कृष्णन, सर कार्यमाणिक्कम श्रीनिवास: (३ डिसेंबर १८९८–१४ जून १९६१). भारतीय भौतिकीविज्ञ. ⇨रामन परिणाम व चुंबकत्व आणि स्फटिकांचे चुंबकीय व प्रकाशीय गुणधर्म यांसंबंधी महत्त्वाचे संशोधन कार्य. त्यांचा जन्म तमिळनाडूमधील वत्रप येथे झाला. शिक्षण तिरुपती, श्रीरंगम् व मद्रास येथे झाले. मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात काही काळ अध्यापन केल्यानंतर प्रख्यात शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांचे साहाय्यक म्हणून कृष्णन यांची नेमणूक झाली (१९२३–२८). पुढे १९२९–३३ या काळात डाक्का विद्यापीठात भौतिकीच्या प्रपाठकपदावर काम केल्यानंतर कलकत्ता येथील इंडियन ॲसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स या संस्थेत त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यानंतर १९४२ मध्ये अलाहाबाद विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकापदावर व १९४७ मध्ये दिल्लीच्या नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली.
रामन यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णन यांनी प्रकाशकी व रेणवीय भौतिकी या शाखांत संशोधन केले. ‘रामन परिणाम’या रामन यांच्या सुप्रसिद्ध शोधाच्या संशोधनामध्ये कृष्णन यांनी फार बहुमोल सहकार्य केले. रेणूंमधील चुंबकीय ग्रहणक्षमता व चुंबकीय विषयमदिक्ता (निरनिराळ्या अक्षांच्या दिशांत वेगवेगळे गुणधर्म असणे) यांच्या सूक्ष्म मापनासाठी त्यांनी कित्येक उपकरणे व यांत्रिक योजना तयार केल्या व त्यांच्या आधाराने प्रतिचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता कमी असलेल्या) आणि समचुंबकीय (निर्वातापेक्षा चुंबकीय पार्यता जास्त असलेल्या) स्फटिकरूप द्रव्यांच्या विषमदिक्तेसंबंधी महत्त्वाची निरीक्षणे नोंदली, या त्यांच्या कार्यामुळे स्फटिकरूप पदार्थांच्या आंतररचनेचा अभ्यास करण्यासाठी क्ष-किरण, पद्धतीव्यतिरिक्त एक नवीन पद्धती उपलब्ध झाली. या त्यांच्या संशोधनाची माहिती इंग्लंडच्या रॉयल सोसायटीच्या नियतकालिकात तसेच अमेरिकेतील फिजिकल रिव्ह्यूमध्ये प्रसिद्ध होऊन कृष्णन यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली.
त्यांच्या संशोधनाच्या गौरवार्थ त्यांना कॅव्हेंडिश प्रयोगशाळा, रॉयल इन्स्टिट्यूशन व स्ट्रॅसबर्ग येथील जागतिक चुंबकत्व परिसंवादात (१९३९) व्याख्याने देण्यासाठी पाचारण करण्यात आले. १९४० साली रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. १९४६ मध्ये त्यांना सर हा किताब देण्यात आला. त्यानंतर अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्यत्व (१९५६), भारताच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे सदस्य, भारत सरकारचा पद्मभूषण किताब (१९५३) व भटनागर पारितोषिक (१९६१) हे बहुमान त्यांना मिळाले. १९४० साली ते इंडियन सायन्स काँग्रेसच्या भौतिकी विभागाचे प्रमुख व १९५३ मध्ये अलाहाबाद येथे भरलेल्या सायन्स काँग्रेसच्या परिषदेचे अध्यक्ष होते. ते दिल्ली येथे मृत्यू पावले.
भदे, व. ग.
“