बेक्रेल, आंत्वान सेझार : (८ मार्च १७८८ – १८ जानेवारी १८७८). फ्रेंच भौतिकीविज्ञ. विद्युत् रसायनशास्त्रातील संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म शातीयों-सूर-लॉइंग येथे झाला व शिक्षण पॅरिस येथील एकोल पॉलिटेक्निकमध्ये झाले. सैन्यात अभियंता म्हणून त्यांनी काही काळ काम केले व १८१०-१२ या काळातील द्वीपकल्पीय युद्धात महत्त्वाची कामगिरी केली. त्यांना लिजन ऑफ ऑनरचे सरदार करण्यात आले पण शास्त्रीय संशोधन कार्याकरिता त्यांनी सैन्यातील नोकरी सोडली. १८३७ मध्ये म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरी या संस्थेत भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व याच पदावर त्यांनी मृत्यूपावेतो काम केले.

प्रथमतः त्यांनी खनिजविज्ञानात संशोधन केले. तथापि नंतर खनिजांच्या विद्युत् गुणधर्माच्या अभ्यासातून विद्युत् शास्त्रावरच संशोधन करण्याकडे त्यांचे लक्ष वळाले. रासायनिक विक्रियेद्वारे विद्युत् निर्मिती करण्यासंबंधीच्या नियमांवर त्यांनी महत्त्वाचे संशोधन केले व त्यामुळे त्यांना विद्युत् रसायनशास्त्राचे एक मूलभूत संशोधक मानण्यात येते. विद्युत् तापमापक विकसित करण्याच्या दृष्टीने त्यांनी प्लॅटिनम-पॅलॅडियम यांच्या संधीवर प्रयोग केले. त्यांनी स्वतंत्रपणे व आपल्या मुलाबरोबर (आलेक्सांद्र एद्माँ) तसेच ए. एम. अँपिअर, जे. बी. बायो यांसारख्या नामवंत शास्त्रज्ञांबरोबर प्राणिज उष्णता, वातावरणविज्ञान, विद्युत्, विद्युत् रसायनशास्त्र इ. विविध विषयांवर सु. ५२५ निबंध प्रसिद्ध केले. ते फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सचे १८२९ मध्ये सदस्य होते. विद्युत् विच्छेदनाच्या (विद्युत् प्रवाहाने पदार्थातील घटकद्रव्ये अलग करण्याच्या) तंत्राने लहान प्रमाणावर कृत्रिम रीतीने स्फटिकीय खनिजे तयार करण्याच्या प्रयोगकार्याबद्दल त्यांना रॉयल सोसायटीचे कॉल्फी पदक १८३७ मध्ये देण्यात आले. ते पॅरिस येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.