आ. १. साधा परिदर्शक : (१, २) आरसे, (३) अडथळा, (४) नळा. परिदर्शक : (पेरिस्कोप). परिदर्शकाच्या साहाय्याने इतरांस न दिसता निरीक्षक आजूबाजूची दृश्ये पाहू शकतो. त्याचप्रमाणे निरीक्षक व पाहण्याची वस्तू ह्यांमध्ये अपारदर्शक पदार्थांचा अडथळा असला, तरीही ती वस्तू परिदर्शकाच्या साहाय्याने पाहता येते. पहिल्या जागतिक युद्धात या साधनाचा उपयोग मोठ्या प्रमाणात करण्यात आला होता.

साध्या परिदर्शकामध्ये एका नळीच्या अक्षाशी ४५० कोन करून दोन सपाट आरसे (१) व (२) आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे बसविलेले असतात. पासून येणारे प्रकाशकिरण दोनदा परावर्तित होऊन ‘ पासून आल्यासारखे वाटतात. या परिदर्शकात वर्धनाचे मूल्य एक असते व फार लहान क्षेत्राचे दर्शन होऊ शकते. त्या प्रकारच्या परिदर्शकाचा वापर फार कमी होतो. त्याच्या साहाय्याने पुढे असलेल्या प्रेक्षकांच्या डोक्यावरून क्रिकेटचा सामना पाहता येईल. खंदकातील शिपाई खंदकाच्या आडोशाला राहूनही पुढील भूमीचे याच्या साहाय्याने निरीक्षण करू शकतो. आरशांऐवजी काटकोनी लोलक वापरल्यास प्रतिमा जास्त तेजस्वी दिसते.

आ. २. आरमारी जहाजावरील बुरूजातील परिदर्शक : (१) संरक्षक नळी, (२) प्रकाश आत येण्यासाठी खिडकी, (३) पहिला आरसा, (४) वस्तुभिंग, (५) किरणांचे एकत्रीकरण करणारे भिंग, (६, ७) उलटी प्रतिमा सुलट करणारी भिंगे, (८) काटकोनी लोलक, (९) किरण बाहेर येण्यासाठी खिडकी, (१०) प्रकाशीय गाळणी, (११) नेत्रिका.जहाजावरील बुरुजातील परिदर्शक : साध्या परिदर्शकाला दूरदर्शकाची (दुर्बिणीची) जोड दिली, तर त्यामुळे प्रतिमा जास्त मोठी दिसू शकते. त्याचबरोबर निरीक्षण क्षेत्रही मोठे होते. असे परिदर्शक आरमारी जहाजांवरील तोफांसाठी उभारलेल्या बुरुजात किंवा रणगाड्यात वापरतात. आ. २ मध्ये अशा परिदर्शकाची रचना दाखविली आहे. शत्रूची दूरची जहाजे वगैरे पाहून त्यांच्यावर तोफांचा मारा लागू करण्यासाठी या परिदर्शकाचा उपयोग होतो. या परिदर्शकातील सर्व प्रकाशीय घटक एका धातूच्या नळीत बंदिस्त केलेले असतात. या नळीला प्रकाश आत येण्यासाठी आणि बाहेर जाण्यासाठी दोन भोके असून त्यांवर काचेच्या पट्ट्या पक्क्या बसविलेल्या असतात, त्यांना खिडक्या असे म्हणतात. दुसऱ्या आरशाच्या ऐवजी यात काटकोनी लोलक (८) वापरला आहे. (४) व (११) या भिंग प्रणालींचा (संचांचा) मिळून एक दूरदर्शक बनतो व (६), (७) या भिंगांच्या जोडीने प्रतिमा सुलटी केली जाते. या कामासाठी केव्हा केव्हा लोलकांचाही उपयोग करतात. (१०) येथे सुयोग्य प्रकाशीय गाळणी लावून प्रतिमेचे तेज सोयीस्कर असे करून घेतले जाते. हा परिदर्शक उभ्या अक्षाभोवती फिरवून सर्व बाजूंची टेहळणी करता येते. अशा दोन प्रणाली वापरून परासमापन करणेही (अंतर मोजणेही) शक्य होते [⟶परासमापक]. वरच्या (३) या आरशाची दिशा बदलून क्षितिजाच्या वरच्या किंवा खालच्या प्रदेशाचीही टेहळणी करता येते. या परिदर्शकामुळे मिळणारी प्रतिमा सु. १० पट विवर्धित असते व याचे कोनीय दृष्टिक्षेत्र ४० ते ६० असते.

आ. ३. निरीक्षकाला एकाच जागी बसून सर्व बाजूंचा देखावा पाहता येईल असा परिदर्शक : (१) खिडकी, (२) वरचा काटकोनी लोलक, (३) प्रतिमा सुलटी करण्यासाठी डोव्हे लोलक, (४) वस्तुभिंग, (५) पंचकोनी लोलक, (६) जाळी पडदा, (७) नेत्रिका.वरील पद्धतीचा परिदर्शक फिरविला, तर प्रतिमा पाहण्यासाठी निरीक्षकालाही फिरणे भाग पडते. हे टाळण्यासाठी वापरली जाणारी रचना आ. ३ मध्ये दाखविली आहे. या परिदर्शकात साध्या परिदर्शकातील वरच्या व खालच्या आरशांच्या ऐवजी (२) व (५) हे लोलक वापरले आहेत. प्रतिमा सुलटी करण्यासाठी (३) या डोव्हे लोलकाचा (एच्. डब्ल्यू. डोव्हे या जर्मन भौतिकीविज्ञांच्या नावाने ओळखण्यात येणाऱ्या लोलकाचा) वापर केलेला आहे. दंतचक्रमाला वापरून (किंवा अन्य उपायाने) अशी योजना केलेली असते की, वरचा (२) हा लोलक 0 या विशिष्ट कोनातून फिरविला, तर त्याबरोबरच (३) हा लोलक बरोबर ०/२ इतक्या कोनातून फिरावा. यामुळे निरीक्षकाला आपले स्थान न बदलता सर्व देखावा पाहता येतो.

पाणबुडीतील परिदर्शक : पाण्याच्या पृष्ठभागाखालून पाणबुडी जात असताना पाण्याच्या पृष्ठभागावरील लक्ष्ये दिसण्यासाठी परिदर्शकाची अत्यंत आवश्यकता असते. त्यामुळे येथे परिदर्शकाची लांबी सु. १२ मी. किंवा त्याहूनही जास्त असावी लागते. पाणबुडी पाण्यातून जात असताना पाण्याच्या रोधाने न वाकण्याइतकी आ. ४. पाणबुडीतील परिदर्शकाची रचना : (१) पहिला दूरदर्शक, (२) दृष्टिक्षेप विस्तारणारी भिंग प्रणाली, (३) दुसरा दूरदर्शकपरिदर्शकाची नळी बळकट असली पाहिजे, ती जरूरीनुसार वर-खाली करता आली पाहिजे. सर्वांत मुख्य म्हणजे या परिदर्शकाचे दृष्टिक्षेत्र विस्तृत असले पाहिजे. नळीच्या व्यासाच्या ५० पट (किंवा त्याहूनही अधिक) नळीची लांबी असते. यामुळे वरील परिदर्शकासारखी भिंग रचना वापरल्यास दृष्टिक्षेत्र फारच संकुचित होईल. दृष्टिक्षेत्र विस्तारण्यासाठी या परिदर्शकात अनेक भिंगाची मालिका वापरलेली असते. आ. ४. मध्ये या परिदर्शकाची रचना दाखविली आहे. यातील (१) ही भिंग प्रणाली मिळून पहिला (उलटा) दूरदर्शक बनतो व (३) या भिंग प्रणालीचा दुसरा (सुलटा) दूरदर्शक तयार होतो. या दोघांच्या संयुक्त क्रियेने अंतिम प्रतिमा सुलटी होते. (२) ही भिंग प्रणाली दृष्टिक्षेत्र विस्तारण्यासाठी आहे.

अंतदर्शक : मानवी शरीरातील घसा, जठर, मूत्राशय यांसारख्या अंतर्गत पोकळ्यांचे निरीक्षण करण्यासाठी किंवा तेथील छायाचित्रे घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या परिदर्शकाला अंतर्दर्शक असे म्हणतात. या उपकरणाच्या पुढल्या तोंडाला एक छोटा विद्युत् दिवा जोडलेला असतो. सर्व कार्यकारी घटक एका गुळगुळीत व अरुंद नळीत बसविलेले असतात. ज्या अंतर्गत पोकळीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग वक्र असतो त्यांच्यासाठी वापरण्याच्या उपकरणाची नळी लवचिक असून प्रकाश किरण बाहेर येण्याकरिता प्रकाशीय तंतूंचा जुडगा वापरलेला असतो. अशा उपकरणाच्या तोंडावर कर्तकाची जुळणी करून थोड्या अंतर्गत शस्त्रक्रियासुद्ध करता येतात.

संदर्भ : 1. Jacobs, D. H. Fundamentals of Opticals Engineering, New York, 1943.

2. Southall, J. P. Mirrors, Prisms and Lenses, New York, 1964.

घन, प. द. पुरोहित, वा. ल.