पाशेन, फ्रीड्रिख : (२२ जानेवारी १८६५−२५ फेब्रुवारी १९४७). जर्मन भौतिकीविज्ञ. वर्णपटविज्ञानासंबंधी विशेष महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म श्व्हेरीन येथे झाला. त्यांचे उच्च शिक्षण स्ट्रॅस्‌बर्ग येथे आउगुस्ट कुंट यांच्या मार्गदर्शनाखाली (१८८४−८६) व बर्लिन विद्यापीठात (१८८६−८७) झाले. नंतर स्ट्रॅस्‌बर्ग येथे पुन्हा येऊन त्यांनी १८८८ मध्ये पीएच्.डी. पदवी मिळविली. या पदवीसाठी लिहिलेल्या प्रबंधात त्यांनी दोन विद्युत अग्रांमध्ये ठिणगी पडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विद्युत दाबासंबंधीचा त्यांच्याच नावाने प्रसिद्ध असलेला नियम प्रस्थापित केला. १८८८-९१ या काळात त्यांनी जे. डब्ल्यू. हिटोर्फ यांचे साहाय्यक म्हणून म्यून्स्टर येथे काम केले. त्यानंतर हॅनोव्हर येथे १८९१ मध्ये साहाय्यक अध्यापक आणि १८९५ मध्ये भौतिकी व छायाचित्रण या विषयांचे अध्यापक झाले. त्यांची १९०१ साली ट्यूबिंगेन विद्यापीठात आणि १९१९ साली बॉन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर फिजिकालिशटेक्निश राइशेनस्टाल्ट या बर्लिनमधील नामवंत संस्थेच्या संचालकपदावर त्यांची १९२४ मध्ये नेमणूक झाली परंतु १९३३ मध्ये नाझी राजवटीने त्यांना या पदावरून काढून टाकले. शॉलॅटिनबर्ग येथे आपल्या घरीच काही काळ संशोधन केल्यावर आणि तेथील घर व आपले संशोधनविषयक कागदपत्र १९४३ मध्ये बाँबहल्ल्यात नष्ट झाल्यावर अखेरीस ते पॉट्‌सडॅम येथे स्थायिक झाले.⇨ अवरक्त प्रारणाच्या वर्णपटाचा अभ्यास करण्यासाठी पाशेन यांनी तयार केलेली अतिसूध्मग्राही ⇨ गॅल्व्हानोमीटर व चतुर्थक विद्युत् मापक ही उपकरणे तसेच कार्ल रूंगे यांच्याबरोबर अंतर्वक ⇨ विवर्तन जालकासाठी तयार केलेली बैठक सुप्रसिद्ध आहेत. अनेक मूलद्रव्यांच्या रेखा वर्णपटांचे वर्गीकरण करण्यात त्यांनी यश मिळविले. निऑनाच्या वर्णपटाचे त्यांनी केलेले विश्लेषण व अवरक्त प्रारणातील हायड्रोजनाच्या वर्णपटातील ‘पाशेन श्रेणी’चा त्यांनी लावलेला शोध हे महत्त्वाचे ठरले आहेत. तीव्र चुंबकीय क्षेत्रामुळे होणाऱ्या वर्णरेषांच्या विभाजनासंबंधी त्यांनी व त्यांचे शिष्य एर्न्स्ट बॅक यांनी केलेल्या अभ्यासामुळेच पुढे ‘पाशेन-बॅक परिणामाचा’ शोध लागला [→ वर्णपटविज्ञान]. या परिणामाचा आणवीय संरचना व वर्णरेषांच्या उत्सर्जनाची यंत्रणा समजण्याकरिता नंतर उपयोग झाला.ते पॉट्‌सडॅम येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.