वजने व मापे: फार प्राचीन काळी म्हणजे जेव्हा मानव रानटी स्थितीतून साधारणतः नदीकाठी वसती करून राहू लागला, शेतीव्यवसाय व त्याला उपयोगी पडणाऱ्या जनावरचा सांभाळ करू लागला, तेव्हा परस्परांतील दळणवळण व देवघेव सुरू झाली व त्यासाठी त्याला वजनामापांची आवश्यकता वाटू लागली, हे उघड आहे. बहुधा धान्याची देवाणघेवाण करताना काही मापांची, तसेच धातूच्या पदार्थांची निर्मिती करताना काही वजनांची उत्पत्ती झाली असावी.

प्रस्तुत नोंदीत प्रामुख्याने वजनांच्या विकासाचा ऐतिहासिक आढावा घेतलेला असून ‘मेट्रिक पद्धती’ चा इतिहास त्यासंबंधीच्या स्वतंत्र नोंदीत दिलेला आहे. ‘एकके व परिमाणे’ तसेच ‘लांबी, क्षेत्रफळ व घनफळ यांची एकके’ या नोंदीही या संदर्भात पहाव्यात. 

मानवी समूहाची ठिकठिकाणी जसजशी प्रगती होऊ लागली, तसतशी सामाजिक, औद्योगिक, धार्मिक व राजकीय उलाढाली उत्तरोत्तर वाढू लागल्या त्यामुळे निरनिराळी वजनेमापे त्या त्या ठिकाणी प्रचलित होऊ लागली. अनेक प्रकारच्या वजनामापांची जडण घडण, अदलाबदल वा फेरफार राजकीय वर्चस्वामुळे अथवा त्यांतील निसर्गदत्त गुणधर्मामुळे किंवा उपलब्धतेच्या व निर्मितीच्या सोयीनुसार होऊ लागले. 

वजनामापांची निर्मिती नक्की कोठे, केव्हा व कशी झाली, हे सांगणे अशक्य प्रायच आहे. पुन्हा वजने अगोदर की मापे अगोदर निर्माण झाली हेही सांगणे कठीण आहे. तथापि वर लिहिल्याप्रमाणे दळणवळण व देवघेव यांमुळेच त्याची निर्मिती झाली असावी, असे म्हणणे चूक नाही. 

हल्ली तर लौकिक व्यवहारात काय किंवा शास्त्रीय संशोधनात काय वजने व मापे यांची पावलोपावली जरूरी असते. तांत्रिक विद्येची तशीच व्यवहारोपयोगी शास्त्राची उभारणी व वाढ अचूक मापनावर अवलंबून असल्यामुळे वापरात असलेली वजने व मापे ही प्रमाणभृत, सर्वमान्य, टिकाऊ व नेहमी उपलब्ध असतात. शास्त्रीय जगात एकाच प्रकारची वरील गुणधर्मांची वजने व मापे असणे म्हणजे मापनाची जणू काय एकच भाषा असणे होय. 

अतिप्राचीन कालखंडापासून म्हणजे इ. स. पू. सु. ७००० पासून इ. स. ४०० पर्यंतच्या मध्यपूर्व देशांची तशीच ग्रीक व रोमन लोकांची आणि इ. स. ५०० ते ८०० मधील अरबी राज्यांतील प्रथम वजनासंबंधीची माहिती खाली दिली आहे. 

ईजिप्त, सुमेरिया, ॲसिरिया व बॅबिलोनिया: जगातील अतिप्राचिन अशी दोन प्रकारची वजने ईजिप्तच्या उत्तर भागातील नाकडा या ठिकाणी असलेल्या पुरातन थडग्यांत सापडली आहेत. त्यांपैकी एक प्रकार इ. स. पू. ७००० चा व दुसरा प्रकार इ.स. पू. ५००० चा आहे, अशी कालगणना निश्चत झाली आहे. या कालखंडात दोन भिन्न संस्कृती अस्तित्वात होत्या. पहिल्या प्रकारची वजने चित्याकार (दंडगोलाकार) असून त्यांचे पायथे व माथे गोल केलेले असत, तर दुसऱ्या प्रकारात ती शंक्वाकार असून त्यांचे पायथे गोल केलेले असत. ही दोन्ही प्रकारची वजने चुनखडकापासून बनविलेली होती. तसेच दुसऱ्या प्रकारच्या वजनांच्या कालखंडात तांबड्या चुनखडकाचा बनविलेला एक सु. ८.५ सेंमी. लांबीचा पण पारडी नसलेला तराजूही सापडला आहे. वरील वजने ह्या तराजूची नसून ती मोठी व बीक्का पद्घतीवर आधारित होती. (आ. १). 

प्रत्यक्ष सापडलेली वजने एका ठराविक एककाच्या (हे एकक १२.२३ ग्रॅ. ते १३.६९ ग्रॅ. पर्यंत होते) पूर्ण पटीत असत. ह्या बीक्का पद्धतीवर आधारलेली वजने बहुधा सोन्याचांदीचे वजन करण्याकरिता वापरीत. ईजिप्तमधील ३,००० वर्षांच्या राजवटीत ती वापरात असल्यामुळे पुढे ग्रीक, रोमन व अरब लोकांनी ही वजने आपापल्या राजवटीत वापरात आणली. अलीकडच्या ब्रिटिश ट्रॉय वजनाचे मूल्य ही वरील उल्लेखित एककाच्या आधारावर म्हणजे १९२ ग्रेन (१२.४४ ग्रॅ.) असे निश्चित करण्यात आले आहे.  


आ. १. ईजिप्तमधील राजवंशपूर्व काळातील चुनखडकाचा तराजू व वजने (इ. स. पू. सु. ७००० ते ५०००).आ. २. बॅबिलोनियातील बदकासारख्या व इतर आकारांची वजने.इ. स. पू. ३५०० पासून ईजिप्तमधील ⇨हायरोग्लिफिक लिपी व सुमेरियातील ⇨क्युनिफॉर्भ लिपी यांमुळे मानवी इतिहासास निश्चितता आली. वजने व मापे यांची चित्रे व प्रत्यक्ष महत्त्वपूर्ण पुरावा मिळू लागला. उदा., ईजिप्तच्या तिसऱ्या राजवंशातील इ. स. पू. सु. २६८६ मधील नेटरकेट या राजांचे उच्च अधिकारी हेसी यांच्या साकारा येथील पिरॅमिडांच्या जवळील थडग्याच्या प्रवेशद्वाराजवळील भिंतीवर चित्रे काढली आहेत. त्यांत दोन लाकडी तराजू असलेली पेटी आणि काळ्या दगडाची केलेली व वजनाचे मूल्यांक असलेली अनेक वजने दाखविली आहेत. या चित्रातील तराजू व इ. स. पू. सु. ५००० मधील तराजू यांच्या रचना सारख्याच आहेत. फक्त चित्रातील एका तराजूची लांबी सु. २०.३२ सेंमी. व दुसऱ्याची ३४.२९ सेंमी. आहे. वजने मात्र पूर्वीच्या आकाराची नसून ती काळ्या दगडाची सपाट व चौकानी आहेत. त्यांवर त्यांचे मूल्यांक मांडले असून त्यात चढत्या श्रेणीने एककाच्या १०० पटींपर्यंत असणाऱ्या वजनांचा एक गट आहे. या काळातील वजने दगडाची पण तांबड्या चुनखडकापासून ते खऱ्या अधिक कठीण अशा बेसाल्ट, डायोराइट व हेमॅटाइट दगडांची केलेली आढळतात. वजनाच्या आकारतही पहिल्या राजवंशापासून (इ. स. पू. सु. ३१००) ते अकराव्या-बाराव्या राजवंशापर्यंत (म्हणजे इ. स. पू. २१३३–१७८६) बरेच फरक पडत गेले. सुरूवातीस चौकोनी व धारदार कडा असल्यापासून ते पुन्हा चौकोनी पण गोल माथा व कडा किंचित गुळगुळीत असे वजनांच्या घडणीत बदल होत गेले.  

सोने मोजण्यासाठी बीक्का आधारित दुसऱ्या वजनाचा प्रकार प्रमाणभूत म्हणून समजला जात असे. यातील काही सुंदर नमुने व त्यांवर हायरोग्लिफिक पद्धतीने मूल्यांकांची नोंद केलेली वजने सापडली आहेत. तेराव्या ते सतराव्या राजवंशांतील (इ.स. पू. १७८६–१५६७) वजने केवळ काळ्या हेमॅटाइट दगडाचीच असत व आकार नागपुरी बोरासारखा असून साधारण मध्यभागी ती घरंगळू नयेत म्हणून सपाट केलेली असत.

वरील कालखंडात सुमेरिया व बॅबिलोनिया देशांत वरील प्रकारच्या दगडापासून केलेली वजने वापरीत असत पण त्यांचे आकार एखाद्या निद्रिस्त बदकासारखे असून त्याचे डोके व चोच मागे वळवलेली असे. बदकाचे आकार असलेली काही वजने काही ग्रॅमपासून ते ६०.५५ किग्रॅ. इतक्या मोठ्या वजनाची असत. त्यावर ‘उरनिन-गिर-सु’ (लेगॅशचे राजे) हे नाव कोरलेले असे. ह्या राज्यांचा काळ इ. स. पू. सु. २५३० होता. मोठ्या वजनावर राजांच्या नावाबरोबर ‘दोन टॅलेंट’ असा वजनाचा मूल्यांकही असल्याचे दर्शविलेले असे. 


इ. स. पू. सु. २०००–१८०० च्या दरम्यान सुमेरियामधील ईरेक व अर येथे तर अगदी चकमकीत व गुळगुळीत अशा हेमॅटाइटाच्या दगडाचीच नागपुरी बोरासारखी पण सपाट भाग नसलेली वजने तयार करण्याची प्रथा होती नंतरच्या कालखंडात पुन्हा परत बदकाच्या आकाराची व काळ्या हेमॅटाइट दगडापासून वजने बनविण्यात येऊ लागली. 

आ. ३. ईजिप्तमधील नाईलवरील थीब्झ येथील ॲमन देवाच्या मंदिरातील भित्तिचित्रामधील तरजाजूवर सोन्याच्या लहान दंडगोलाकार पिंडाचे पशूच्या आकाराची ब्राँझाची वजने वापरून वजन करण्याचे दृश्य.ईजिप्तमध्ये इ. स. पू. १५०० ते १४५० या दीड शतकात तिसऱ्या थटमीझ यांच्या कारकीर्दीत थीब्झ येथील ॲमन देवाच्या मंदिरातील भिंतीवर चितारलेला एक मोठा तराजू आहे. कित्येक शतकांपूर्वी सापडलेल्या तराजूपेक्षा या कालखंडातील तराजूत चांगलीच सुधारणा झालेली दिसते व वजन करण्याच्या संवेदनक्षमतेतही प्रगती झाल्याचे आढळून येते. उत्तर ईजिप्तमधील टेल एल अमार्ना येथे इ. स. पू. सु. १३७० ते १३५० मधील वापरात असलेला एक तराजूच सापडला आहे. त्याच्या लाकडी दांडीची लांबी ३० सेंमी. असून पारडी ब्रांझाची केलेली आहेत आणि प्रत्येकी पारड्यात ६.४८ ग्रॅ. वजन असताना सु. १३० मिग्रॅ. इतकी व १२.९६ ग्रॅ. वजन असताना २६० मिग्रॅ. इतकी तफावत पडण्याची त्यात संवेदनक्षमता असल्याचे आढळून आले आहे. 

आ. ४ ईजिप्तमधील गोलाकार माथा असलेली वजने (इ. स. पू. सु. १२००–३००). इ. स. पू. पंधराव्या ते बाराव्या शतकापर्यंच्या काळात ईजिप्तमध्ये वजनाच्या जडणघडणीत फारच बदल झाले. दगडाच्याऐवजी ब्राँझ वापरात येऊ लागले व भूमितीय आकारांऐवजी पशुपक्ष्यांचे आकार, त्यातल्या त्यात विसावा घेणाऱ्या बैलाच्या किंवा वळूच्या डोक्याचा आकार विशेषकरून वजनाला देण्यात येऊ लागला. याच कालखंडात सिरिया व ईजिप्तमधील व्यापारी मोठ्या प्रमाणात तराजू व वजने वापरीत होते, असे देखावे थीब्झ येथील थडग्यांच्या भिंतीवर आढळले आहेत. तत्पूर्वी तराजूचा उपयोग राजेरजवाडे, मोठे मोठे अधिकारी व देवळे यांना लागणाऱ्या सोन्याचांदीच्या वजनासाठीच करीत असत. नंतरच्या काळात ईजिप्तमध्ये तूंतांखामेन राजांच्या मृत्यूनंतर म्हणजे इ. स. पू. १३५० नंतर पुन्हा दगडाची विशेषतः अतिकठीण अशा ग्रॅनाइट दगडाची वजने तयार करण्याकडे प्रवृत्ती वाढली. दगडाची वजने जास्त टिकाऊ असल्याचे आढळले. अतिप्राचीन काळातील वजनासंबंधी विशेषत्वाने लिहावयाचे झाल्यास ती दगडाची होती असेच म्हणावे लागेल. तसेच इ. स. पू. चौदाव्या शतकापासून वापरात असलेल्या आकाराबाबत लिहावयाचे झाल्यास ती तळाला सपाट व वरच्या बाजूकडे तिरपी होत जाऊन माथा मात्र गोल असे. पुढे इ. स. पू. सहाव्या शतकात वजनाच्या सांधणाऱ्या भागाची कडा मात्र धारदार ठेवलेली असे. ह्या काळातील वजनाची कारागिरी उत्तम असून ती मुलायम व चकचकीत असत. काही ग्रॅमपासून ९ किग्रॅ. पर्यंत अशी वजने असत. काही वजने घनाकार असून त्यांतील काहींच्या कडा व कोपरे धारदार व टोकदार असत, तर दुसऱ्या काहींत कडा व कोपरे गोल केलेले असत पण अशी वजने सु. ०.४५ किग्रॅ. पेक्षा जास्त वजनाची क्वचितच असत. 

आ. ५. ॲसिरियातील सिंहाच्या आकाराची वजने. ईजिप्तमध्ये ब्राँझाची वजने करण्याची प्रथा मोडली जाऊन तेथे पुन्हा दगडाची वजने तयार होऊ लागली, तर इ.स. पू. आठव्याशतकात दगडाची वजने करण्याचे सोडून टायग्रिस नदीच्या उत्तरेकडील ॲसिरिया राजवटीने ब्राँझाची तशीच तांब्याची वजने प्रचारात आणली. या वजनांचा आकार विसावा घेत असलेल्या कलापूर्ण व जातिवंत भासावा अशा सिंहाचा असे. अशा सौंदर्यपूर्ण सिंहाकृती वजनांचा एक संपूर्ण संच ॲसिरिया राजांच्या, इ. स. पू. ७४५ ते ७०५ या कालखंडात तयार झालेला, निमरूद येथील राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी सापडला आहे. मोठ्या वजनांना उचलण्यासाठी ब्राँझाच्या मुठी असून लहान वजनांना छोट्या गोल कढ्या असत, सिंहाकृती वजने अर्ध्या शेकेल (सु. ४.१५ ग्रॅ.) पासून ते २ टॅलेंट म्हणजे ६०.३०३ किग्रॅ.पर्यंत सध्याच्या मोसूल गावाजवळील खोर्साबाद या प्राचीन नगरीच्या अवशेषात सापडली आहेत. ॲसिरियाच्या या धर्तीच्या वजनांची नावे अशी: १ टॅलेंट=६०मिना, १ मिना=६० शेकेल, शेकेलचे वजन सु. ८.३६ ग्रॅ. होते या पद्धतीला पुढे ‘डारिक’ असे नाव पडून तिची मूळ सुरूवात सुमेरियन लोकांनी केली आणि ती बॅबिलोनियन व ॲसिरियन लोकांनी वापरात आणली. 

ईजिप्त, सुमेरिया, बॅबिलोनिया व ॲसिरिया या देशांतील प्राचीन काळातील वजनांचा त्रोटक इतिहास वर दिला आहे. या देशांतील निरनिराळी वजने ब्रिटिश संग्रहालयांत ठेवलेली आहेत. प्रत्यक्षात सापडले नसेल, तरी बॅबिलोनिया, ॲसिरिया या देशांतही तराजू वापरात होते, याचे पुरावे मिळाले आहेत. 

प्राचीन काळात मध्यपूर्वेतील निरनिराळ्या देशांत वापरात असलेल्या प्रमाणभूत वजनांत शेकेल व मिना ही नावे सर्वत्र असत. फक्त ईजिप्तमध्येकेडेट हे एकक धरून त्याच्या दसपटींत डेबेन (१० केडेट), सेप (१०० केडेट) ही प्रचारात होती. प्रमाणभूत वजनांच्या मापन पद्धतींची नावे देशावर पुढीलप्रमाणे होती : (१) पेएम (पॅलेस्टाइन, इझ्राएल) (२) डारिक (सुमेरिया, बॅबिलोनिया, ॲसिरिया) (३) स्टेटर (आर्य, अकिअन) (४) केडेट (ईजिप्त) (५) नेसेफ (सिरिया) (६) खोरिन (पर्शिया-चांदीकरिता) (७) बीक्का (ईजिप्त-सोन्यासाठी) (८) सेला (फिनिशिया). वरीलपैकी २, ३ व ७ या पद्धतींचा पुढील कित्येक शतके प्रभाव पडला होता. 


ग्रीक वजने : येथे दोन प्रमुख व प्रमाणभूत वजने प्रतरात होती : एक म्हणजे ईजायना प्रमाण व दुसरे म्हणजे अथेन्स प्रमाण. 

(१) ईजायना प्रमाण हो बीक्का शेकेलपेक्षा थोडे कमी होते. १२.४४ ग्रॅ. वजनाचे एकक ठरवून त्याचे नाव ईजायना स्टेटर असे ठेवले होते. ह्या एककाच्या १/२ भागाला ड्राक्मा व १/१२ भागाला ओबोल अशी नावे होती. ड्राक्मा ६.२२ ग्रॅमांचा व ओबोल १.०३७ ग्रॅमाचा होता. तसेच १ मिना=५० स्टेटर=१०० ड्राक्मा=६२२.०८ ग्रॅ. असे. इ. स. पू. पाचव्या शतकापर्यंत ही वजने ब्राँझाची केलेली असत व नंतर इ. स. पू. चौथ्या शतकात ब्राँझाची व शिशाची  केली जात. ही वजने कासवाच्या आकाराची असत. फार मोठी वजने संगमरवरी दगडाची केलेली असत. व्यापारउदीमात वापरात असलेली वजने बिनचूक नसत, प्रत्यक्ष प्रमाणभूत वजन म्हणून शिक्का असलेली वजनेही चुकीची असत. नाही म्हणावयाला चांदी तोलण्यासाठी लागणारी वजने मात्र बरीच अचूक असत. 

(२) प्राचीन अकिअन स्टेटरवर आधारित असे अथेन्स प्रमाणाचे एकक होते. हे एकक ८.७५ ग्रॅ. वजनाचे असून वरील ईजायनाप्रमाणेच याच्या १/२ व १/१२ भागांना अनुक्रमे ड्राक्मा व ओबोल ही नावे होती. तसेच १ मिना=५० स्टेटर=१०० ड्राक्मा=४३७.५ ग्रॅ. होत. ही वजने शिशाची तशीच ब्राँझाची केलेली असून त्यांवर घुबडाचे चित्र कोरलेले असे. ईजायनसारखी या वजनांत फार चूक नसे. वजनांची मानके (प्रमाणभूत नमुने) जनतेच्या संदर्भासाठी अथेन्स शहरात ठेवलेली असत. त्याचबरोबर इतर देशांतील (उदा., पर्शिया, फिनिशिया वगैरे) मानकेही व्यपारी लोकांच्या सोईसाठी म्हणून ठेवलेली असत. वरील दोन्ही प्रकाराच्या एककांत १ टॅलेंट=६० मिना हेच प्रमाण धरलेले होते आणि वापरात असलेले तराजू ईजिप्तमध्ये इ. स. पू. पंधराव्या शतकात जे होते तसेच असत. 

रोमन वजने: रोमन लोकांत वापरात असलेली नाणी व वजने एकमेकांशी संबंधित असत. इ. स. पू. दहाव्या शतकापासून ब्राँझाच्या विपुलतेमुळे त्याचीच केलेली नाणी व वजने शेकडो वर्षे प्रचारात होती. ओबडधोबड आकाराची, अनियंत्रित वजनाची व शिक्काही नसलेली वजने वापरली जात. पुढे इ. स. पु. सु. ३३८ पासून मात्र निश्चित आकाराची व छाप असलेली नाणी त्याचप्रमाणे वजने रोमन व लॅटिन लोकांत प्रचारात आली. नाण्यांचे सहा प्रकार असत. त्यांतील एककाचे नाव ‘ॲस’ असून वजन इटुस्कन व ऑक्सन पौंडाएवढे म्हणजे ४,२१० ग्रेन (२७२.८१ ग्रॅ.) होते. १/२ भागाला सेमी, १/३ भागाला ट्राइन, १/४ भागाला काड्रन, १/६ भागाला सेक्सटन व १/१२ भागाला अनचीअ अशी नावे होती. वजने दगडाची व ब्राँझाची असत आणि वरील भागांनुसार केलेली असत. ब्राँझ नाण्यांची वजने उत्तरोत्तर कमी करण्यात आल्याने ॲस हे एकक इ. स. पू. २६८ मध्येवापरातून काढून टाकण्यात आले. त्याऐवजी चांदीचे दीनअरीअस हे नाणे प्रचारात आणले गेले. त्याचे वजन ४.७५ ग्रॅ. होते. ६ दीनेअराय=१ अनचीअ (२७.४१ ग्रॅ.), ७२ दीनेअराय=१ लिब्रा (पौंड), १ लिब्रा=१२ अचनीअ (औंस)=३२८.९ ग्रॅ. 

रोमन लोकांनी नंतर जे जे प्रदेश जिंकले त्या त्या प्रदेशांतील नाणी व वजनेच चालू ठेवली पण तेथील टाकसाळींना मात्र परवाने देण्याचे सुरू केले परंतु स्वतःची द्वादशमान पद्धत लादली. त्यामुळे त्या त्या देशांत रूढ असलेल्या एककाच्या भिन्न भिन्न गुणाकांना रोमन नावे लादली गेल्यामुळे कालांतराने गोंधळ होऊन रोमन लिब्राचे (पौंडाचे), तसेच अनचीआचे (औंसाचे)७–८ प्रकार झाले म्हणून रोमन लिब्रा म्हणजे निश्चित कोणते वजन हे सांगणे कठीण आहे. 

ब्रिटिश संग्रहालयात असलेल्या पुरातन रोमन वजनांचे वर्णन करणे शक्य आहे. ही वजने दगडाची तशीच ब्राँझाची असून दोन्ही वजनांचा आकार गोल असून माथा व पायथा सपाट असे. इ. स. पू. तिसऱ्या शतकापासून तो इ. स. पहिल्या शतकाच्या अखेरीपर्यंत वजनांच्या हाच आकार होता. सापडलेल्या नमुन्यात १० लिब्रापासून १/४ अनचीआपर्यंतची वजने आहेत. व्यापारधंद्यासाठी पुढील पद्धत रूढ असे: २ ओबोल=१ स्क्रिप्युलम (स्क्रूपल), २४ स्क्रिप्युला (स्क्रूपल)=१ अनचीअ व १२ अनचीअ=१ लिब्रा. 

अरवी वजने:इ. स. पाचवे ते आठवे शतक या कालखंडात अरब लोकांत वजनाच्या तीन पद्धती रूढ होत्या. या सर्व प्राचीन शेकेल या एकाकावर आधारित असून विशेषतः सोन्याचांदीची नाणी करताना वापरीत असत. शेकेल एककाचे १/२ भाग, १/४ भाग पाडलेले असत आणि या नाण्यांवर आधारलेली दगडाची व धातूची वजने तयार करीत. या तीन पद्धतींतील वजनाच्या एककांची नावे व मूल्ये पुढीलप्रमाणे आहेत: (१) दिनार (४.२१२ ग्रॅ.) सोने तोलण्यासाठी वापरीत. या एककाचे प्रमाण पर्शियन सुवर्ण डारिकच्या १/२ व ग्रीक ॲटिक सुवर्ण स्टेटरच्या १/२ असे. (२) दिऱ्हेम (२.९१६ ग्रॅ.) हे चांदी तोलण्यासाठी वापरीत. हे एकक पर्शियन रौप्य खोरिनच्या १/४ किंवा ॲटिक रौप्य स्टेटरच्या १/३ असे. (३) दिऱ्हेम (३.१८ ग्रॅ.) हे व्यापारधंद्यात किंवा सोन्याचांदीच्या लगडी तोलण्यासाठी एकक म्हणून वापरात असे. हे एकक ईजिप्तमधील बीक्का पद्धतीतील सोने तोलण्याच्या एककाच्या १/४ पट असे किंवा चांदी तोलण्यासाठी वापरीत असलेल्या ईजायना स्टेटराच्या १/४ पट असे. ह्या एककांचा अचूकपणा ±०.१३ ग्रॅ. या मर्यादेत इ.स. १२५९ पर्यंत टिकविण्यात आला होता. 

अरबांनी आपली एकके शेजारच्या ग्रीस, पर्शिया, ईजिप्त वगैरे देशांत प्रचलित असलेल्या एककांना सहजपणे भागू शकतील अशीच केली होती. वर उल्लेखिलेल्या दोन दिऱ्हेम एककांपासून दोन वजन पद्धती प्रचारात आल्या. त्यांची रचना व नावे तीच होती पण त्यांची वस्तुमाने संबंधित दिऱ्हेमच्या प्रमाणात होती. 

दिऱ्हेम एककाचे १६ भाग करून प्रत्येक भागास ‘किरत’ म्हणत. १० दिऱ्हेम=१ वुकीये=१ रोट्ल त्याचप्रमाणे १ किरत=३ हेब्बेह (जवाचे दाणे) किंवा ४ कांबेह (गव्हाचे दाणे) अशीही विभागणी केलेली होती. ब्रिटिश व यूरोपीय देशांतील नंतरच्या काळातील प्रमाणभूत वजनांवर सर्वांत जास्त प्रत्यक्ष प्रभाव पडलेल्या या सर्वांत पुरातन अरबी वजन पद्धती होत. 


अरबी प्रमाण वजनांचा यूरोपात प्रसार: अरबी खलिफा हारून-अल्-रशीद (इ. स. ७८६–८०९) यांनी शार्लमेन ७७१–८१४) राजांच्या दरबारी दूत पाठविले होते. शार्लमेन यांनी केलेल्या अंतर्गत सुधारणांमध्ये ७८९ मध्ये केलेल्या वजने व मापे यांतील सुधांरणांचा समावेश होता. हारून-अल्-रशीद यांनी परंपरेनुसार शार्लमेन यांना अरबी सुवर्ण दिनारावर आधारित नवीन प्रमाण वजने पाठविली होती. शार्लमेन यांची वजने १३५० पर्य़ंत अस्तित्वात होती. त्या वर्षी फ्रान्सचे राजे जॉन यांनी नवीन वजने प्रचारात आणली आणि त्यांत फ्रेंच मारकरिता शार्लमेन यांच्या पाईल एककाचा (१/५०) भाग प्रमाण ठरविला. मार हा आठ ऑसां(औसां) मध्ये विभागला होता व दोन भार म्हणजे एक लीव्ह्र किंवा पौंड होत असे. जॉन राजांची वजने पॅरिस येथे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. यांतील ५० भारांचे वजन १२,२३५.२१९ ग्रॅ. होते आणि यावरून लीव्हर किंवा २ मार=४८९.४१ ग्रॅ. असे मूल्य मिळते. फ्रान्समध्ये नाणी, सोनेचांदी व व्यापारी कामांसाठी हेच अधिकृत वजन म्हणून १३५० ते १७९० पर्यंत प्रचारात होते. 

फ्रेंच व इतर वजने: (आठवे ते एकोणिसावे शतक). मध्ययुगात वजन पद्धतींतील एकविधता कमी होत गेली. वजन एकके दोन देशांतच नव्हे, तर काही वेळा एकाच देशातील (उदा., फ्रान्समध्ये) प्रांताप्रांतांत व शहराशहरांत भिन्न असत.व्यापाऱ्यांच्या संघटनांमध्येही वजन एककांबाबत एकमत नसे. यामुळे चुका, लबाड्या व सातत्याने गैरसमज व तंटे उद्भवत. तथापि जुना रोमन पौंड यूरोपातील बहुतांश भागांत अठराव्या शतकापर्यंत वैद्यकीय आणि औषधीय कामासाठी वापरला जात होता, हे विशेष आहे. या पौडांचे विभाजन १२ औंस=९६ ड्राक्मा (ड्राम)=२२८ स्क्रूपल=५,७६० गव्हाचे दाणे असे केले जात असे. 

फ्रेंच वजने: पॅरिसमध्ये मेट्रिक पद्धती प्रस्थापित होईपर्यंत तेथील प्रमुख व्यापारी वजन एकक प्वे द मार हे होते. त्याचे पुढीलप्रमाणेविभाजन केले होते: १ लीव्ह्र=२ मार=१६ आँस=१२८ ग्रो=३८४ देन्झे=९,२१६ ग्रेन. लांगदॉक व आर्येझ प्रांतात निराळेच एकक प्रचलित होते. कॅरॅनझे हे एकक गोमांसाच्या वजनाकरिता वापरीत व ते सामान्य पौंडाच्या तिप्पट होते. १०० लीव्ह्रांचा क्विंटल अवजड व्यापारी वजनांकरिता वापरीत. जहाजातील मालाकरिता टन हे एकक वापरीत. टन द मीर हे प्वे मार पद्धतीतील २,००० लीव्ह्रांचे वजन होते. जुना रोमन पौंड पॅरिसमध्ये १७३२ पर्यंत औषधी वजनांकरिता वापरात होता. त्यानंतर त्याची जागा प्वे द मार पद्धतीतील लीव्ह्राने घेतली आणि ग्रो व ग्रेन यांची नावे द्राक्मे व स्क्रूपल अशी झाली. 

इतर देश: जागेच्या मर्यादेमुळे येथे फक्त काही देशांतील वजनांचीच माहिती दिलेली आहे. जर्मनीत मौल्यवान धातूंसाठी कोलोन मार्क हे प्रमाणभूत वजन १५२४ मध्ये ठरविण्यात आले. त्याचे विभाजन पुढीलप्रमाणे करण्यात आले होते: १ मार्क=८ औंस= १६ लॉथ=६४ क्विंटीन= २५६ फेनिग (किंवा डेनियर) = ४,३५२ एशेन. व्यापारी वजनांच्या बाबतीतही हेच विभाजन प्रचारात होते आणि त्यांतील दोन मार्कांच्या पौंडाचे वजन ७२१६ इंग्लिश ग्रेन (= ४६८ ग्रॅ.) होते. 

सोने व चांदी यांकरिता वापरण्यात येणाऱ्या फ्लॉरेन्स पौंडाचे विभाजन पुढीलप्रमाणे होते: १२ औंस=९६ ड्राक्मा=२८८ दिनारी=६,९१२ ग्रेन(=४४८ ग्रॅ). सर्व प्रकारच्या व्यापारी मालासाठी हेच वजन कायदेशीर होते. स्पेन व त्याच्या सर्व वसाहतींत कॅस्टिलचे मार्क वजन कायदेशीर होते. (१) मार्क=८ औस=६४ ओखावा=१२८ अडार्म=३८४ टोमीन=४,६०८ ग्रेन (= २९८.६ ग्रॅ.). (२) मार्क=१ पौंड=७,१०० इंग्लिश ग्रेन (= ४६० ग्रॅ.). हाच मार्क सोन्याचे वजन करण्याकरिता वापरीत पण त्याचे विभाजन निराळ्या प्रकाराने केलेले असे. १ क्विंटल = ४ अरोबा = १०१.४ इंग्लिश पौंड. 

चिनी व्यापारी मालाचे मुख्य वजन पेकल हे होते. १ पेकल=१०० कॅटी=१३३.३ इंग्लिश पौंड १ कॅटी=१६ टील=१,६०० काँडोरीन. 

इंग्लिश वजने: (आठवे ते एकोणिसावे शतक). मर्शियाचे राजे ओफा (७५७–९६) यांचा अरबी नाण्यांशी संपर्क आला होता. त्यांनी सुरू केलेल्या नवीन नाण्यांत २२.५ ग्रेन (१.४६ ग्रॅ.) वजनाची चांदीची पेनी मूलभूत होती. ही नाणी १३४४ पर्यंत इंग्लिश नाण्यांना व १५२७ पर्यंत वजन पद्धतीला प्रमाणभूत होती. ही पेनी ‘पेनी स्टर्लिग’ या नावाने ओळखण्यात येऊ लागली व ती अरबी रौप्य अर्ध्या दिऱ्हेमवर (या काळात याचे वजन सरासरी २२-२३ ग्रेन होते) आधारित होती. ही वजन पद्धती तंतोतंत अरबी पद्धतीप्रमाणे होती पण तिच्यातील औंस २० पेनींच्या (प्रत्येकी २२.५ ग्रेन) वजनाबरोबर होता आणि पौंड १२ औंसाचा (प्रत्येकी ४५० ग्रेन) म्हणजे एकूण ४५० ग्रेनांचा होता. हा पौंड प्रथम नाणी पाडणाऱ्यांचा पौंड व नॉर्मन विजयानंतर टॉवर पौंड म्हणून ओळखला जाऊ लागला. रौप्य पेनीच्या नाण्यांचा वजन म्हणून बऱ्याचदा उपयोग करीत. या पौंडाची प्रत्येकी २२.५ ग्रेन वजनाची २४० रौप्य पेनीची नाणी तयार करीत. अँल्फ्रेड द ग्रेट यांच्या कारकीर्दीत (८७१–९९) रौप्य पेनीचे वजन सरासरी २४.५ ग्रेन इतके वाढविण्यात आले. त्यानंतर हे वजन हळूहळू कमी करण्यात येऊन एडवर्ड द कनफेसर (१०४२–६६) यांच्या काळापावेतो ते पुन्हा मूळ २२.५ ग्रेनपर्यंत खाली आणण्यात आले. टॉवर पौंड वजन पद्धती १५२७ मध्ये ट्रॉय पद्धतीने तिची जागा घेईपर्यंत चालू राहिली.  

तिसरे हेन्री यांनी १२६६ मध्ये अध्यदेशाद्वारे पौंडाची निश्चित व्याख्या ठरविली. तथापि प्रत्यक्षात रौप्य पेनी पूर्वीप्रमाणेच २२.५ ग्रेनांची राहिली आणि नाण्यांचा पौंड ५,४०० ग्रेनांचा व व्यापारी पौंड ६,७५० ग्रेनांचा राहिला. या अध्यादेसातील १५ औंसांचा पौंड विसंगत वाटतो पण तो चांदी व व्यापारी मालासाठी वापरात असलेल्या प्राचीन ॲटिक मिनावर (१३५ ग्रेनांचे ५० स्टेटर =६,७५० ग्रेन किंवा ४३७.५ ग्रॅ.) आधारलेला होता. कारण हे वजन भूनध्य सामुद्रिक व्यापारात आणि तेराव्या शतकापावेतो पश्चिम यूरोपातील पवित्र रोमन साम्राज्यातील व इंग्लंडचे व्यापारी संबंध असलेल्या जर्मन शहरांत मोढ्या प्रमाणात वापरात होते. सर्व उत्तर जर्मन व बाल्टिक किनाऱ्यावरील हॅन्सिॲटित लीगच्या शहरांत रौप्य दिऱ्हेम प्रमाणावर (४५० ग्रेनांचा औंस) आधारलेली नाणी आणि व्यापारी वजन पद्धती वापरात होती. पण त्यांनी ३,६०० ग्रेनांचा (२३३.२८ ग्रॅ.) आठ औंसांचा मार्क नाण्यांकरिता व ७,२०० ग्रेनांचा १६ औंसांचा पौंड व्यापारी वजनासाठी स्वीकारला होता. यामुळे आठव्या हेन्रींनी व्याख्या केलेला पौंड व्यापारी विनिमयाचा समान पाया ठरला, कारण इंग्लंडची मुख्य निर्यात कच्चा लोकरीची होती व तिचे प्रमुख ग्राहक जर्मन शहरे होती. 


ॲव्हर द पॉइझ वजन: (१३४०). ॲव्हर द पॉइझ ही संज्ञा मूलतः अवजड मालाच्या वजनाकरिता वापरात आली व या मालाचे वजन त्याच्या किंमतीच्या मानाने पुष्कळ असे. तथापि क्रमशः हे नाव नाणी व सोनेचांदी या प्रमाणावर आधारलेल्यापेक्षा भिन्न प्रमाण व वजन पद्धती यांना प्राप्त झाले. तिसरे एडवर्ड यांनी इंग्लंडमध्ये असे नवीन वजनाचे प्रमाण १३४० मध्ये प्रस्थापित केले. त्यांनी केलेल्या अधिनियमानुसार तयार केलेल्या ब्राँझाच्या वजनांचा संच चांगल्या स्थितीत जतन करून ठेवण्यात आलेला आहे. ही वजने ७, ७, १४, २८, ५६ व ९१ पौंड वजनाची आहेत. या वजनांचा आधार ६,९९२ ग्रेनांचा पौंड व ४३७ ग्रेनांचा औंस होता. ९१ पौंड वजन हे १३५२ मध्ये टरविलेल्या लोकरीच्या गोणीच्या वजनाच्या चतुर्थांश होते. यामुळे प्रत्येक लोकरीच्या गोणीचे वजन २६ स्टोनांपेक्षा जास्त असू नये व प्रत्येक स्टोन १४ पौंडांचा असावा, असे प्रमाण प्रस्थापित झाले. हे नवीन ॲव्हर द पॉइझ वजन प्रमाण स्पष्टपणे लोकरीच्या वजनाकरीता प्रस्थापित करण्यात आले होते. तथापि नाण्यांकरिता टॉवर पौंड व तिसरे हेन्री यांचा व्यापारी पौंड यांचा वापर चालूच राहिला. या काळात इंग्लंड हे हॅन्सिॲटिक लीगच्या नियंत्रणाखाली असलेला बाल्टिक व उत्तर समुद्र यांतून जाणारा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आणि इटलितील व्हेनिस व जनोआ या शहरंच्या नियंत्रणाखालील भूमध्य सामुद्रिक व्यापारी मार्ग यांचे संगम स्थान होते. भूमध्य सामुद्रिक व्यापार नाणी व सोनेचांदी यांच्या वजनांचे प्रमाण म्हणून जड अरबी दिऱ्हेमवर आधारलेल्या ४८ ग्रेन प्रमाणाला अनुकूल होता, तर हॅन्सिॲटिक उत्तर व्यापारात ४५ ग्रेनांचे प्रमाण पसंत केले जात होते. 

ट्रॉय वजन: (१४१४). ट्रॉय पौंडाचा उल्लेख पाचवे हेन्री यांच्या इंग्लिश सुवर्णकारांच्या चांदीवरील सोन्याच्या मुलामाकामासंबंधीच्या १४१४ मधील संबंधीत आढळतो. त्यानंतरचा उल्लेख १४२३ मधील संबंधित आहे. या संविधींवरून इंग्लिश सुवर्णकारांत ट्रॉय पद्धती अगोदरच चांगली रूढ झाली होती, असे दिसते. इंग्लिश टाकसाळी पद्धत अजूनही टॉवर पौंडावरच आधारलेली होता परंतु या दोन पद्धतींतील अदलाबदल सोपी होती. ४८० ग्रेनांचे १५ ट्रॉय औंस ४५० ग्रेनांच्या १६ ट्रॉवर औंसाबरोबर होते. ट्रॉय पद्धतीत २४ ग्रेन म्हणजे १ पेनीचे वजन २० पेनींचे वजन म्हणजे १ औंस, १२ औंस म्हणजे १ पौंड होते. टॉवर पौंडाप्रमाणे ग्रेन म्हणजे गव्हाच्या दाण्यांऐवजी ट्रॉय पद्धतीत सैद्धांतीक दृष्ट्या जवाचे दाणे होते पणव्यवहारात दोन्ही पद्धतींत धातवीय रूपातील ग्रेन प्रमाण सारखेच धरण्यात आलेले होते. ट्रॉय पद्धती तंतोतंत अरबी पद्धतीप्रमाणचे होती व तीत पेनीचे वजन ४८ ग्रेनांच्या दिऱ्हेमाच्या १/२ होते. दोन्ही पद्धतींत रौंप्य पेनीचे वजन म्हणजे पेनी वजन राहिलेले नव्हते कारण राज्यकोषाला साहाय्य करण्याच्या दृष्टीने नाण्यांचे वजन उत्तरोत्तर कमी करण्यात आले होते. 

टॉवर पौंड टाकसाळीत नाण्यांसाठी १५२७ पर्यंत वापरात होत्या. त्या वर्षी टॉवर पौंडाबरोबरच व्यापारी पौंडही अखेरीस रद्द करण्यात येऊन ५, ७६० ग्रेनांचा ट्रॉय पौंड अधिकृत टाकसाळी पौंड झाला. 

सातवे हेन्री यांनी संपूर्ण इंग्लिश वजने आणि रेषीय व घनफळ मापे यांची संविधानीय पायावर १४९७ मध्ये उभारणी केली. वजने व मापे यांची राज्यकोषीय मानके प्रधान संदर्भ मानके म्हणून तयार करण्यात येऊन त्यांच्या प्रती इंग्लंडमधील ४३ महत्त्वाच्या शहरांत पाठविण्यात आल्या. या संविधानानुसार ५,७६० ग्रेनांचा ट्रॉय पौंड ४८० ग्रेनांच्या १२ औंसात व २४ ग्रेनांचा २४० पेनी वजनांत विभागण्यात आला आणि रौप्य पेनीचे वजन ट्रॉय पौंडाचा ४८० वा भाग म्हणजे १२ ग्रेन ठरविण्यात आले. व्यापारी पौंड १६ ट्रॉय औंसांचा म्हणजे ७,६८० ग्रेनांचा झाला. सातव्या हेन्रींनी लोकरीच्या वजनाकरिता ॲव्हर द पॉइझ वजनच पुढे चालू ठेवले व त्याकरिता ब्राँझाची विशिष्ट मानके तयार केली. अशी मानके सातव्या हेन्रीपासून तिसरे जॉर्ज यांच्यापर्यंत तयार करण्यात आली. तिसरे एडवर्ड यांनी प्रस्थापित केलेल्या ६,९९२ ग्रेनांच्या पौंडाएवजी ७.००० ग्रेन असा प्रमाण पौंड पहिल्या एलिझाबेथ राणींनी १५८८ मध्ये प्रस्थपित केला. 

एलिझाबेथ राणींची मानके: (१५५८–१६०३). इंग्लिश वजने व मापे यांना एलिझाबेथ राणींच्या कारकीर्दीत खरे स्थैर्य लाभले. त्यांची १५८८ मधील ॲव्हर द पॉइझ व ट्रॉय वजनांची तिसरी व अखेरची श्रेणी १८२४ पर्यंत म्हणजे २३६ वर्षे प्रधान मानके राहिली. याच वेळी हंड्रेडवेट (सीडब्ल्यूटी) व टन ही वजनेही ११२ पौंड व २० हंड्रेडवेट (किंवा २,२४० पौंड) अशी अनुक्रमे प्रमाणभूत ठरविण्यात आली. ॲव्हर द पॉइझ व ट्रॉय (मौल्यवान धातूंकरिता) वजने १८३६ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थांनांत प्रमाणभूत झाली. मात्र अमेरिकेत हंड्रेडवेट व टन यांत फेरबदल न करता स्वीकारलेल्या संज्ञांचा अर्थ अनुक्रमे १०० पौंडांचा हंड्रेडवेट व २,००० पौंडांचा टन समजण्यात येतो. इंग्लिश वजनांना लाँग (दीर्घ) किंवा ग्रॉस हंड्रेडवेट व टन असे संबोधण्यात येते. 

ट्रॉय पौंडाशी संलग्न असलेला ६,७५० ग्रेनांचा व्यापारी पौंड आठवे हेन्री यांनी १५२७ मध्ये रद्द केल्यावरही सातवे हेन्री यांनी १४९७ मध्ये सुरू केलेला ७,६८० ग्रेनांचा व्यापारी पौंड हॅन्सिॲटिक लीगचा ७,२०० ग्रेनांचा व्यापारी पौंड प्रचारात राहिले होते. परंतु हॅन्सिॲटिक लीगचे वर्चस्व कमी झाल्यावर नाणी व सोनेचांदी यांच्याखेरीज इतर सर्व बाबींसाठी ॲव्हर द पॉइझ पौंड वापरण्याचे एलिझाबेथ राणीच्या काळी ठरविण्यात आले. नाणी व सोनेचांदी यांकरिता ट्रॉय पौंड अस्तित्वात होताच.

  

ॲव्हर द पॉइझ व ट्रॉय या दोन्ही पद्धतींची एलिझाबेथ राणींची तिसऱ्या श्रेणीतील नवीन मानके व वजने तयार करण्याचे काम १५८८ मध्ये पूर्ण झाले. त्यांच्या प्रती सातव्या हेन्रींनी १४९७ मध्ये ज्या ४३ शहरांना मानक प्रती पाठविल्या होत्या त्यांना तसेच मुख्यत्वे वेल्समधील १४ गावांना पाठविण्यात आल्या. टॉवर ऑफ लंडन व लंडनची सुवर्णकारांची संस्था येथेही प्रत्येकी एक मानक संच ठेवण्यात आले. ॲव्हर द पॉइझ वजने १ पौंड=१६ औंस=७,००० ग्रेन या प्रमाणावर आधारलेली आहेत.


आ. ६. इंग्लंडच्या पहिल्या एलिझाबेथ राणींच्या काळातील वजनांची मानके : (अ) राज्यकोषीय ॲव्हर द पॉइझ वजनांची मानके (१५८२–८८) व (आ) ट्रॉय वजनांची मानके (१५८८). दोन्ही मानके प्रधान मानके म्हणून १८२४ पर्यंत वापरात होती. ब्रिटिश इंपीरियल मानके: लॉर्ड करॅरिसफोर्ट यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय समितीने १७५८–६० यामध्ये तयार करून घेतलेली मानके १८२४ मध्ये कायदेशीर करण्यात आली. ट्रॉय पौंडाचे मानक संसद गृहाच्या कॉमन्स सभेच्या एका भिंतीत बंदिस्त करण्यात आले परंतु ते १८३४ मध्ये लागलेल्या आगीत नष्ट झाले. १८२४ पासून सर्व ब्रिटीश मानके इंपीरियल मानके म्हणून ओळखली जाऊ लागली. ५,७६० ट्रॉय ग्रेनांचा ट्रॉय पौंड हा प्रमुख पौंड झाला आणि ॲव्हर द पॉइझ पौंड १६ औसांचा व ७,००० ट्रॉय ग्रेनांचा ठरविण्यात आला. ॲव्हर द पॉइझ पौंडांची ट्रॉय पौंडांच्या पदात व्याख्या केल्याची इंग्लिश कायद्यातील ही पहिलीच वेळ होती. 

इ. स. १८४३ मध्ये नेमलेल्या एका समितीने काळजीपूर्वक तयार करून घेतलेली नवीन मानके १८५५ मध्ये संसदेने वैध ठरविली. १८२४ ची व्याख्या बदलून प्रमुख पौंड मानक आता ७,००० ग्रेनांचा ॲव्हर द पॉइझ पौंड ठरविण्यात आला आणि ट्रॉय पौंड ५,७६० ॲव्हर द पॉइझ ग्रेनांचा करण्यात आला. या नवीन इंपीरियल ॲव्हर द पॉइझ पौंडांचे प्रधान मानक प्लॅटिनम-इरिडियम मिश्रधातूचे बनविलेले असून त्याचा आकार चित्याकार आहे. त्याचा व्यास १.१५ इंच (२.९२१ सेंमी.) व उंची १.३५ इंच (३.४२९ सेंमी.) असून माथ्याच्या व पायाच्या कडा किंचित गोलसर केलेल्या आहेत. 

दोन पौंडांतील घोटाळा टाळण्यासाठी १८७८ च्या वजने व मापे अधिनियमाने ट्रॉय पौंड रद्द करण्यात आला पण ट्रॉय औंस तसाच चालू ठेवण्यात आला. या अधिनियमानुसार वजनाने विक्री करावयाच्या सर्व वस्तूंसाठी फक्त ॲव्हर द पॉइझ पौंड वापरण्यास परवानगी देण्यात आली परंतु मौल्यवान धातू व रत्नांचे खडे यांच्यासाठी ४८० ग्रेनांचा ट्रॉय औंस तसाच राहिला. १९१३ मध्ये २०० मिग्रॅ.चा मेट्रिक कॅरट वैध ठरविण्यात आला पण ३ १/६ ग्रेनांचा (ट्रॉय औंसाचा १५० वा भाग) असलेला इंग्लिश किंवा  हिऱ्याचाकॅरट सर्वसाधारण उपयोगात राहिला. औषधांच्या किरकोळ विक्रीच्या व्यापारात अँपॉथेकरीज वजने वापरण्यास मुभा देण्यात आली. या वजनांत औंस हा ट्रॉय औंसाइतका (४८० ग्रेनांचा) होता पण प्राचीन ग्रीक विभाजनाप्रमाणे त्याचे ६० ग्रेनांच्या ८ ड्राक्मांत (ड्रामांमध्ये) व २० ग्रेनांच्या २४ स्कूपलांमध्ये भाग पाडण्यात आलेले होते. परंतु मोठ्या प्रमाणावरील औषधांच्या पुरवठ्यासाठी ॲव्हर द पॉइझ पौंड, औंस व ग्रेन (गैरसोयीच्या मूल्यांचा ॲव्हर द पॉइझ ड्राम टाळून) सर्वसामान्य वापरत आले. 

त्यानंतर १९६३ मधील अधिनियमानुसार सर्व इंग्लिश वजने व मापे यांच्या मेट्रिक पद्धतीतील वजनांत व मापांत पुन्हा व्याख्या करण्यात आल्या आणि त्यानंतर दोन वर्षांनी राष्ट्रीय स्तरावर हा बदल व्यवहारात येण्यास सुरवात झाली. व्यापाराकरिता इंपीरियल मानक पौंड आणि विज्ञान व तंत्रविद्या यांत आंतरराष्ट्रीय पौंड (= ०.४५३५९२३२ आंतरराष्ट्रीय किग्रॅ.) मूलभूत ठरविण्यात आले. 

अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील वजन पद्धती: जॉर्ज वॉशिंग्टन यांनी १७९० मध्ये चलन, वजने आणि मापे यांतील एकविधतेच्या आवश्यकतेकडे कॉंग्रेसचे लक्ष वेधले. चलन दशमान पद्धतीत लवकरच स्थिरावले पण उद्योगधंदे व व्यापार यांतील धारकपात्रे (भांडी), मापे, हत्यारे व यंत्रे यांत खोलवर शिरलेल्या इंग्लिश वजने व मापे यांनी निर्माण केलेली निष्क्रियता, तसेच लौकिक मनोवृत्ती यांच्यामुळे वजने व मापे यांच्या बाबतीत योग्य दृष्टीकोन अंगिकारण्यास प्रतिबंध झाला. मेट्रिक पद्धती फ्रान्समध्ये याच काळात व्यवहारात येत होती आणि १८२१ मध्ये एका सुप्रसिद्ध अहवालात मेट्रिक पद्धती स्वीकारण्यातील फायदे मान्य केले होते पण अमेरिकेत योग्य परिस्थिती निर्माण होईपर्यंत तिचा स्वीकार भविष्यकाळात होणे अशक्य असल्याचे प्रतिपादन केले होते. 

मेट्रिक पद्धतीचा स्वीकार करण्याआऐवजी अमेरिकेने आपली पद्धती इंग्लिश पद्धतीशीच जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. या दोन पद्धतींत काही फरक उद्भवले होते. उदा., १८२४ मध्ये ब्रिटनने २३१ घन इंचाचा ॲन राणीचा गॅलन रद्दबातल केल्यानंतरही अमेरिकेत तो चालूच राहिला होता. कोषागार विभागाच्या अखत्यारीखाली मानक वजने व मापे कार्यालयाने मानके तयार करण्याचे काम हाती घेतले. मानक यार्ड लंडनहून काही वर्षांपूर्वी आयात करण्यात आलेला असल्याने अमेरिकन व इंग्लिश यार्डात जवळजवळ एकवाक्यता होती पण ॲन राणीचा गॅलन तसाच ठेवण्यात आला होता. ७,००० ग्रेनांचा ॲव्हर द पॉइझ पौंड व ५,७६० ग्रेनांचा ट्रॉय पौंड इंग्लिश मानकांशी तंतोतंत जुळणारे होते परंतु २,१५०.४२ घन इंचाचा अमेरिकन बुशेल इंग्लिश बुशेलाहून (२,२१९.३६ घन इंच) निराळा होता. [⟶लांबी, क्षेत्रफळ व घनफळ यांची एकके]. 


एकोणीसाव्या शतकाच्या मध्यापसून नवीन राज्ये जसजशी संघात सामील झाली, तसतसे त्यांना मानकांचे संच देण्यात आले. त्या शतकाच्या अखेरच्या काळात मानक वजने व मापे कार्यालयाचे कार्यक्षेत्र वाढविण्यात येऊन १९०१ मध्ये अमलात आलेला काँग्रेस अधिनियमाने त्याचे नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्ड्समध्ये रूपांतर झाले. या ब्यूरोकडे भौतिक मानके तयार करण्याचे व मानक पद्धती प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे, तसेच संबंधित विषयांतील संशोधनांचे कार्य सोपविण्यात आले. या ब्युरोकडे भौतिक मानके तयार करण्याचे व मानक पद्धती प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याचे, तसेच संबंधित विषयांतील संशोधनाचे कार्य सोपविण्यात आले. या ब्युरोने वजने व मापे यांच्या बाबत निरनिराळ्या राज्यांत असलेल्या भिन्न मानकांत समन्वय साधण्यारिता वार्षिक राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यास सुरुवात केली. यामुळे सर्व राज्यांच्या वजने व मापे यांसंबंधीच्या विधिविधानांत वास्तव एकविधता आली. तथापि या एका कार्याखेरीज जगातील प्रमुख देशांत राष्ट्रीय पातळीवर वजने व मापे यांवर नियंत्रण ठेवण्यापासून परावृत्त राहण्यात अमेरिकन शासन एकमात्र ठरले. याला एकच उल्लेखनीय अपवाद म्हणजे अमेरिकेत मेट्रिक पद्धती वापरण्यास परवानगी देणारा १८६६ मधील अधिनियम होय.  

काही निवडक ऐतिहासिक वजने आणि त्यांची इंग्लिश व मेट्रिक सममूल्ये 

   

सममूल्य (अदमासे) 

देश 

एकक वजन 

इंग्लिश 

मेट्रिक 

अरेबिया

दिनार

०.१५ औंस

४.२ ग्रॅ.

अरेबिया

दिऱ्हेम

०.११ औस

३.१२ ग्रॅ.

इंग्लंड (जुने)

पौंड, टॉवर.१२ औंस

५,४०० ग्रेन

३५० ग्रॅ.

इंग्लंड (जुने)

पौंड, टॉवर.१५ औंस

६,७५० ग्रेन

४३७ ग्रॅ.

इंग्लंड (जुने)

पौंड, टॉवर १६ औंस

७,२०० ग्रेन

४६५ ग्रॅ. 

इंग्लंड (जुने)

माइट

०.०५ ग्रेन

३.२४ किग्रॅ. 

इंग्लंड (जुने)

क्विंटल

१०० पौंड किंवा ११२ पौंड

४५.४ किग्रॅ. किंवा ५०.८ किग्रॅ. 

इंग्लंड

सेंटल

१०० पौंड

४५.४ किग्रॅ.  

इस्त्राएल (प्राचीन)

शेकेल

०.५ औंस

१४.१ ग्रॅ.  

ईजिप्त (प्राचीन)

काट

०.३३४ औंस

९.४६ ग्रॅ.  

ईजिप्त (प्राचीन)

डेबेन

३.१८ औंस

९० ग्रॅ.  

ईजिप्त (प्राचीन)

बीक्वा

०.४६ औंस

१३ ग्रॅ. 

ग्रीस (प्राचीन)

ओबोल

११.२ ग्रेन

०.७३ ग्रॅ.  

ग्रीस (प्राचीन)

टॅलेंट, ॲटिक

५७ पौंड

२६ किग्रॅ. 

ग्रीस (प्राचीन)

ड्राक्मा

०.१५४ औंस

४.३६ ग्रॅ. 

ग्रीस (प्राचीन)

मिना, ॲटिक

०.९६५ पौंड

४३८ ग्रॅ.  

ग्रीस (प्राचीन)

स्टेटर, ॲटिक

०.३१ औंस

८.८ ग्रॅ. 

जर्मनी

फंड

१.१ पौंड

५०० ग्रॅ.  

पर्शिया (प्राचीन)

डारिक (सुवर्ण)

०.३ औंस

८.४ ग्रॅ. 

फ्रान्स (जुने)

आँस

१.०८ औंस

३०.६ ग्रॅ. 

फ्रान्स (जुने)

मार द त्रॉइस

८.६५ औंस

२४५ ग्रॅ. 

फ्रान्स (जुने)

लीव्ह्र

१.०८ पौंड

४९० ग्रॅ.  

फ्रान्स

लीव्ह्र (डेमी-किलो)

१.१० पौंड

५०० ग्रॅ.  

बॅबिलोनिया

टॅलेंट, व्यापारी

६६ पौंड

३० किग्रॅ. 

बॅबिलोनिया

टॅलेंट, सुवर्ण

५५ पौंड

२५ किग्रॅ. 

बॅबिलोनिया

मिना

१.११ पौंड

५०४ ग्रॅ. 

बॅबिलोनिया

शेकेल, व्यापारी

०.३ औस

८.३७ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

अनचीअ

०.९५ औंस

२७ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

ॲस

९.६ औंस

२७३ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

दीनेअरीअस

०.१७ औंस

४.६ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

दोद्रान्स

८.६६ औंस

२४६ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

बेस

७.६९ औंस

२१८ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

लिब्रा

०.७२ पौंड

३२५ ग्रॅ. 

रोम (प्राचीन)

स्क्रूपल्स

१७.५ ग्रेन

१.१३ ग्रॅ. 

ब्रिटन अमेरिका

कॅरट

३ १/६ ग्रेन

२०६ मिग्रॅ. 

ब्रिटन अमेरिका

ग्रेन क्रॅरट

१/४ कॅरट

५१.४मिग्रॅ. 

काही निवडक ऐतिहासिक वजने आणि त्यांची इंग्लिश व मेट्रिक पद्धतींतील सममूल्ये कोष्टकात दिली आहेत.  


भारतीय वजने व मापे: वैदिक ग्रंथात त्या काळातील वजन पद्धतीच्या अस्तित्वाची निःसंदिग्ध वर्णने आहेत परंतु त्यांचे उपयोग व महत्त्व योग्य प्रकारे विशद केलेले आढळत नाही. वसिष्ट धर्मसूत्रात वजने या आवश्यक गृहोपयोगी वस्तू असून त्यांची अचूकता राजांनी ठेवावयास पाहिजे असे वर्णन आहे. वजनांचा व मापांचा खोटेपणा हा दखलपात्र गुन्हा असल्याचे म्हटले आहे. मनू, याज्ञवल्क्य, वसिष्ठ आणि कौटिल्य यांनी वजने व मापे यांत खोटेपणा करण्याच्या गुन्ह्याच्या प्रयत्नाच्या विरुद्ध शासनाने विशेष खबरदारी घेऊन त्यांत अचूकता ठेवावी असे सुचविले होते. मौर्य शासनाने वजने व मापे दर चार ते सहा महिन्यांनी नियमितपणे तपासण्यासाठी आणि त्यांचे नियमन करण्यासाठी खास अधिकारी नेमले होते. आपस्तंब धर्मसुत्रात खोटी वजने व मापे वापरून फसविण्यासंबंधीचे संदर्भ आहेत. आपस्तंब आणि बुद्ध यांनी खोटी वजने व तराजू वापरणाऱ्याला दूषणे दिलेली आहेत.  

मनुस्मृतीत रती किंवा तांबडी गुंज (रक्तिका) या बीचा वजनाचे मूलभूत एकक म्हणून उल्लेख आहे. गुंजेचे सरासरी वजन १.७५ ट्रॉय ग्रेन किंवा ११३.४ मिग्रॅ. भरते. या बीचे वजन बऱ्याच प्रमाणात एकसारखे असून हवेमुळे आक्रसून तिचे वजन कमी होत जाण्याची शक्यता अगदी अल्प असते. हे वजनाचे एकक म्हणून ती निवडण्याचे कारण आहे. मुनस्मृतीयाज्ञवल्क्यस्मृती यांत सोने, चांदी व तांबे यांच्याविषयीच्या धंद्यात वापरली जाणारी गुंज व तीवर आधारलेले वजनांचे कोष्टक दिलेले आढळते. चांदीकरिता ८ त्रसरेणू=१ लिक्शा ३ लिक्शा=१ राजसर्षण ३ राजसर्षण=१ गौरसर्षण ६ गौरसर्षप=१ यव ३ यव=१ कृष्णल किंवा रक्तिका (गुंज किंवा रती) २ कृष्णल किंवा रक्तिका =१ माष (उडीद) १६ माष=१ धरण किंवा पूरण १० धरण=१ शतमान. धान्य, औषधे, मौल्यवान खडे यांच्या वेगळ्या पद्धतीची वजन कोष्टके वरील ग्रंथात दिलेली आहेत. सोने व तांबे यांकरिता ५ कृष्णल किंवा रक्तिका=१ माष १६ माष=१ कर्ष, अक्ष, तोलक किंवा सुवर्ण ४ सुवर्ण=१ पल वा निष्क १० पल = १ धरण (सोन्याचे).  

आ. ७. मोहें-जो-दडो येथे सापडलेली दगडाची वजने मोहें-जो-दडो व हडप्पा येथील उत्खननांत इ. स. पू. तिसऱ्या सहस्त्रकात वापरात असलेली विविध प्रकारची वजने आढळली आहेत. भारतीय वजन पद्धतीचे मूळ जरी स्वतंत्र असेल, तरी मेसोपोटेमिया ईजिप्त येथील वजन पद्धतींशी तिचा संबंध असण्याची शक्यता दिसून आली आहे. अचूकतेच्या दृष्टीने सिंधू संस्कृतीतील वजने उल्लेखनीय असून या पद्धतीतील त्रुटी अगदी अत्यल्प आढळतात. ही वजने चर्ट, चुनखडक, पट्टिताश्म, पाटीचा दगड (स्लेट), कॅल्सेडोनी, पांढरा सुभाजा (शिस्ट) यांसारख्या निरनिराळ्या प्रकारच्या दगडांची तयार केलेली होती. त्यांचे आकार (घनकल्प, पिंप, शंकू, दंडगोल, माथा व पाया सपाट केलेले गोल वगैरे) व आकारमान यांतही त्यांची वजनमुल्ये व उपयोग यांनुसार फरक होते. 

ही सर्व वजने निश्चित पद्धतीनुसार असून मोहें-जो-दडो व हडप्पा येथील पद्धती सारख्याच आहेत. या पद्धतीत सामान्यतः लहान वजने द्विमान व मोठी वजने दशमान स्वरूपाची आढळतात. मोहें-जो-दडो येथे सापडलेली वजने १, २, ४, ८, १६, ३२, ६४, १६०, २००, ३२०, ६४०, १,६००, ३,२००, ६,४००, ८,०००, १,२८,००० या गुणोत्तरांत आहेत. एकक वजनाचे गणिताने काढलेले मूल्य ०.८५६५ ग्रॅ. आहे. सर्वांत मोठे वजन १०,७७० ग्रॅ. चे आहे. तराजू व पारडी मात्र फारशी सापडलेली नाहीत. कदाचित ते लाकडासारख्या नाशवंत द्रव्याचे तयार कलेले असावेत. मोहें-जो-दडो येथे एका टोकाला बांधलेल्या दोऱ्याचे अवशेष असलेली १५.८ सेंमी. लांबीची दांडी व तिच्या जवळपास दोन पारडी सापडली आहेत. 

अतिप्राचीन भारतीय वजन पद्धती दोन किंवा चार या आकड्यांच्या पटीने वाढणाऱ्या लहान मोठ्या विभागांवर आधारलेली होती. त्यानंतर इ. स. पू. १२०० च्या काळी आर्य व हिंदू लोकांद्वारे ८० व १०० या संख्यांवर आधारलेल्या वजन पद्धतींचा प्रवेश झाला. त्यांनी धरण (५०० ट्रॉय ग्रेन, ३२.४ ग्रॅ.) व होन (६,७५० ट्रॉय ग्रेन ४३७.४ ग्रॅ.) यांचा वजने म्हणून भारतात प्रसार केला. त्यानंतर इ. स. पू. ६०० च्या तुराणी लोक उत्तरेकडून भारतात आले व त्यांनी पूर्वीच्या होनाऐवजी ६,९१८ ट्रॉय ग्रेन (४४७.९ ग्रॅ.) वजनाचा होन प्रचारात आणला. इ. स. पू. ३०० च्या काळी ग्रीक लोकांनी पश्चिम भारतात ॲटिक वजनांचा प्रसार केला. 

कौटिलीय अर्थशास्त्रातील (इ. स. पू. चौथे शतक) एकोणिसाव्या अध्यायात वजने व मापे यांच्या प्रमाणासंबंधी माहिती दिलेली आहे. वजने लोखंडाची किंवा मगध व मेकल येथील दगडाची किंवा ओला झाला असता आकुंचन पावणार नाही व उष्णतेने प्रसरण पावणार नाही अशा पदार्थाची तयार करावीत, असे त्यात म्हटले आहे. तराजूसंबंधीच्या माहितीत ज्या तराजूच्या दांडीची भुजा ६ अंगुले लांब असून ज्याचे वजन एक पल आहे तो सर्वात लहान तराजू कल्पून त्यानंतरच्या दर एक तराजूच्या दांडीची भुजा ८ अंगुलांनी वाढत जाते व वजन एक पलाने वाढत जाते असे प्रतिपादिले आहे. त्यात वजनाचे कोष्टक पुढीलप्रमाणे दिले आहे. १० माष किंवा ५ गुंजा=१ माषक १६ माषक=१ सुवर्ण किंवा कर्ष ४ कर्ष =१ पल ८८ गौरसर्षप=१ चांदीचे माषक १६ रौप्य माषक किंवा २० शैव्य दाणे (एक प्रकारचे कडधान्य)=१ धरण २० तंडुल (तांदळाचे दाणे) = १ धरण (हिऱ्याचा) २० तुला=१ भार १० धरण=१ पल १०० पल=१ आयमानी. १/२, १, २, ४, ८ माषकांची व १, २, ४, ८, १०, २०, ३०, ४०, १००, सुवर्णाची तशीच धरणांची वजने तयार करावीत. 

इ. स. पू. १० च्या काळात उत्तर भारतात ग्रीकांनी रोमन पौंड हे वजन आणले. इ. स. आठव्या-दहाव्या शतकांत दक्षिण भारतात राष्ट्रकूट वंशाच्या काळात प्रचलित असलेल्या वजनांपैकी कलम (३२.६६ किग्रॅ.) हे वजन तंजावर व दक्षिण अकार्ट भागात विसाव्या शतकातही चालू होते. बाराव्या शतकात मुसलमान व पठाण लोकांनी भारतात रत्तल (=७,००० ट्रॉय ग्रेन ४७८.) हे वजन प्रचारात आणले.

सुमारे २५००० वर्षापूर्वी भारतात वापरले जाणारे ‘पूरण’ हे वजन नवव्या शतकात पंजाब व उत्तर भारतातील हिंदू राजांच्या कारकीर्दीत वापरात आले. रजपूत राजांनी तसेच १९९१ मध्ये मुसलमान राज्यकर्त्यांनी या वजनाचा अंगीकार केला. हे वजन ‘टंक’ या नावाखाली १४८८ पर्यंत व नंतर ‘वराह’ या नावाखाली काही काळ प्रचारात होते. शतरक्तिका हे १०० रक्तीएवढ्या (गुंजांएवढ्या) असलेल्या वजनाची सुरूवात वेदकालीन आर्यांनी केली. मोगल साम्राज्यकर्त्यांनी पुढे या वजनाचा स्विकार केला व १३२४ पर्यंत ते टाकसाळीत वापरले जाणारे वजन म्हणून मान्यता पावले. पंधराव्या शतकात शेरशाह व अकबर या राजांनी वजनामापांत बदल घडवून आणण्याचे प्रयत्न केले. तोळा, शेर व मण ही त्या काळात मान्यता पावलेली वजने होती. मण सर्वसामान्यपणे ४० शेरांबरोबर असला, तरी शेराचे वजन निरनिराळ्या ठिकाणी भिन्न मूल्याचे असे. विवक्षित संख्येच्या तांब्याच्या नाण्यांच्या वजनावरून शेराचे वजन ठरविले जाई. या तांब्याच्या नाण्याला ‘दाम’ म्हणत. अकबरांच्या काळी शेराचे वजन ३० दाम, जहांगिरांच्या काळी ३६ दाम, तर शहाजहान यांच्या काळी ४० दाम होते. मराठेशाहीत शेर व मण ही वजनाची एककेच प्रचलित होती, मात्र त्यांची मूल्ये निरनिरळ्या ठिकाणी निरनिराळी असत.


ब्रिटिश काळात भारतात वजनांत व मापांत एकवाक्यता आणण्याच्या दृष्टीने १८६७ पासून प्रयत्न झाले आणि त्यानुसार केंद्रिय व प्रांतीय स्तरांवर अधिनियम केले गेले पण त्यांच्या योग्य अंमलबजावणीच्या अभावी टन, पौंड व औंस ही ब्रिटिश वजने प्रचारात येण्याबरोबरच मण, शेर, छटाक व तोळा या वजनांनाही मान्यता देण्यात आली. निरनिराळ्या ठिकाणी शेरातील तोळ्यांची संख्या वेगवेगळी होती (उदा., सुरतेचा शेर ३७ तोळ्यांचा, मुंबई शहराचा २८ तोळ्यांचा, तर बेळगावचा २० तोळ्यांचा). मुंबई सरकारने १९३२ मध्ये वजनमापांत एकसूत्रता आणण्याच्या दृष्टीने केलेल्या अधिनियमानुसार मुंबई तोळा=१८० ग्रेन, मुंबई शेर=८० तोळे व मुंबई मण=४० शेर असे निश्चित करण्यात आले. याचबरोबर सोन्याचांदीकरिता १ तोळा=१८० ग्रेन, १ वाल=१/४० तोळा=४.५ ग्रेन, १ रती=१/६२ तोळा ही वजनेही ठरविण्यात आली. याखेरीज ॲव्हर द पॉइझ व अँपॉथेकरीज वजनेही ब्रिटीश पद्धतीप्रमाणे निर्देशित करण्यात आली. ही वजने १९५६ चा मेट्रिक पद्धतीचा अधिनियम प्रचारात आल्यावरही काही काळ चालू होती.

भारतात १९५६ मध्ये मेट्रिक पद्धतीचा स्वीकार करण्यासंबंधीचा अधिनियम संसदेने संमत केला व त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी १९५८ मध्ये सुरू झाली. या अधिनियमानुसार मेट्रिक वजनांबरोबर पूर्वीची वजने काही काळ चालू राहिली. संपूर्णपणे मेट्रिक पद्धती वापरण्याकरिता करावयाचे बदल अमलात आणण्यासाठी दहा वर्षांची मुदत ठरविण्यात आली. धान्यांची देवघेव वजनाने व द्रव पदार्थांची मापाने करावी, असे निश्चित करण्यात आले. या अधिनियमात मीटर व किलोग्रॅम यांचे आद्य नमुने इंटरनॅशनल फिजीकल लॅबोरेटरीकडे अभिरक्षा व देखभाल यांसाठी सोपविण्यासंबंधी आणि राज्य सरकारांसाठी राष्ट्रीय प्रमुख मानकांशी अधिप्रमाणित असलेले संच तयार करण्यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या. याकरिता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ लिगल मेट्रॉलॉजी या आंतरराष्ट्रीय संघटनेचा १९५६ मध्ये भारत सदस्य झाला. ⇨भारतीय मानक संस्थावजने व मापे यांच्या विनिर्देशांत उद्मवणाऱ्या समस्यांवर सल्ला देणारी तांत्रिक संस्था म्हणून कार्य करते.

मुंबई राज्याकरिता ही मानके कार्यवाहीत आणण्यासाठी त्या वेळच्या मुंबई सरकारने १९५८ चा २९ वा अधिनियम केला. वापरात असलेल्या वजनामापांच्या तपासणीसाठी दुय्यम व कामचलाऊ मानके बनवून घ्यावयाची त्यात तरतूद आहे. दुय्यम मानके प्रमुख मानकांबरहुकूम व कामचलाऊ मानकांचे (प्रतिकृतींचे) संच दुय्यम मानकांवरून बनवावयचे व पडताळावयाचे असतात. वजनमापांची प्रमाण उपकरणेही राज्य सरकार बनवून घेते.

प्रत्यक्ष व्यवहारात वापरावयाची वजनेमापे पडताळून त्यांवर शिक्के मारण्याबाबत आणि त्यासाठी नियंत्रकापासून निरीक्षकापर्यंत अधिकारी नेमण्याबाबत अधिनियमात तरतुदी आहेत. वजनेमापे तपासणीसाठी दाखल करण्याबद्दल आदेश देणे, त्याकरिता आवश्यक स्थळी प्रवेश करणे व ती ताब्यात घेणे वगैरे अधिकार निरीक्षकाला आहेत. वजनमापांच्या व उपकरणांच्या उत्पादकांना, दुरूस्ती करणाऱ्यांना व व्यापाऱ्यांना सरकारी परवाना घ्यावाच लागतो. प्रमाण वजनामापनांखेरीज इतरांचा वापर करण्यास मनाई आहे. व्यापारी आदींनी तसेच अधिकाऱ्यांनी केलेला अधिनियमाच्या तरतुदींचा भंग दंडनीय आहे. प्रमाण वजनमापांखेरीज इतर वजनमापांनी व्यवहार करण्याचा करार अवैध होय. भागीदारी, कंपनी आदींकडून गुन्हा झाल्यास सर्व पदाधिकारी अपराधी होतात. गुन्हा घडल्याचे ज्ञान नसाणारा अपवाद होय. वजनामापांबाबतचे काही गुन्हे दंडसंहितेखालीही दंडनीय आहेत.

प्रत्यक्षात मेट्रिक पद्धतीचा प्रसार अपक्षेपेक्षा पुष्कळच सुरळीतपणे व तुलनेने कमी वेळात झाला. १९७६ मध्ये प्रमाणभूत वजने व मापे अधिनियम संसदेत संमत करण्यात येऊन त्याचा पाया १९५६ च्या अधिनियमापेक्षा अधिक व्यापक करण्यात आला. त्यात १९५६ नंतरच्या वैज्ञानिक प्रगतीचा विचार करून आंतरराष्ट्रीय एकक पद्धतीला [⟶एकके व परिमाणे] प्राधान्य देण्यात आले. महाराष्ट्र मानक वजने व मापे (अंमलबजावणी) अधिनियम १९८५ हा सुधारित अधिनियम१९८७ साली महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला आहे. या अधिनियमाचा भंग करणाऱ्यांना देण्यात येणाऱ्या शिक्षांबाबत विस्तृत तरतुदी त्यात करण्यात आलेल्या आहेत.

तापमान, दाब व गुरूत्त्वीय प्रवेग यांचे परिणाम : तापमानाच्या कमीजास्त बदलामुळे पदार्थाच्या लांबी, क्षेत्रफळ व घनफळ यांत कमीजास्त फरक पडतो. तेव्हा मापनाचे मानक कोणत्या तापमानात वापरावयाचे याचे स्पष्ट वर्णन आवश्यक आहे. मानकाच्या तापमानाहून भिन्न तापमानात त्याचा उपयोग करताना त्याचा प्रसरण गुणांक द्यावा लागतो. मानके तयार करताना वापरण्यात आलेली प्रमाणित तापमाने गरजेनुसार वेगवेगळी असतात. ०° से. हे तापमान अनेक वेळा प्रमाणित तापमान म्हणून वापरतात. मेट्रिक पद्धतीतील ‘मीटर’ हे मानक आद्य मानक तयार करताना अथवा त्याच पद्धतीची दुय्यम मानके तयार करताना २०° से. हे तापमान वापरलेले असते. आंतरराष्ट्रीय वजने व मापे तयार करताना बव्हंशी २०° से. हेच तापमान धरतात. जेव्हा घनता व घनफळ यांच्या मापनाचा प्रसंग पडतो तेव्हा ४से. (म्हणजे पाण्याच्या महत्तम घनतेचे तापमान) हे तापमान धरलेले असते.

लांबीच्या मानकावर वातावरणीय दाबातील फरकाचा जवळजवळ काहीच परिणाम होत नाही. दाबातील फरक (पाऱ्याच्या उंचीच्या भाषेत) ८० मिमी. पर्यंत झाला असल्यास आद्य मीटरमध्ये ५ दशलक्षांश मिमी. एवढा अत्यंत सूक्ष्म फरक झालेला आढळला आहे. तथापि वस्तुमानांच्या तुलना करताना वातावरणीय दाबातील फरक तसाच तापमानातील व आर्द्रतेतील फरक यांचा बराच परिणाम होतो. वस्तुमानाच्या तुलनेसाठी वजनाच्या वर्णनात वातावरणीय गुणधर्माबरोबर तुलनेसाठी वापरात असलेल्या वजनाच्या घनतेचाही उल्लेख करणे आवश्यक असते. सारख्या भुजा असलेल्या तराजूत एखाद्या वस्तूचे वजन करताना प्रमाणित वजनाची घनता त्या वस्तूहून भिन्न असल्यास आलेले वजन दुरूस्त करून घ्यावे लागते.

वजने व मापे निश्चत करण्याचे काम प्रमाणित वातावरणीय दाब ७६० मिमी. (पाऱ्याची उंची, तशीच पाऱ्याची घनता १३.५९५१ ग्रॅ./सेंमी), तापमान ०° सें. व गुरूत्वीय प्रवेग ९८०.६६५ सेंमी./सेकंद अशा विवक्षित अटींनुसार केले जाते.


प्रमाणित वजनाच्या नमुन्याची तुलना करण्यासाठी अतिशय अचूक व संवेदनक्षम अशा समभुजा असणाऱ्या, दांडी व पारडी सुरीधारेवर टांगती असलेल्या तराजुंनी करता येते. अशा तराजुंनी प्रमाणित किलोग्रॅम अशा वजनातील १० किग्रॅ. एवढा सूक्ष्म फरकही मोजता येतो किंबहुना जास्तीत जास्त एवढ्या मूल्यापर्यंत असलेला फरक हीच अशा वजनाच्या सत्यतेची कसोटी मानण्यात येते. प्रमाणित वजने ज्या प्रमुख प्रमाणीत वजनापासून बनविण्यात आली आहेत त्यांच्या तुलनेसाठी वरील तराजू अधिक संवेदनक्षम करून वजन करण्याच्या अचूक पद्धतीचा अवलंब करावा लागतो. अशा तऱ्हेच्या बनविलेल्या तराजूने निर्वात अवस्थेत दांडीचे विचलन प्रकाशकिरणाच्या साहाय्याने मोजण्याची पद्धत वापरून व वजन करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व क्रिया तराजूपासून बऱ्याच अंतरावरून करून १ दशकोट्यांश (१०–९) फरकही मोजता येतो.

प्रमाणित वजनाच्या धातू, आकार, सफाई वगैरे बाबी एकसारख्या असल्या, तरी त्यांत फरक आढळले आहेत. प्लॅटिनम किंवा इतर धातूपासून योग्य त्या दक्षता घेऊन बनविलेल्या प्रमाणित वजनामध्येही बाह्यपृष्ठभागात सावकाशपणे रासायनिक आणि प्राकृतिक बदल होत असतात. पृष्ठभागांनी अधिशोषित केलेले वायू वातावरणीय परिस्थितीमुळे कमीजास्त प्रमाणात बाहेर पडत राहिल्यामुळे वजनात फरक घडवून आणतात.

आंतरराष्ट्रीय मूलभूत ‘किलोग्रॅम’ मानक तयार करण्यात आलेल्या भिन्न राष्ट्रांतील किलोग्रॅमचे नमुने प्लॅटिनम (९०%)-इरिडियम (१०%) मिश्रधातूचे बनविलेले असल्यामुळे अनेक वर्षे त्यांत दोन कोट्यांशाहून जास्त बदल झालेला आढळला नाही. इतर धातूंच्या बाबतीत हा टिकाऊपणा आढळत नाही, त्यांत कालानुसार बदल वाढत जातो. वजनांची मूल्ये जसजशी लहान असतील त्या त्या प्रमाणात पृष्ठभागाचे क्षेत्रफळ व त्यातील वस्तुमान यांचे गुणोत्तर वाढत राहिल्यामुळे टिकाऊपणा कमी कमी होत राहतो. पुन्हा नेहमी वापरात असलेली वजने कशी हाताळली जातात यावरही टिकाऊपणा अवलंबून असतो. सर्व साधारण मानकांसाठी २५% क्रोमियम व २०% निकेल असलेले पूर्णपणे ऑस्टेनाइटी अगंज पोलाद [⟶पोलाद] अतिशय स्थिर व गंजरोधक असून ते उच्च अचुंबकीयही आहे. ८०% निकेल व २०% क्रोमियम असलेली अचुंबकीय मिश्रधातूही या कामी यशस्वीपणे वापरण्यात आली आहे.

सर्वसाधारणपणे व्यवहारात तराजूबरोबर वापरावयाची वजने भारतात ओतीव लोखंडाची (बिडाची) व पितळेची (सामान्यतः कमी मूल्याची) केलेली असतात. ही वजने नियमित कालावधीनंतर शासकीय अधिकाऱ्यांकडून योग्य असल्याबद्दल तपासून घ्यावी लागतात.

पहा: एकके व परिणामे मेट्रिक पद्धति लांबी, क्षेत्रफळ व घनफळ यांची एकके. 

संदर्भ: 1. Berriman, A. E. Historical Metrology, Mystic, Conn., 1964.

          2. Govt. of India, The Standard Weights and Measures Act, 1976, New Delhi.

          3. Kisch, B. Scales and Weights: A Historical Outlook, New Haven, 1965.

          4. Page, C. H. Vigoureax, P.,Eds., The international System of Units (SI), 1972.

          5. Petric, W. M. F. Ancient Weights and Measures, 1926.

          6. Srivastava, B. Trade and Commerce in Ancient India, Varanasi, 1968.

          7. Verman, L. C. Kaul, J., Eds., Metric Change in India, New Delhi, 1970.

          8. Warren, C. The Early Weights and Measures of Mankind. 1913. 

          ९. कंगले, र. पं. कौटिलियम् अर्थशास्त्रम्, मुंबई, १९८२.

       १०. कोगेकर, ना. वा. मोजमापाची उत्क्रान्ति व दशमानपद्धति, पुणे, १९५८.

टोळे, मा. ग. भदे, ब. ग.