाची निवड करून अधिक शक्तिमान चुंबकीय सूची बनविल्या पण त्यांनी एकाच सूचीचा वापर केला. मध्यावर एक टोपी स्क्रूच्या साहाय्याने घट्ट बसवून ती कीलकावर ठेवून त्यांनी पूर्वीपेक्षा पुष्कळ चांगले दिक्सूचक तयार केले. या दिक्सूचकाचे १८७३ मध्ये त्यांनी एकस्व (पेटंट) घेतले.
चुंबकीय दिक्सूचकामध्ये भिन्नभिन्न उपकरणीय भाग असले, तरी त्या सर्वांचे कार्य म्हणजे पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राच्या क्षैतिज घटकाची दिशा दाखविणे हे असते. टेकूवर आधारलेल्या चुंबकीय सूचीच्या दिक्सूचकास खलाशांचा दिक्सूचक वा होकायंत्र म्हणतात. त्याचे सामान्यतः वापरात असलेले दोन प्रकार म्हणजे (१) निर्द्रव दिक्सूचक (२) द्रव दिक्सूचक हे होत.
केल्व्हिन निर्द्रव दिक्सूचक : विल्यम टॉमसन (लॉर्ड केल्व्हिन) यांनी शोधून काढलेला हा दिक्सूचक १८७६ मध्ये वापरात आला. त्याचा उपयोग विशेषेकरून व्यापारी जहाजावर करीत. या दिक्सूचकाची रचना पुढीलप्रमाणे असते. यात सु. २५ सेंमी. व्यासाचे एक ॲल्युमिनियम धातूचे कडे असून त्याच्या मध्यभागी राहील, अशी दुसरी लहान ॲल्युमिनियमाची चकती अरीय दिशेने जाणाऱ्या रेशमी दोऱ्यांनी कड्याला जोडलेली असते. चकतीच्या मध्यभागी नीलमण्याची (किंवा माणकाची) एक टोपी बसविलेली असून तिच्या खाली प्रत्येक बाजूस, चारचार अशा चुंबकीय सूची परस्परांस समांतर राहतील, अशा रीतीने बाहेरच्या कड्यास रेशमी दोऱ्याने जोडलेल्या असतात. कड्यावर रेखांकित वर्तुळाकार मापनपट्टी बसविलेली असते. चकतीवरील टोपी ऑस्मियम–इरिडियम मिश्रधातूचे टोक असलेल्या पितळी कीलकावर बसविलेली असते. कड्याची व सूचींची रचना आ. १ मध्ये दाखविली आहे. एका अर्धगोलाकृती पितळी भांड्यात हे सर्व ठेवले असून भांड्याचे बूड स्थिरतेसाठी जड केलेले असते. भांड्याच्या बुडाच्या मध्यभागी कीलक पक्का बसविलेला असतो. भांडे कड्याच्या धारव्यांत (आधारात) धरलेले असून एका अचुंबकी चित्याकृती ठोकळ्यात बसवून त्याच्या झरोक्यातून निरीक्षणे घेता येतात. तथापि अशा प्रकारचा दिक्सूचक हादऱ्याने किंवा गोळीबाराच्या धक्क्याने बिघडू शकतो. म्हणून युद्धनौकांवर या दिक्सूचकाऐवजी दुसऱ्या प्रकारचा म्हणजे द्रव दिक्सूचक वापरतात.
द्रव दिक्सूचक : याचा उपयोग आरमारी नौकांत जास्त प्रमाणात होतो. निर्द्रव दिक्सूचकाप्रमाणेच याचीही रचना असते. यातील चकती अभ्रकाची बनविलेली असून तीवर सव्य दिशेने (घड्याळाचे काटे फिरतात त्या दिशेने) उत्तरेस शून्यांशापासून सुरुवात करून अखेर ३५९° पर्यंत अंशांकन केलेले असते. ही चकती द्रवात तरंगणाऱ्या एका पदार्थाला (प्लावकाला) जोडलेली असून त्यालाच चुंबकीय सूची जोडलेल्या असतात. तरंगणाऱ्या पदार्थाच्या मध्यभागी पोकळी असून तिच्या खालच्या बाजूने व चकतीच्या मध्यावर बरोबर येईल अशा रीतीने एक बारीक दांडा बसविलेला असतो. दांड्याच्या चकतीजवळच्या भागापाशी एका खोबणीत एक रत्नाचा खडा घर्षण कमी करण्यासाठी बसविलेला असून तो कीलकावर टेकला जातो. कीलकाचे टोक ऑस्मियम–इरिडियमाचे बनविलेले असते. वरील रचना भांड्यात बसविली असून त्याच्या बुडापासून कीलक सरळ वरपर्यंत पक्का केलेला असतो. त्याच्या वर एकापेक्षा जास्त बहुधा दोन किंवा चार लहान चुंबकीय सूची वापरलेल्या असतात. दोन सूची वापरल्या असल्यास त्याचे समध्रुव चकतीच्या मध्याशी ६० अंशांचा कोन अंतरित करतील अशा तऱ्हेने बसवितात व त्याच चकतीवरील उत्तर–दक्षिण दिशांना समांतर ठेवतात. चुंबकीय कडे वापरल्यास त्याचाही अक्ष असाच ठेवावा लागतो. ह्या सगळ्या फिरत असणाऱ्या संचाला एक विशिष्ट निरूढी परिबल असते व ते क्षैतिज पातळीतील कीलकातून जाणाऱ्या कोणत्याही रेषेभोवती सारखेच असल्यामुळे जहाजाच्या पुढे, मागे किंवा बाजूच्या झुकण्यामुळे येणारी अस्थिरता पुष्कळच कमी होते. चकती व चुंबकीय सूची प्लावकाला जोडलेल्या असल्यामुळे कीलकावर त्यांचा भार फारसा पडत नाही आणि त्यामुळे कीलकावरील घर्षण व त्याची झीज कमी होते. वरील भांड्यात शुद्ध पाणी व पाण्याच्या ३५% अल्कोहॉल यांचे मिश्रण घातल्यामुळे सागरी वातावरणात सामान्यतः आढळणाऱ्या तापमानात हे मिश्रण गोठत नाही किंवा उकळत नाही. भांड्यावर बसविलेल्या काचेवर मिश्रणाच्या प्रसरणाचा परिणाम होऊ न देण्यासाठी भांड्याच्या बुडाशी एक विशिष्ट योजना केलेली असते. जहाज वळताना होणाऱ्या भांड्यातील द्रवाच्या चक्राकार गतीचा परिणाम चकतीवर होऊ नये म्हणून भांड्याच्या व्यासापेक्षा तिचा व्यास बराच कमी ठेवलेला असतो. भांड्याच्या आतून त्याच्या तोंडापाशी व काचेच्या खाली चकतीच्या आणि कीलकाच्या पातळीतच ‘लबर बिंदू’ (संदर्भ बिंदू) दर्शक काटा बाहेर काढण्यात आलेला असतो. त्याच्या संदर्भाने जहाजाच्या गतीच्या दिशेचे निरीक्षण करण्यात येते.
कड्याच्या धारव्यांनी धरलेले हे भांडे त्यातील सर्व रचनेसह एका सु. एक मी. उंचीच्या पोकळ लाकडी ठोकळ्यात ठेवलेले असते. जहाजाच्या स्थिर व परिवर्तनीय चुंबकत्वामुळे दिक्सूचकात होणाऱ्या चुंकांचे निराकरण करण्याकरिता या ठोकळ्यात कायम चुंबक व मृदू लोखंडाचे गोळे ठेवण्याची व्यवस्था असते.
जहाजांचे चुंबकत्व आणि त्यामुळे दिक्सूचकात होणाऱ्या चुका व त्यांचे निराकरण : दिक्सूचकातील सूचीजवळ दुसरा चुंबकीय पदार्थ नेल्यास सूची उत्तर–दक्षिण दिशेपासून बाजूला ढळते. हे ढळणे चुंबकीय पदार्थाच्या चुंबकीय शक्तीवर, दिशेवर व अंतरावर अवलंबून असते.
जहाज बांधणीत पोलाद व लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात असल्यामुळे त्यांना चुंबकत्व प्राप्त होते. हे चुंबकत्व स्थिर व परिवर्तनीय अशा दोन प्रकारचे असते. परिवर्तनीय प्रकारचे चुंबकत्व जहाज जाण्याच्या दिशेवर आणि त्याच्या स्थानावर अवलंबून असते. ह्या चुंबकत्वामुळे दिक्सूचकाने दर्शविलेल्या दिशेत चुका होतात.
जहाजाच्या या दोन्ही प्रकारच्या चुंबकत्वाचे वियोजन (सदिशांच्या योगे विशिष्ट दिशांत भाग पाडणे) परस्परांस काटकोनात असलेल्या तीन घटकांत करता येते. त्यांपैकी दोन घटक क्षैतिज पातळीत असून एक जहाजाच्या लांबीच्या दिशेने आणि दुसरा त्याला लंब असतो. तिसरा घटक उदग्र (उभ्या) दिशेत असतो. या घटकांच्या सूचीवर होणाऱ्या परिणामाचे निराकरण करण्याकरिता या दिशेने कायम स्वरूपाचे चुंबक दिक्सूचकाच्या जवळपास ठेवल्याने (चुंबकाची शक्ती व अंतर गणिताने ठरवून) जहाजाच्या स्थिर चुंबकत्वाचा वरील दिशांत काढलेल्या घटकांचा परिणाम नाहीसा करता येतो पण जहाजाच्या भौगोलिक स्थानाप्रमाणे बदलत असतो, तरी जहाजाचा वापर केल्यापासून सु. वर्षभरात तो निश्चित होतो म्हणून हा परिणाम नाहीसा होण्यासाठी जे उपाय योजले असतात, त्यांची तपासणी दिक्सूचकावरून वर्षातून एकदा केली तरी चालते. गोळीबार किंवा तडित् आघात यामुळेही जहाजाच्या या चुंबकत्वात बदल होतो व पूर्ववत स्थिती येण्यास कित्येक महिने जावे लागतात.
दुसऱ्या म्हणजे परिवर्तनीय प्रकारच्या चुंबकत्वाचा किंवा प्रवर्तित चुंबकत्वाचा परिणाम बराच क्लिष्ट स्वरूपाचा असतो. या चुंबकत्वाच्या क्षैतिज घटकाच्या परिणामांचे निराकरण दिक्सूचकाच्या दोन्ही बाजूंस मृदु लोखंडाचे गोळे ठेवून करता येते. तसेच त्याच्या उदग्र घटकाने होणारा परिणाम मॅथ्यू फ्लिंडर्स यांनी शोधून काढलेला मृदु लोखंडाचा दंड उदग्र स्थितीत दिक्सूचकाच्या जवळ ठेवून नाहीसा करता येतो. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे जहाजात जसे प्रवर्तनाने चुंबकत्व निर्माण होते, त्याचप्रमाणे या मृदू लोखंडी गोळ्यांतही झाल्यामुळे जहाजातील प्रवर्तित चुंबकत्वाचा परिणाम नाहीसा करणे शक्य होते. तथापि दिक्सूचकातील चुंबकीय सूचीमुळेही गोळ्यांत प्रवर्तित चुंबकत्व येते व ते सूचीच्या चुंबकीय परिबलावर, तसेच गोळ्यांच्या सूचीपासूनच्या अंतरावर अवलंबून असते. लोखंडाचे गोळे सूचीपासून योग्य त्या अंतरावर ठेवून त्यांतील चुंबकत्वाचे निराकरण करता येते पण जहाज विषुववृत्तावरून जात असल्यास पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा क्षैतिज घटक मोठा होतो व त्यामुळे गोळ्यांत वाढलेले प्रवर्तित चुंबकत्व नाहीसे करता येत नाही.
कायम स्वरूपाचे चुंबक, फ्लिंडर्स यांचा मृदू लोखंडी दंड व मृदू लोखंडी गोळे दिक्सूचकाभोवती कसे व कोठे ठेवावयाचे हे गणिताने ठरवितात. जहाजाचे तोंड उत्तर, पूर्व, दक्षिण, पश्चिम या दिशांकडे करून क्षैतिज पातळीत ठेवावयाच्या कायम चुंबकांची जागा दिक्सूचकाशी अशी जुळवितात की, दिक्सूचकात चूक राहू नये. नंतर जहाजाचे तोंड ईशान्य, आग्नेय, नैर्ऋत्य व वायव्य या दिशांकडे करून लोखंडी गोळ्यांची जुळवाजुळव दिक्सूचकात चूक राहू नये असू करतात.
दिक्सूचकाने अचूक दिशा दाखवावी म्हणून जहाजात त्याची जागा फार काळजीपूर्वक निश्चित करावी लागते. जहाजाच्या काही भागांवर पोलादाचे वेष्टन असल्यामुळे त्याच्यापासून दिक्सूचक दूर ठेवणे इष्ट असते. अशा भागांच्या जवळपास ठेवल्यामुळे दिक्सूचकात होणाऱ्या परिणामाची दुरुस्ती करणे कठीण जाते. जहाजात दिक्सूचक कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवावा यासंबंधी काही नियमही तयार करण्यात आले आहेत.
विमानातील चुंबकीय दिक्सूचक : यात दोन कारणांनी चुका होतात. एक म्हणजे विमानाला बसणाऱ्या हादऱ्यांमुळे आणि दुसरे विमानाच्या प्रवेगामुळे. दिक्सूचक धक्का प्रतिबंधकांवर बसवून हादऱ्यांमुळे होणाऱ्या चुका टाळता येतात. आधुनिक विमानांचे वेग फार जास्त असल्यामुळे प्रवेगजन्य चुकाही मोठ्या होतात परंतु दिक्सूचकातील चुंबक–प्लावक या प्रणालीच्या गतीचे संदमन (आंदोलनाला विरोध) खूप वाढविल्यास ही चूक कमी होते. यासाठी चुंबकांना बारीक तारा टांगत्या ठेवून त्यांचे संदमन वाढवितात. त्याचप्रमाणे चुंबक कमी सामर्थ्याचे व हलके वापरतात. वैमानिकाला विमान चालविताना अनेक महत्वाच्या उपकरणांची वाचने घ्यावी लागत असल्याने त्याला दिक्सूचकाची वाचने सतत घेत राहणे मुश्किल असते. यासाठी सूचकाच्या मापनपट्टीला पंचपात्रासारखा पोकळ दंडगोलाचा आकार दिलेला असतो. समोर केलेल्या खुणेवर येणाऱ्या वाचनावरून विमानाच्या मार्गक्रमणाची दिशा कळते. विमानातील विविध विद्युत् उपकरणांचाही चुंबकीय दिक्सूचकावर परिणाम होत असतो. त्यामुळे विमानातून आता घूर्णी–चुंबकीय दिक्सूचकच मुख्यतः वापरले जातात.
घूर्णी दिक्सूचक : एखाद्या खूप वेगाने फिरणाऱ्या चक्राच्या (घूर्णीच्या) भ्रमण अक्षाची दिशा बदलण्याचा प्रयत्न केल्यास ते चक्र दिशाबदलाला विरोध करते म्हणजेच अवकाशातील आपल्या भ्रमण अक्षाची दिशा कायम ठेवू पहाते. या तत्त्वावर कार्य करणारा घूर्णी दिक्सूचक प्रथम जर्मनीमध्ये एच्. आन्श्यूट्स–केंफे यांनी १९०८ मध्ये तयार केला. पुढे अशीच उपकरणे ई. ए. स्पेरी (अमेरिका, १९११) व एस्. जी. ब्राऊन (इंग्लंड, १९१६) यांनीही तयार केली. आधुनिक घूर्णी दिक्सूचक अत्यंत भरवशाचे व अचूक असल्याने नौकानयनात दिशा दाखविणारे मुख्य उपकरण म्हणून ते सर्वत्र वापरले जाते.
आ.४ मध्ये या उपकरणाची ढोबळ रचना दाखविली आहे. १ हे जडचक्र २ या क्षितिजसमांतर भ्रमण अक्षाभोवती प्रचंड वेगाने (सु. १०,००० फेरे/मिनिट) फिरत ठेवलेले असते. हे चक्र ३ या तळाला जड असलेल्या पेटीत बसविले असून चक्रासह ही पेटी ४–४ या (२ ला लंब असलेल्या) क्षितिजसमांतर अक्षाभोवती फिरू शकते. ४–४ या अक्षाचे धारवे ५ या चौकटीक बसविलेले असून (या सर्व रचनेसह) ही चौकट ६ या उदग्र अक्षाभोवती फिरू शकते.
हे उपकरण विषुववृत्तावर ठेवून २ हा अक्ष पृथ्वीच्या भ्रमण अक्षाला समांतर (म्हणजेत दक्षिणोत्तर) करतात. मग घूर्णीचे भ्रमण सुरू केल्यास व घूर्णीवर बाह्यप्रेरणा कार्य करीत नसल्यास २ हा अक्ष नेहमी दक्षिणोत्तरच राहील. परंतु काही कारणाने अक्षाची दिशा दक्षिणोत्तर दिशेपासून आढळल्यास घूर्णी परांचन [→ घूर्णी] करू लागते व अक्षाचे उत्तरेकडील टोक एका उदग्र प्रतलात विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) मार्गाने फिरू लागते. त्याचबरोबर पेटीही आपल्या ४ या अक्षाभोवती आंदोलने करीत असते. ही आंदोलने संदमित केल्यास घूर्णीच्या अक्षाचे उत्तर टोक आ. ५ मध्ये दाखविल्याप्रमाणे वलयाकार मार्गाने जाऊन शेवटी उत्तरेकडे येऊन स्थिर होते. पेटीचा आंदोलन काल सु. ८४ मिनिटे यावा अशी योजना असते. त्यामुळे ज्या वाहनावर हे उपकरण बसविलेले असेल त्याच्या प्रवेगामुळे दिशा दाखवण्यात येणारी त्रुटी दुर्लक्षणीय होते[→ घूर्णी].
संपृक्तनीय प्रवर्तक चुंबकीय दिक्सूचक : अत्याधुनिक अचूक दिक्सूचक या प्रकाराचे असतात. या दिक्सूचकाचा मुख्य गुण म्हणजे यात कीलकावर फिरणारी सूची नसते त्यामुळे तज्जन्य त्रुटीपासून ते मुक्त असतात. दुसरा फायदा असा की, अशा एका मुख्य सूचकाच्या वाचनाचे इतर ठिकाणी ठेवलेल्या दुय्यम सूचकांच्या ठायी तंतोतंत पुनरुत्पादन (विद्युतीय पद्धतीने) करता येते त्यामुळे जहाजावर वा विमानात विद्युतीय किंवा चुंबकीय विक्षोभ कमीतकमी असतील, अशा ठिकाणी मुख्य उपकरण ठेवतात व पुनरुत्पादक त्याचा जास्तीत जास्त उपयोग असेल तेथे बसवितात.
या दिक्सूचकाचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यातील एकाची केवळ तत्त्वतः रचना आ. ६ मध्ये दाखविली आहे.
पर्म–ॲलॉय (६८% निकेल व ३२% लोह) सारख्या चुंबकीय पार्यता [ → चुंबकत्व] जास्त असणाऱ्या द्रव्याचे दोन सारखे दांडे क्षितिजसमांतर ठेवून त्यांच्याभोवती दोन सारख्या तारेच्या गुंडाळ्या विरुद्ध दिशेने गुंडाळतात. आकृतीत दाखविल्याप्रमाणे विद्युत् मंडल करून ५ व ६ येथे सुयोग्य अशा प्रत्यावर्ती (उलटसुलट दिशेने वाहणाऱ्या) विद्युत् प्रवाहाचा उद्गम जोडतात (आदान) व ९–१० येथे मिळणाऱ्या प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाचे (प्रदानाचे) मापन करतात. जेव्हा १–२ यांना जोडणारी रेषा बरोबर चुंबकीय पूर्व–पश्चिम दिशेत असेल तेव्हा हे प्रदान शून्य येते. प्रत्यक्षात ९–१० येथील प्रदानामुळे एक विद्युत् चलित्र (मोटर) फिरू लागते व त्याच्यामुळे १–२ आपोआप फिरविले जातात. प्रदान शून्य झाल्याबरोबर हे फिरणे आपोआप थांबते [ → सेवा–यंत्रणा]. प्रत्यावर्ती विद्युत् प्रवाहाच्या साहाय्याने दांडे ठराविक काळाने पुनःपुन्हा परस्परांच्या विरुद्ध दिशेने चुंबकीय दृष्ट्या संपृक्त होतील (जास्तीत जास्त चुंबकित होतील) इतपत विद्युत् प्रवाहाचे मूल्य ठेवतात व यावरून या दिक्सूचकाचे नाव पडलेले आहे.
घूर्णी-चुंबकीय दिक्सूचक : वरील दिक्सूचकातील दांडे बिनचूक क्षैतिज पातळीत राहणे आवश्यक असते. हे साधण्यासाठी घूर्णीचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे चुंबकीय सूचीयुक्त दिक्सूचकाचा कीलक बिनचूक उदग्र राहणे जरूर असते, ही गोष्टही घूर्णीच्या साहाय्याने साध्य होते. अशा प्रकारच्या संयुक्त उपकरणाला घूर्णी–चुंबकीय दिक्सूचक म्हणतात. या प्रकारच्या दिक्सूचकाची अचूकता सर्वांत जास्त असते.
रेडिओ दिक्सूचक : विशिष्ट रेडिओ केंद्रापासून प्रेषित होणारे रेडिओ तरंग बरोबर कोणत्या दिशेने येतात, ते या यंत्राच्या साहाय्याने समजते. म्हणजेच त्या केंद्राच्या संदर्भात यानाची दिशा कळते.
पहा : मार्गनिर्देशन.
संदर्भ : Hine, A. Magnetic Compasses and Magnetometers, London, 1968.
भट, नलिनी पुरोहित, वा. ल.
“