स्क्रीफर, जॉन रॉबर्ट : (३१ मे १९३१). अमेरिकन भौतिकीविज्ञ. अतिसंवाहकतेसंबंधीच्या ‘बीसीएस’ सिद्धांताची मांडणी केल्याबद्दल स्क्रीफर यांना ⇨ जॉन बारडीन आणि ⇨ लीअन एन्. कूपर यांच्या समवेत १९७२ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक मिळाले. बीसीएस सिद्धांत हे नाव बारडीन, कूपर व स्क्रीफर या नावांच्या आद्याक्षरांवरून पडलेले आहे. स्क्रीफर यांनी विकसीत केलेल्या गणितीय पद्धतींचा उपयोग पुढे अणुकेंद्रीय संरचनेतील विविध वैशिष्ट्यांच्या विवरासाठी यशस्वीपणे करण्यात आला.

जॉन रॉबर्ट स्क्रीफर

स्क्रीफर यांचा जन्म ओक पार्क (इलिनॉय, अमेरिका) येथे झाला. त्यांनी केंब्रिजमधील मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीची (एमआयटीची) पदवी (१९५३), पदव्युत्तर पदवी (१९५४) आणि डॉक्टरेट पदवी (१९५७) संपादन केल्या. या ठिकाणी असतानाच त्यांनी अतिसंवाहकतेच्या सिद्धांतासंबंधी संशोधन करण्यास सुरुवात केली. त्यांनी शिकागो विद्यापीठात (१९५७–५९) आणि इलिनॉय विद्यापीठात (१९५९–६२) अध्यापन केले. ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात भौतिकी विषयाचे मेरी ॲमंडा वुड प्राध्यापक (१९६४) आणि कॉर्नेल विद्यापीठात अँड्रू डी. व्हाइट प्राध्यापक (१९६९–७५) होते. १९८० सालापासून ते सँता बार्बारा येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात अध्यापनाचे कार्य करीत असतानाच १९८४ साली त्या विद्यापीठाचे कुलगुरू झाले. नंतर ते सैद्धांतिक भौतिकीच्या कावली इन्स्टिट्यूट या विद्यापीठात संचालक पदावर कार्यरत होते. १९९२ साली स्क्रीफर यांना फ्लॉरिडा विद्यापीठाच्या नॅशनल हाय मॅग्नेटिक फील्ड प्रयोगशाळेत प्रख्यात विद्वान अध्यापक व प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून नेमण्यात आले. तेथे असतानाच भौतिकीमधील कोठी तापमानास अतिसंवाहकता शोधनाचे कार्य चालू होते.

हाइके कामर्लिंग-ऑनेस यांनी १९११ मध्ये लावलेल्या अतिसंवाहकतेच्या शोधानंतर अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या कार्यामुळे अतिसंवाहकतेचा बीसीएस सिद्धांत विकसीत होण्यास मदत झाली. सुरुवातीचा बीसीएस सिद्धांत काल्पनिक संरचनेवर आधारित होता, तरीसुद्धा अतिसंवाहक पदार्थांच्या गुणधर्मांचे यशस्वीपणे स्पष्टीकरण देणे शक्य होते. (१) फेर्मी पृष्ठाजवळ असलेल्या इलेक्ट्रॉनाच्या विशेष संबंधामुळे निम्नतम अवस्थेत नीच ऊर्जा असतानासुद्धा इलेक्ट्रॉन-फोनॉन-इलेक्ट्रॉन यांमध्ये परस्परक्रिया कशा होतात आणि (२) अतिसंवाहक पदार्थांचे निरीक्षण केल्यास वरील नमूद केलेल्या अवस्थेत व उद्दीपित अवस्थेत मिळालेल्या वर्णलेखाचे कशा प्रकारे साम्य दर्शविता येईल, या समस्या सोडविण्याकरिता स्क्रीफर यांनी बारडीन व कूपर यांच्यासमवेत १९५५ साली काम करण्यास सुरुवात केली.

स्क्रीफर यांनी कूपर यांच्यासमवेत असे शोधून काढले की, अतिसंवाहक पदार्थात इलेक्ट्रॉन हे समुचयात जोडीने असतात. त्यालाच त्यांनी ‘कूपर जोडी’ असे संबोधले. अतिसंवाहक पदार्थामधील एका जोडीऐवजी संपूर्ण इलेक्ट्रॉनाच्या जोड्यांचे गतीच्या चलनाशी परस्परसंबंध जोडणे शक्य झाले.

स्क्रीफर यांनी अतिशय सोप्या पद्धतीने इलेक्ट्रॉनांची परस्परक्रिया ग्राह्य धरून निम्नतम अवस्थेत असलेले असणारे अतिसंवाहक पदार्थ तयार करण्यात यश मिळविले. त्यांनी अतिसंवाहक पदार्थाच्या ऊर्जेच्या विवराची आणि ऊर्जेच्या दृढीकरणाची विविध सुत्रे निरपेक्ष शून्य तापमानास तयार केली.

स्क्रीफर यांना नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे कॉमस्टॉक पारितोषिक (१९६८) आणि अमेरिकन फिजिकल सोसायटीचे द ऑलिव्हर इ बकली सॉलिड स्टेट फिजिक्स पारितोषिक मिळाले. त्यांना अमेरिकन सोसायटी ऑफ स्वीडिश इंजिनिअर्स या संस्थेचे जॉन एरिकसन पदक १९७६ मध्ये मिळाले आहे. १९७१ मध्ये त्यांची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेवर निवड झाली. ते अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आटर्स अँड सायन्स् आणि अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी या संस्थांचे सदस्य होते. त्यांनी १९६४ साली थिअरी ऑफ सुपरकंडक्टिव्हिटी हा ग्रंथ प्रसिद्ध केला.

खोब्रागडे, स्नेहा