गोलत्वमापक : वक्रता (किंवा वक्रतेची त्रिज्या) व पातळ पदार्थांची जाडी मोजण्याचे ⇨ सूक्ष्ममापकाच्या तत्त्वावर आधारलेले एक उपकरण. ह्या तिपाईच्या (आकृती पहा) मध्यभागी असलेल्या नटातून फिरणारा हा स्क्रू असतो. तिपाईचे तिन्ही पाय अणकुचीदार असून एकाच प्रतलात (पातळीत) असतात. या टोकांनी तयार होणाऱ्या समभुज त्रिकोणाच्या भार मध्यातून (गुरुत्वमध्यातून) मधल्या स्क्रूचे टोक व अक्ष जातो. त्याचा अक्ष त्रिकोण प्रतलाला लंब असतो. मुख्य मापनी दाखविणारी पट्टी (इ-मापनी) स्क्रूला समांतर असून तिपाईला उदग्र (उभ्या) स्थितीत पक्की बसविलेली असते. वर्तुळाकार मापनी दर्शविणारी ही तबकडी स्क्रूला घट्ट बसविलेली असते. ह्या तबकडीची कडा मुख्य मापनीच्या ( च्या) कडेला चाटून असते. मुख्य मापनीवर सारख्या अंतरावर रेषा काढलेल्या (खोदलेल्या) असतात. मापनीच्या मध्यरेषेवर शून्य आकडा असून वर व खाली आकडे वाढत जातात. वर्तुळाकार मापनीवरील आखलेल्या रेषांचे आकडे एका बाजूने (सव्य म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या हालचालीच्या दिशेने किंवा अपसव्य बाजूने) वाढत जातात. स्क्रूचे टोक व तिन्ही पायांची टोके एकाच प्रतलात असताना दोन्ही मापन्यांवरील शून्य रेषा जर बरोबर जुळत असतील, तर उपकरणात शून्य स्थान दोष नसतो. मात्र जर त्या बरोबर जुळत नसतील तर निर्माण होणारा शून्य स्थान दोष योग्य रीतीने विचारात घ्यावा लागतो [→ सूक्ष्ममापक]. या उपकरणाचा लघुतमांक (मोजता येणारे कमीत कमी अंतर) सूक्ष्ममापकाप्रमाणेच म्हणजे स्क्रूच्या दोन लगतच्या आट्यांतील अंतराला तबकडीवर असलेल्या एकूण भाग-संख्येने भागून मिळतो.

एखाद्या पातळ पदार्थाची जाडी मोजण्याकरिता हे उपकरण प्रथम सपाट काचेवर ठेवून स्क्रूचे टोक व

गोलत्वमापक

तिन्ही पायांची टोके एकाच प्रतलात येतील अशा रीतीने स्क्रू फिरवतात. याच वेळेस शून्य स्थान दोष व त्याचे स्वरूप (अधिक वा उणे) पाहून घेतात. नंतर दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. नंतर स्क्रू फिरवून वर घेतात व ज्याची जाडी मोजावयाची तो पदार्थ तीन पायांच्या आत ठेवून स्क्रूचे टोक त्या पदार्थाच्या वरील पृष्ठाला केवळ स्पर्श करील इतपत स्क्रू फिरवतात. पुन्हा दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. पहिल्या व दुसऱ्या नोंदींतील फरकावरून व शून्य स्थान दोष लक्षात घेऊन पदार्थाची जाडी काढता येते.

गोलपृष्ठाची वक्रता मोजतानाही पहिली नोंद वरीलप्रमाणेच घेतात. नंतर स्क्रू वर घेऊन उपकरण वक्रपृष्ठावर ठेवतात. नंतर स्क्रूचे टोक गोलपृष्ठाला केवळ स्पर्श करील इतपत स्क्रू फिरवतात व दोन्ही मापन्यांवरील अंकांची नोंद करतात. दोन नोंदींतील फरकाला वक्रपृष्ठाचा ‘शर’ (बाण, सॅजिट्टा) म्हणतात. समजा, हा फरक क्ष आहे, वक्रपृष्ठाची त्रिज्या आहे व उपकरणाच्या दोन पायांतील अंतर आहे, तर खालील सूत्राने वक्रपृष्ठाची त्रिज्या काढता येते :

र  =

+

क्ष 

क्ष

२ 

अर्धगोलापेक्षा लहान वक्रपृष्ठाची त्रिज्या वरील रीतीने काढतात. कारण अशा वेळी प्रत्यक्ष व्यास मोजण्याच्या इतर पद्धती बिनचूक नसतात. निरनिराळ्या प्रकारच्या गोलत्वमापकांत हवी असलेली अचूकता मिळविण्यासाठी निरनिराळे बदल केलेले असले, तरी वरील सूत्र बदलत नाही.

ठाकूर, अ. ना.