बेक्रेल, आंत्वान आंरी : (१५ डिसेंबर १८५२ – २५ ऑगस्ट१९०८). फ्रेंच भौतिकीविज्ञ. नैसर्गिक किरणोत्सर्गाच्या [⟶ किरणोत्सर्ग] शोधाबद्दल त्यांना ⇨ प्येअर क्यूरी व ⇨ मारी क्यूरी यांच्याबरोबर १९०३ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

आंत्वान आंरी बेक्रेल

आलेक्सांद्र एद्माँ बेक्रेल यांचे हे पुत्र होत. आंत्वान यांचा जन्म पॅरिस येथे झाला. एकोल पॉलिटेक्निकमधून पदवी मिळविल्यानंतर १८७४ मध्ये पूल व बंधारे बांधणी खात्यात त्याची नेमणूक झाली. या खात्यात ते १८७७ मध्ये अभियंते व १८९४ मध्ये मुख्य अभियंते झाले. १८८८ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. १८७८ पासून त्यांनी पॅरिस येथील म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये साहाय्यक म्हणून तसेच स्कूल अँड म्युझियम ऑफ आर्ट्‌स अँड क्राफ्ट्‌स येथे त्यांच्या वडिलांच्या जागी अनुप्रयुक्त भौतिकीच्या अध्यासनावर काम केले. १८९२ मध्ये म्युझियम ऑफ नॅचरल हिस्टरीमध्ये अनुप्रयुक्त भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व १८९५ मध्ये ते एकोल पॉलिटेक्निकमध्ये भौतिकीचे प्राध्यापक झाले.

 बेक्रेल यांचे सुरुवातीचे कार्य ध्रुवित (विशिष्ट प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशाच्या प्रतलाचे चुंबकीय क्षेत्रामुळे होणारे वलन [⟶ प्रकाशकी], पृथ्वीच्या चुंबकत्वाचा तिच्या वातावरणावर होणारा परिणाम, प्रस्फुरणाचा (विद्युत् चुं‌बकीयप्रारण – तरंगरूपी ऊर्जा – वा अन्य क्षोमकारक कारणामुळे उद्‌भवणाऱ्या व क्षोभकारक उद्‌गम काढून घेतल्यावरही चालू राहणाऱ्या विशिष्ट पदार्थांकडून होणाऱ्या प्रकाशाच्या उत्सर्जनाचा) आविष्कार आणि स्फटिकांनी प्रकाशाचे होणारे शोषण (डॉक्टरेटकरिता सादर केलेले प्रबंध) यांविषयी होते. डब्ल्यू. सी. राँटगेन यांनी लावलेल्या क्ष-किरणांच्या शोधाबद्दल जानेवारी १८९६ मध्ये माहिती मिळाल्यावर नैसर्गिक प्रस्फुरक पदार्थ यासारख्या किरणांचे उद्‌गम असतात की काय यावर संशोधन करण्याकडे बेक्रेल यांचे लक्ष वळले. वडिलांकडून त्यांना युरेनियम लवणांचा पुरवठा वारसा हक्काने मिळाला होता. ही लवणे प्रकाशात ठेवल्यास प्रस्फुरण पावतात. अपारदर्शक कागदी वेष्टनातील छायाचित्रण काचपट्ट्यांच्या शेजारी ही लवणे ठेवल्यास काचपट्ट्यांवर त्यांचा परिणाम होऊन त्या धुकट होतात, असे त्यांना आढळून आले. अभ्यास केलेल्या सर्व युरेनियम लवणांबाबत हा आविष्कार दिसून आला व त्यावरून युरेनियमाच्या अणूचा हा गुणधर्म आहे, असा त्यांनी निष्कर्ष काढला. युरेनियम व छायाचित्रण पट्टी यांमध्ये धातूंचीपदके ठेवून त्यांची छायाचित्रे बेक्रेल यांनी मिळविली. पदकांच्या कमीजास्त जाडीमुळे युरेनियमापासून उत्सर्जित होणारे प्रारण निरनिराळ्या प्रमाणांत अडविले गेले, असे त्यांना दिसून आले. युरेनियमापासून उत्सर्जित होणारे किरण वायूंचे आयनीकरण (विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगटांत रूपांतर करण्याची क्रिया) करतात आणि विद्युत् वा चुंबकीय क्षेत्रांमुळे त्यांचे विचलन होते व त्याबाबतीत ते क्ष-किरणांहून भिन्न आहेत, असे त्यांनी नंतर दाखवून दिले. युरेनियमापासून उत्सर्जित होणाऱ्या किरणांना कित्येक वर्षे ‘बेक्रेल किरण’ असे नाव प्रचलित होते.

फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य म्हणून १८८९ मध्ये त्यांची निवड झाली. १९०६ मध्ये ते ॲकॅडेमीचे उपाध्यक्ष, १९०८ मध्ये अध्यक्ष व त्याच वर्षी कायम सचिव झाले. ते बर्लिनची रॉयल ॲकॅडेमी, लंडनची रॉयल सोसायटी इ. अनेक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य होते. १९०० साली त्यांना लिजन ऑफ ऑनरच्या अधिकारीपदाचा सन्मान देण्यात आला. ते ल क्र्‌वाझीक येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.