डिरॅक, पॉल एड्रिएन मॉरिस : (८ ऑगस्ट १९०२–      ). ब्रिटिश गणितीय भौतिकीविज्ञ. ⇨ पुंजयामिकीतील कार्याकरिता व विशेषतः त्यांच्या इलेक्ट्रॉन सिद्धांताकरिता डिरॅक यांना १९३३ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक ⇨ एर्व्हीन श्रोडिंजर यांच्याबरोबर विभागून मिळाले. त्यांचा जन्म ब्रिस्टल येथे झाला. ब्रिस्टल विद्यापीठाची बी.एस्‌सी. (१९२१) व केंब्रिज विद्यापीठाची पीएच्.डी. (१९२६) या पदव्या मिळविल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील विस्कॉन्सिन व मिशिगन (१९२९) व प्रिस्टन (१९३१) या विद्यापीठांत अभ्यागत व्याख्याते म्हणून काम केले. परत आल्यावर त्यांची केंब्रिज विद्यापीठात गणिताचे प्राध्यापक म्हणून १९३२ साली नेमणूक झाली. १९४७–४८ मध्ये व पुन्हा १९५८–५९ मध्ये त्यांनी प्रिस्टन येथील इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्सड स्टडिज या संस्थेत काम केले. 

पॉल डिरॅक

विद्यार्थीदशेत असतानाच डिरॅक यांनी १९२६ मध्ये तरंगयामिकीचा (इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन यांसारख्या मूलकणांना असणाऱ्या तरंग गुमधर्मांचे गणितीय स्पष्टीकरण देणाऱ्या द्रव्याच्या संरचनेसंबंधीच्या सिद्धांताचा) एक वेगळा प्रकार शोधून काढून सैद्धांतिक भौतिकीत मौलिक भर घातली परंतु त्यांच्या आधी सु. तीन महिने हाच शोध जर्मनीमध्ये माक्स बोर्न व पी. योर्डान यांनी लावला होता. तथापि त्यांच्यापेक्षा डिरॅक यांची पद्धत जास्त व्यापक व तर्कसुलभ होती. पुंजयामिकीला ⇨सापेक्षता सिद्धांताची जोड देऊन त्यांनी इलेक्ट्रॉनाचे संपूर्ण विवरण चार तरंग समीकरणांनी करता येते, ही अभिनव क्रांतीकारक कल्पना मांडली. या समीकरणांवरून इलेक्ट्रॉनांची परिवलन गती वर्तविता येते. या परिवलन गतीचा शोध पूर्वीच लागलेला होता. या समीकरणांचा आणखी एक विशेष म्हणजे त्यांवरून इलेक्ट्रॉनांना ऋण ऊर्जा स्थिती असतात, असा क्रांतिकारक निष्कर्ष निघतो. या ऋण ऊर्जा स्थितीचा प्रथम काहीच बोध होत नव्हता. पुढे एका निबंधात डिरॅक यांनी अशी कल्पना मांडली की, या ऋण ऊर्जा स्थितीत एखादी पोकळी किंवा रिक्तता निर्माण झाल्यास ती धन भारयुक्त इलेक्ट्रॉनाचे म्हणजे पॉझिट्रॉनाचे गुणधर्म दाखवील. पुढे १९३२ मध्ये सी. डी. अँडरसन यांनी या पॉझिट्रॉनाचा शोधही लावला. त्यानंतर डिरॅक यांनी इलेक्ट्रॉन व त्याच्या वर्गांतील कणांना लागू पडणारी सांख्यिकी [ फेर्मीडिरॅक सांख्यिकी → सांख्यिकीय भौतिकी] शोधून काढली. त्याचप्रमाणे प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) पुंज सिद्धांत त्यांनी मांडला. त्यांच्या मतानुसार निसर्गाचे नियम आपणाला द्रव्याच्या गुणधर्मांपैकी काही विभागाचीच माहिती देतात, पण त्यावरून आपणाला विशिष्ट आविष्काराचे संपूर्ण चित्र मनापुढे उभे करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास त्यातून काही असंबद्ध निष्कर्ष निघू लागतात म्हणून कोणत्याही सिद्धांताची मांडणी करताना प्रतिमानांचा (प्रतिकृतींचा ) उपयोग करणे टाळले पाहिजे. 

सैद्धांतिक भौतिकीमध्ये डिरॅक यांचे स्थान फार वरचे म्हणजे ॲल्बर्ट आइनस्टाइन किंवा निल्स बोर यांच्या तोलाचे मानण्यात येते. १९३० साली रॉयल सोसायटीने त्यांची सदस्य म्हणून निवड केली आणि त्यांना रॉयल पदक (१९३९) व कॉप्ली पदक (१९५२) बहुमानही दिले. अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सदस्य म्हणून त्यांची १९४९ मध्ये निवड झाली. प्रिन्सिपल्स ऑफ क्वांटम मेकॅनिक्स  (१९३०) हा ग्रंथ व पुंज सिद्धांतावरील त्यांचे अनेक निबंध सुप्रसिद्ध आहेत.                                           

 भदे, व. ग. पुरोहित वा. ल.