क्यूरी, मारी : (७ नोव्हेंबर १८६७ – ४ जुलै १९३४). किरणोत्सर्ग (काही मूलद्रव्यांचे कण वा किरण बाहेर टाकून होणारे विघटन) आणि रेडियमासंबंधीच्या संशोधनाकरिता प्रसिद्ध असलेल्या फ्रेंच स्त्री रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. मूळ नाव मार्या स्क्लॉडॉफस्का. त्यांचा जन्म पोलंडमधील वॉर्सा येथे झाला. वयाच्या सोळाव्या वर्षी पदवी मिळवल्यानंतर वॉर्सातील औद्योगिक संग्रहालयाच्या भौतिकी प्रयोगशाळेत त्यांनी काही काळ काम केले. विद्यार्थ्यांच्या क्रांतिकारक चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना वॉर्सा सोडावे लागले. त्यामुळे त्यांनी प्रथम क्रॅको येथे व नंतर पॅरिसला प्रयाण केले. सोरबोन विद्यापीठात पोलादाच्या चुंबकीय गुणधर्मासंबंधी संशोधन करीत असताना १८९१ साली त्यांची प्येअर क्यूरी यांच्याशी भेट झाली व १८९५ मध्ये त्यांचा विवाह झाला.

मारी, क्यूरी

बेक्रेल यांनी १८९६ मध्ये युरेनियम संयुगांतील किरणोत्सर्गाच्या लावलेल्या शोधाकडे क्यूरी दांपत्याचे लक्ष वेधले व युरेनियमाप्रमाणेच थोरियमाची धातुकेही (कच्च्या स्वरूपातील धातूही) किरणोत्सर्गी असतात, असे त्यांनी दाखविले. १८९८ च्या जुलैमध्ये त्यांनी पोलोनियम या नवीन किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा व त्याच वर्षाच्या डिसेंबर मध्ये बेमाँट यांच्या सहकार्याने रेडियमाचा शोध लावला. या दोन्ही मूलद्रव्यांची संयुगे पिचब्लेंडापासून वेगळी करण्यासाठी त्यांना कित्येक महिनेपर्यंत चिकाटीने परिश्रम घ्यावे लागले. या त्यांच्या शोधाकरिता लंडनच्या रॉयल सोसायटीतर्फे डेव्ही पदक व ब्रेकेल यांच्याबरोबर १९०३ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक त्यांना मिळाले.

पतीच्या अपघाती निधनानंतर मारी क्यूरी यांची सोरबोन विद्यापीठात भौतिकीच्या प्राध्यापकपदावर १९०६ मध्ये नेमणूक झाली. त्यांनी रेडियमासंबंधीचे संशोधन पुढे चालू ठेवले. रेडियम धातुस्वरूपात तयार करण्यात त्यांनी प्रथमच यश मिळविले आणि त्याचा अणुभार व इतर भौतिकी गुणधर्मांचीही त्यांनी नोंद केली.१९११ मध्ये रेडियम क्लोराइडापासून रेडियम धातू वेगळी करण्यासंबंधीच्या कार्याबद्दल त्यांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. अशा प्रकारे नोबेल पारितोषिक दोनदा मिळविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्यांच्या सन्मानार्थ पदार्थाच्या किरणोत्सर्गाचे प्रमाण मोजण्याच्या एककाला ‘क्यूरी’ असे नाव देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ९६ क्रमांकाच्या मानवनिर्मित मूलद्रव्याला ‘क्यूरियम’ हे नाव देण्यात आलेले आहे. पहिल्या महायुद्धात वैद्यकीय मदतीसाठी त्यांनी महत्वाचे कार्य केले. १९१८ मध्ये पॅरिस विद्यापीठातील रेडियम इन्स्टिट्यूच्या क्यूरी प्रयोगशाळेच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. रोगांवर प्रतिबंधक उपाय म्हणून रेडियमाचा उपयोग करण्यासंबंधीही त्यांनी संशोधन केले. रेडियमाच्या उपयोगाचे पेटंट घेण्यासंबंधी अनेकांनी त्यांना सुचविले होते, परंतु मानवजातीच्या कल्याणाच्या एका शोधाचा असा उपयोग करणे त्यांना मान्य नसल्यामुळे त्यांनी पेटंट घेतले नाही.

आपल्या मायदेशी वॉर्सा येथे किरणोत्सर्गाचा अभ्यास करण्यासाठी प्रयोगशाळा स्थापन करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. त्यांची मुलगी ईरेन (१८९७ – १९५६) [ झॉल्यो क्यूरी, ईरेन] व तिचे पती फ्रेदेरिक झॉल्यो (१९०० – ५८) यांनीही किरणोत्सर्गासंबंधी पुढे संशोधन केले. जगातील अनेक संस्थांतर्फे मारी क्यूरी यांना सन्माननीय पदव्या व इतर सन्मान देण्यात आले. त्या लीग ऑफ नेशन्सच्या कमिशन फॉर इंटलेक्च्यूअल को-ऑपरेशनच्या उपाध्यक्षा होत्या. त्यांनी लिहिलेल्या शास्त्रीय ग्रंथांत Recherches sur les substances radioactives (१९०४) व Trait de radioactive (२ खंड, १९१०) हे विशेष प्रसिद्ध आहेत. फ्रान्समधील सव्हॉय येथे त्या मृत्यू पावल्या.

भदे, व. ग.