वीन, व्हिल्हेल्म : (१३ जानेवारी १८६४–३० ऑगस्ट १९२८). जर्मन भौतिकीविज्ञ. त्यांचे पूर्ण नाव व्हिल्हेल्म कार्ल वेर्नर ओटो फ्रिट्‌स फ्रांट्‌स वीन (व्हीन) असे आहे. त्यांनी ⇨ऊष्मागतिकी तत्त्वांचा उपयोग करून कार्यक्षम ⇨कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या प्रारित ऊर्जेच्या तरंगलांबी वितरणासंबंधी तीन महत्त्वाचे नियम मांडले [→ उष्णता प्रारण]. या कार्यामुळे पुंज सिध्दांताचा विकास करण्यास माक्स प्लांक यांना बहुमोल मदत झाली [→ पुंज सिध्दांत]. अशा प्रकारे उष्णता प्रारणाचे नियंत्रण करणाऱ्या नियमांविषयीच्या शोधांबद्दल वीन यांना १९११ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले.

वीन यांचा जन्म गाफकेन (पूर्व प्रशिया) येथे झाला. त्यांनी गटिंगेन, हायड्‌लबर्ग आणि बर्लिन विद्यापीठांमध्ये अध्ययन केले. काही काळ ते हेर्मान एल्.एफ्. हेल्महोल्ट्‌स यांचे साहाय्यक होते. विविध विद्यापीठांत भौतिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले.

कृष्ण पदार्थाने उत्सर्जित केलेल्या प्रारित ऊर्जेचे तरंगलांब्यांच्या मोठ्या पल्ल्यात वितरण होते. यामध्ये एका मध्यवर्ती तरंगलांबीच्या ठिकाणी प्रारण अधिकतम असते. ही अधिकतम तरंगलांबी कृष्ण पदार्थाच्या निरपेक्ष तापमानाशी व्यस्त प्रमाणात असते, हा नियम वीन यांनी १८९३ मध्ये सांगितला. कृष्ण पदार्थाचे तापमान वाढल्यास सर्व तरंगलांब्यांच्या बाबतीत, उत्सर्जित ऊर्जा वाढते परंतु ती सारख्या प्रमाणात वाढत नसून लहान तरंगलांब्यांकडे तिच्या वितरणाचे अधिक विस्थापन होते. हा नियम ‘वीन विस्थापन नियम’ किंवा ‘ऊर्जा वितरणाचा वीन सिध्दांत’ या नावाने ओळखण्यात येतो. [→ उष्णता प्रारण].

ऋण किरण (इलेक्ट्रॉन शलाका), क्ष-किरण, ⇨धन किरण (धन विद्युत्‌ भारित आणवीय शलाका), जलगतिकी, प्रकाशकी इ. विषयांवरील वीन यांचे संशोधनात्मक निबंध सुप्रसिध्द आहेत. ऋण किरण हे ऋण विद्युत्‌ भारित कणांचे बनलेले आहेत, असे त्यांनी स्वतंत्र रीत्या सिध्द केले. तसेच या कणाचा विद्युत्‌ भार व द्रव्यमान यांचे गुणोत्तरही त्यांनी जे. जे. टॉमसन यांच्यापेक्षा निराळ्या पध्दतीने मिळविले [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान]. धन किरणांचे संशोधन करून या किरणांचे चुंबकीय व स्थिर विद्युत् क्षेत्रांमुळे विचलन होते, असे वीन यांनी दाखविले.

वीन Annalen der Physik या नियतकालिकाचे संपादक होते. Aus dem Leben und Wirken eines Physikers (इं. शी. फ्रॉम द लाइफ अँड वर्क ऑफ ए फिजिसिस्ट १९३०) हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिध्द आहे. ते म्यूनिक येथे मृत्यू पावले.      

भदे, व. ग.