केटर,हेन्‍री : (१६ एप्रिल १७७७–२६ एप्रिल १८३५) इंग्लिश भौतिकीविज्ञ. लंबकासंबंधी विशेष कार्य. त्यांचा जन्म ब्रिस्टल येथे झाला. १७९४ साली ब्रिटिश सैन्यात त्यांनी प्रवेश केला व १७९९–१८१४ या काळात भारतात नोकरी केली. त्यावेळी झालेल्या भारताच्या त्रिकोणमितीय सर्वेक्षणात त्यांनी महत्त्वाचा भाग घेतला. रशियन सरकारने त्या देशात वापरात असलेल्या वजनांची आणि मापांची प्रमाणे निश्चित करण्यासाठी केटर यांची नेमणूक केली होती. १८१४ साली ते सैन्यातून निवृत्त झाले व पुढील काळ त्यांनी शास्त्रीय संशोधनासाठी खर्च केला. 

सेकंद लंबकाची लांबी अचूकपणे मोजण्यासाठी त्यांनी हायगेन्झ यांच्या तत्त्वानुसार आंदोलन मध्य व निलंबन (टांगण्याचा) मध्य यांची अदलाबदल करता येईल अशी योजना केलेला एक लंबक तयार केला. हा लंबक ‘केटर लंबक’ या नावाने ओळखण्यात येतो. ध्रुवापासून विषुववृत्ताकडे गुरुत्वाकर्षण कसकसे कमी होत जाते यासंबंधी त्यांनी संशोधन केले. तसेच तरंगत्या समांतरित्राचा (समांतर किरणांची शलाका मिळविण्याच्या प्रयुक्तीचा) शोध लावून ज्योतिषशास्त्रात महत्त्वाची भर टाकली. ते लंडन येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.