प्रकाशक्षेपक : प्रकाशक्षेपकांचे प्रथमारंभीच दोन अलग प्रकार करता येतात. ते प्रतिमाक्षेपक आणि प्रकाशझोतक्षेपक हे होत. चित्रदीप (मॅजिक लँटर्न) किंवा चलच्चित्रपट प्रक्षेपक ही पहिल्या प्रकारची उदाहरणे आहेत, तर मोटारीचे पुढचे दिवे, शोध दीप किंवा वर्तुळदीप ही दुसऱ्या  प्रकारची उदाहरणे आहेत. प्रस्तुत लेखाच्या पहिल्या भागांत प्रतिमाक्षेपकांची चर्चा केली असून दुसऱ्या भागात झोतक्षेपकांचा आढावा घेतला आहे.

प्रतिमाक्षेपक : ही प्रकाशीय उपकरणे असून ह्यांच्या साहाय्याने लहान वस्तूची मोठी व खरी प्रतिमा पडद्यावर पाडता येते. ह्या उपकरणाचा मुख्य फायदा हा आहे की, ह्याच्या साहाय्याने अनेक प्रेक्षक एकाच वेळी पडद्यावरील प्रतिमा पाहू शकतात. प्रतिमेचे वर्धन केलेले असल्यामुळे तिच्यातील बारकावे जास्त चांगले दिसू शकतात. जाहिरात करण्यास व शैक्षणिक संस्थांत विषय शिकविण्याकरिता यांचा उपयोग करतात.

आ. १. प्रतिमा सुलटी करण्यासाठी दर्पणाचा उपयोग : (१) प्रतिमाक्षेपक, (२) दर्पण, (३) अर्धपारदर्शक पडदा, (४) प्रेक्षक.

सर्वसाधारणपणे प्रतिमाक्षेपक पडद्याच्या ज्या बाजूला प्रेक्षक असतील त्याच बाजूला असतो व पांढऱ्या  अपारदर्शक अशा पडद्यावर प्रतिमा पाडली जाते. दुसऱ्या प्रकारात पडद्याच्या एका बाजूला प्रेक्षक व दुसऱ्या बाजूला क्षेपक असतो. ह्या वेळेस पडदा अर्धपारदर्शक असतो. ह्या प्रकारात प्रेक्षकांना दिसणाऱ्या  प्रतिमेत डावी बाजू उजवीकडे व उजवी बाजू डावीकडे दिसते हा दोष दूर करण्याकरिता आ. १ मध्ये दाखविल्याप्रमाणे एक दर्पण (सपाट आरसा) ४५° कोन करून बसविलेला असतो.

मुख्य घटक : सर्व प्रतिमाक्षेपकांच्या अभिकल्पात (आराखड्यात) तीन मुख्य घटक असतात : (१) पदार्थाचे प्रकाशन करण्याकरिता लागणारा प्रकाशीय व्यूह, (२) पदार्थाकडून परावर्तित होऊन किंवा त्यातून पारगत होऊन येणाऱ्या किरणांचे केंद्रीकरण करून त्यांचे प्रक्षेपण करता येईल अशी प्रकाशीय रचना व (३) प्रतिमा ग्रहण करू शकेल असा पडदा.

प्रकाशन व्यूह : या व्यूहाकडून इष्ट वस्तूचे किंवा पारदर्शिकेचे जास्तीत जास्त तीव्रतेचे व एकविध असे प्रकाशन व्हावे हा उद्देश असतो. एकूण व्यूहाचे तीन भाग पडतात : (१) प्रकाशदायक दिवा, (२) आजूबाजूला जाऊन फुकट जाणारा प्रकाश वस्तूवर पाडून तिच्या प्रकाशनाची तीव्रता वाढविण्यासाठी परावर्तक आणि (३) हा प्रकाश एकत्रित करून प्रतिमेचे चकासन (तेजस्वीपणा) वाढविण्यासाठी संघनक भिंग.

चांगल्या दिव्यांच्या अभावी आरंभीच्या प्रतिमाक्षेपकांची कार्यक्षमता फारच थोडी असे. पुढे चांगल्या ज्वालकाचा शोध लागल्यानंतर ही उणीव बऱ्याच प्रमाणात दूर झाली. आधुनिक प्रतिमाक्षेपकांत नेहमीच्या दिव्यापेक्षा उच्च तापमानावर चालणारे खास विद्युत्‌ दीप किंवा प्रज्योत दीप वापरले जातात. दिव्यातील तप्त तंतूचे तापमान वाढविल्यामुळे अधिक प्रखर प्रकाश मिळतो परंतु त्याचबरोबर दिव्याचे आयुर्मान खूपच कमी होते. उदा., साध्या विद्युत्‌ दीपाच्या तंतूचे तापमान सु. २,७००° के. व आयुर्मान सरासरीने १,००० तास असते. क्षेपक दिव्याचे तापमान ३,०००° के. व आयुर्मान सु. २५ तासच असते. या दिव्यात थोडे आयोडीन घातल्यास त्यामुळे त्याचे तापमान ३,३५०° के. करूनही आयुर्मान ५० तासपर्यंत वाढते. अशा दिव्यांना टंगस्टन-हॅलोजन दीप असे म्हणतात. हे दिवे आकारमानानेही अत्यंत लहान असल्याने प्रक्षेपकात बसविण्यासाठी फार सोयीचे असतात. प्रेक्षकांच्या लहान समुदायाकरिता प्रक्षेपण करण्यासाठी ५० ते १,००० वॉट शक्तीचे दिवे वापरले जातात. ३५ किंवा ७० मिमी. चलच्चित्रपटाच्या प्रक्षेपणासाठी कार्बन प्रज्योत किंवा झेनॉन विसर्जन दीप वापरतात.

दिव्यापासून निघणाऱ्या प्रकाशाचा जास्तीत जास्त भाग शेवटी पडद्यावर पाडला गेला पाहिजे म्हणजे जास्तीत जास्त तेजस्वी चित्र प्रक्षेपित होईल. दिव्याच्या मागे व बाजूंना जाणारा प्रकाश एकवटून प्रक्षेपण करावयाच्या पारदर्शिकेतून जावा यासाठी त्याला अंतर्वक्र आरशाची जोड देतात. (त्यामुळे सु. ३०% जादा प्रकाश प्रतिमेमध्ये येऊ शकतो). हे आरसे गोलीय किंवा अन्वस्तपृष्ठीय किंवा विवृत्तपृष्ठीय (ज्याचा परावर्तक पृष्ठभाग अन्वस्त – पॅराबोला – किंवा विवृत्त म्हणजे लंबवर्तुळ अक्षाभोवती फिरवून तयार होणाऱ्या पृष्ठाचा एक भाग आहे अशा) आकाराचे असतात. त्याचप्रमाणे दिवा व पारदर्शिका यांच्या दरम्यान संघनक भिंग अशा तऱ्हेने ठेवतात की, दिव्यातील तप्ततंतूची प्रतिमा प्रक्षेपक भिंगावर पडावी. यामुळे प्रक्षेपित चित्र जास्तीतजास्त तेजस्वी मिळते. 


पूर्वीच्या काळी दिवा, परावर्तक व संघनक भिंग हे अलग अलग असत. त्यामुळे परस्परांच्या संदर्भात त्यांची स्थाने अगदी काटेकोरपणे ठेवता येत नसत. त्याचप्रमाणे परावर्तक पृष्ठाची झिलई हवेच्या परिणामामुळे कमी होई. या गोष्टी टाळण्यासाठी आधुनिक रचनेत हे तिन्ही भाग एकत्रित केलेले असतात. आ. २ मध्ये अशा एकत्रित प्रक्षेपक दिव्याची रचना दाखविली आहे.

आ. २. एकत्रित पद्धतीचा प्रक्षेपक दिवा : (अ) दिव्याचे समोरून दिसणारे दृश्य : (१) तप्त तंतू, (२) पारदर्शक भाग, (३) बाहेरून चांदीचा मुलामा दिलेला भाग (आ) दिव्याचा उभा छेद : (१) विवृत्तपृष्ठीय परावर्तक भाग, (२) अर्धगोलीय परावर्तक भाग, (३) येथे किरण केंद्रित होतात, (४) पारदर्शिकेचे स्थान.

प्रक्षेपक-भिंग-प्रणाली : एका बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने पारदर्शिकेची प्रतिमा पडद्यावर पाडता येणे शक्य आहे परंतु चांगल्या उपकरणात यासाठी एक भिंग-प्रणालीच (भिंगाचा समूह) वापरली जाते. याची अनेक कारणे आहेत. एक म्हणजे मर्यादित अंतरावर ठेवलेल्या पडद्यावर मोठी प्रतिमा मिळण्यासाठी भिंगाचे केंद्रांतर कमी असावे लागते व त्याचा व्यास मोठा असावा लागतो. ही गोष्ट एका भिंगापेक्षा भिंग-प्रणाली वापरून जास्त चांगल्या तऱ्हेने साधता येते. दुसरी गोष्ट, एका भिंगाच्या साहाय्याने मिळणाऱ्या प्रतिमेत विविध विकृती येतात [⟶ भिंग प्रकाशीय व्यूहांतील विपथन]. त्यांचे निर्मूलन सुयोग्य भिंग-प्रणालीच्या साहाय्याने करता येते. शेवटी म्हणजे पडद्यावरील प्रतिमेमध्ये प्रकाशतीव्रतेचे एकविध वितरण मिळविणेही भिंग-प्रणालीमुळे शक्य होते.

पडद्यावरील प्रतिमा जास्तीतजास्त स्पष्ट करता येण्यासाठी भिंग-प्रणाली व पारदर्शिका यांच्यामधील अंतर कमीजास्त करता येण्याची व्यवस्था केलेली असते. पडद्यावरील प्रकाशनाच्या तीव्रतेचे नियंत्रण करण्यासाठी केव्हा केव्हा छिद्रपटल किंवा झडपही बसविलेली असते. प्रक्षेपक भिंग-प्रणालीतील भिंगांवर तीव्र प्रकाश केंद्रित होत असल्यामुळे ती खूप गरम होतात. म्हणून ती उच्च तापमान सहन करू शकतील अशी असावी लागतात. कॅमेऱ्याची भिंगे येथे उपयोगी पडू शकत नाहीत. चांगला प्रक्षेपक थंड ठेवण्यासाठी त्यात विद्युत्‌ पंखा बसविलेला असतो.

पडदा : अर्धपारदर्शक पडद्याबद्दल थोडे विवेचन प्रारंभी आलेच आहे. सामान्यतः पडद्याचा पृष्ठभाग परावर्तक असतो. हे परावर्तन संपूर्णपणे विसरित (सर्वत्र विखुरणारे) परावर्तन असल्यास पडद्यावरील चित्र काहीसे कमी तेजस्वी दिसते परंतु त्याची भरपाई मूळ प्रक्षेपकाची प्रकाशतीव्रता वाढवून करता येते. त्याचप्रमाणे प्रक्षेपण चांगल्या अंधाऱ्या दालनात केल्यासही चित्र तेजस्वी वाटते. या तऱ्हेच्या पडद्याचा मुख्य गुण म्हणजे प्रक्षेपित चित्र सर्व बाजूंनी सारखेच चांगले दिसते. जेव्हा प्रक्षेपित चित्राची प्रकाशतीव्रता वाढविता येणे सहज शक्य नसते तेव्हा पृष्ठभाग काहीसा चकचकीत केलेला पडदा वापरतात. याच्या पृष्ठभागावरून होणारे परावर्तन अंशतः विसरित अंशतः दर्पणावरील परावर्तनासारखे असते. त्यामुळे काही विशिष्ट दिशेने पहाता पडद्यावरील प्रतिमेचे चकासन वाढलेले दिसते.

उपरिदर्श व अंतरादर्श : प्रतिमाक्षेपक जरी विविध प्रकारचे असले, तरी सर्वसाधारणपणे त्यांचे उपरिदर्श व अंतरादर्श असे दोन प्रकार करता येतील. उपरिदर्श प्रतिमाक्षेपकात अपारदर्शक पदार्थांच्या परावर्तित किरणांनी होणाऱ्या प्रतिमेचे, तर अंतरादर्श प्रतिमाक्षेपकामध्ये पारदर्शिकेमधून पारगत होणाऱ्या प्रकाशकिरणांनी प्रतिमेचे प्रक्षेपण होते. सर्वदर्शक दीप किंवा अंतरोपरिदर्श म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रतिमाक्षेपकात वरील दोन्ही प्रकार एकत्रित केलेले असतात.

उपरिदर्श : ह्याच्या साहाय्याने अपारदर्शक वस्तू, छायाचित्रे, छापील मजकूर, नकाशे वगैरेच्या प्रतिमांचे प्रक्षेपण पडद्यावर करता येते. आ. ३ मध्ये अशा प्रकारचा उपरिदर्श दाखविला आहे. दिव्यापासून निघणारे प्रकाशकिरण वस्तूवर पडून त्यांचे परावर्तन होते. हे परावर्तित किरण ४५° चा कोन करून ठेवलेल्या दर्पणावरून पुन्हा परावर्तित होतात व नंतर प्रक्षेपक भिंग-प्रणालीवर पडून त्यांचे प्रणमन होऊन पडद्यावर मोठी, खरी व उलटी प्रतिमा मिळते. उलटी प्रतिमा ही विशेषतः छापील मजकूराच्याबाबतीत अनिष्ट असते,

आ. ३. उपरिदर्श : (१) दिवा, (२) परावर्तक, (३) वस्तू ठेवण्याकरिता फलक, (४) दर्पण, (५) प्रक्षेपक भिंग-प्रणाली.म्हणून दर्पण वापरून त्याच्या साहाय्याने सुलट प्रतिमा मिळवितात. ह्यामध्ये वस्तूवर पडलेल्या प्रकाशाचे सर्व दिशांना विसरित परावर्तन होते. म्हणून फारच थोडा प्रकाश भिंगातून जातो आणि प्रतिमा अंधुक

दिसते म्हणूनच परावर्तकांची जोड दिलेले प्रखर प्रकाश देणारे दिवे व संपूर्ण अंधार असणारी खोली यांची आवश्यकता असते. प्रखर दिव्यांमुळे निर्माण होणाऱ्या  उष्णतेचे निराकरण करून उपकरण थंड राखण्याकरिता पंख्याचा उपयोग करावा लागतो.

अंतरादर्श : या प्रतिमाक्षेपकाच्या साहाय्याने, काचेवर किंवा फिल्मवर काढलेल्या छायाचित्रांची किंवा रेखाचित्रांची फार मोठी व खरी प्रतिमा पडद्यावर पाडता येते. हे प्रतिमाक्षेपक दोन प्रकारचे असतात : (१) स्थिर चित्र-प्रक्षेपक व (२) चलच्चित्र-प्रक्षेपक. दोन्ही प्रकारचे प्रतिमाक्षेपक निरनिराळ्या आकारांत व आकारमानांत मिळतात. ज्या तऱ्हेचे प्रक्षेपण करावयाचे असेल त्याला अनुरूप असा प्रतिमाक्षेपक निवडतात. यातील सर्वांत जुन्या प्रकारच्या प्रतिमाक्षेपकाला चित्रदीप (मॅजिक लँटर्न) असे म्हणतात. ह्यामध्ये ८·२५ X ८·२५ सेंमी.च्या पारदर्शिका (स्लाईड) वापरतात. हल्ली ३५ मिमी. रुंदीच्या लहान पारदर्शिका वापरात आहेत. चलच्चित्र प्रक्षेपकात सर्वसाधारणपणे ८ मिमी., १६ मिमी. किंवा ३५ मिमी. रुंदीच्या फिल्म वापरतात. 


 स्थिर चित्र-क्षेपक :अंतरादर्श हा उपरिदर्शापेक्षा जास्त कार्यक्षम असतो. कारण पारदर्शिकेतून सरळ पारगत झालेल्या प्रकाशाची तीव्रता ही वस्तूपासून परावर्तित झालेल्या प्रकाशाच्या तीव्रतेपेक्षा खूपच जास्त असते. दुसरे म्हणजे ह्यामध्ये दिव्याच्या मागे परावर्तकाचा वापर करून प्रकाशाची तीव्रता अधिक करतात आणि संघनक भिंग वापरून प्रकाश एकत्र केल्याने पडद्यावर स्पष्ट व तेजस्वी प्रतिमा मिळते. वास्तविक पाहता सर्व प्रकारच्या अंतरादर्श प्रतिमाक्षेपकांची क्रिया सारखीच असते. फरक फक्त प्रकाशाच्या उद्‌गमाची तीव्रता व 

आ. ४. चित्रदीप : द – विद्युत्‌ दीप, अ – अंतर्वक्र परावर्तक, स – संघनक भिंग, प – पारदर्शिका, भ – प्रक्षेपक भिंग-प्रणाली.

मिळणारे वर्धन ह्यांमध्येच असतो. आ. ४ वरून अंतरादर्शाची रचना लक्षात येईल. हा विशिष्ट आकाराचा विजेचा दिवा आहे. काही उपकरणांत दिव्याऐवजी कार्बनची विद्युत्‌ प्रज्योत वापरतात. त्यामुळे फारच प्रखर प्रकाश मिळतो. ह्या परावर्तकामुळे दिव्याच्या तंतूपासून निघून मागे जाणाऱ्या किरणांचे परावर्तन होऊन मिळणारी तंतूची प्रतिमा पुन्हा तंतूच्या प्रतलातच पडल्यामुळे प्रतिमेची तीव्रता ३० टक्क्यांनी वाढते. हे परावर्तक अंतर्गोल दर्पण किंवा त्या प्रकारचे असतात. हे संघनक भिंग आकारमानाने पारदर्शिकेपेक्षा मोठे असते व त्याचा मुख्य उपयोग पारदर्शिकेवर सर्व ठिकाणी एकसारखा प्रकाश पाडला जावा म्हणून होत असतो. या प्रक्षेपक भिंग-प्रणालीमुळे पारदर्शिकेची मोठी व खरी प्रतिमा पडद्यावर मिळते. पडद्यावर सुलटी प्रतिमा मिळविण्याकरिता पारदर्शिका उलटी करून ती धारक चौकटीत बसवितात. 

या प्रतिमाक्षेपकामध्ये प्रखर प्रकाशामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेचे निराकरण करावे लागते कारण या उष्णतेमुळे काचेवरील किंवा फिल्मवरील चित्राची खराबी होण्याचा संभव असतो. याकरिता चांगले वायुवीजन करून (हवा खेळती राहण्याची योजना करून) किंवा पंखा बसवून उपकरणातील तापमानाची वाढ कमी करावी लागते.

हल्ली शैक्षणिक संस्थांतून विशेषेकरून वापरले जाणारे ३५ मिमी. चे प्रतिमाक्षेपक अत्यंत आटोपशीर आकारमानाचे असून वापरण्यास सोयीचे असतात. त्यांच्यामध्ये उच्च दीप्ति-तीव्रतेचे परंतु लहान आकारमानाचे ‘एकत्रित प्रकाराचे’ टंगस्टन-हॅलोजन दीप वापरून उपकरणाचे एकूण आकारमान कमी केलेले असते. याची एकूण सर्वसामान्य रचना चित्रदीपासारखीच असते. फिल्म-पट्टिका-क्षेपकाची एकूण रचना वरीलप्रमाणेच असते. फिल्म-पट्टिकेवर एकाच विषयावरील उपकरणे किंवा आलेख, कोष्टके इत्यादींची छायाचित्रे योग्य अनुक्रमाने मुद्रित केलेली असतात. एका पट्टिकेवर सामान्यतः एकूण १५ ते २५ पर्यंत चित्रे असतात. पट्टिकेवरील बाजूची भोके एका दातेरी चक्राच्या दात्यावर बरोबर असतात. हे चक्र फिरवून लागोपाठ एकएका चित्राचे प्रक्षेपण करता येते. अणुभट्टी कणवेगवर्धक (विद्युत्‌ भारित आणवीय कण किंवा मूलकण यांना अतिशय उच्च वेग प्राप्त करून देणारी प्रयुक्ती) यासारख्या दुष्प्राप्य साधनांच्या रचना व कार्यपद्धती शिकविण्यासाठी तज्ञांच्या साहाय्याने तयार केलेल्या अशा फिल्म-पट्टिका आयत्या तयार मिळतात.

चित्रदीप व उपरिदर्श या दोहोंचेही कार्य करणारे एक संयुक्त उपकरण (सर्वदर्शक दीप किंवा अंतरोपरिदर्श) मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. त्यामुळे ही दोन वेगळी उपकरणे ठेवावी लागत नाहीत. याचे अनेक प्रकार आहेत. एका प्रकारात एका तरफेच्या साहाय्याने प्रक्षेपक दीप व त्याच्या मागचा परावर्तक यांची स्थाने बदलता येतात व जरूरीनुसार या उपकरणाचा चित्रदीप किंवा उपरिदर्श असा उपयोग करता येतो.

पारदर्शिका बदलणे : चित्रदीपात एक पारदर्शिका बदलून दुसरी दाखविताना मधे खंड पडू नये म्हणून एका ओळीत दोन पारदर्शिका बसविता येतील अशी धारक चौकट असते. एका पारदर्शिकेचे प्रक्षेपण संपले की चौकट सरकवून दुसरी पारदर्शिका योग्य जागी येते व तिचे प्रक्षेपण चालू असताना पहिली प्रक्षेपण झालेली पारदर्शिका काढून घेऊन तिच्या जागी नवी घालतात. याप्रमाणे सर्व पारदर्शिका संपेपर्यंत केले जाते.

३५ मिमी. प्रक्षेपकाच्या एका प्रकारात एकदम १०-२० पारदर्शिका घातल्या की, स्वयंचलित यंत्रणेने त्या एकामागून एक प्रक्षेपित केल्या जातात. शेवटी प्रक्षेपकाचा विद्युत्‌ प्रवाह आपोआप खंडित व्हावा अशीही योजना असू शकते. जाहिराती दाखविण्यासाठी तयार केलेल्या एका प्रकारच्या ३५ मिमी. प्रक्षेपकात दाखवावयाच्या सर्व पारदर्शिका एका वर्तुळाकार धारकात ओळीने लावलेल्या असतात. हे वर्तुळ फिरवून सर्व पारदर्शिका एकामागून एक दाखविण्याचे एक चक्र संपले की पुन्हा दुसरे चक्र सुरू होते.

चलच्चित्र प्रक्षेपण : सामान्यतः ८ मिमी., १६ मिमी. व ३५ मिमी. रुंदीच्या फिल्म चलच्चित्र प्रक्षेपणासाठी वापरल्या जातात. पूर्वी या ध्वनिविरहित असत. आता त्यांना बहुधा ध्वनीचीही जोड दिलेली असते. अलीकडे ६५ मिमी. व ७० मिमी. रुंदीच्या फिल्मही वापरात आल्या आहेत.

सामान्यतः लहान प्रेक्षक समूहाकरिता ८ मिमी. व १६ मिमी. फिल्म वापरतात. मोठ्या चित्रपटगृहात ३५ मिमी. फिल्मच बहुधा वापरली जाते. शैक्षणिक चित्रपट दाखविण्यासाठी शाळा, महाविद्यालयांतून ८ किंवा १६ मिमी.च्या फिल्मांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होतो. कारण ३५ मिमी. फिल्मचा प्रक्षेपक फारच अवजड आणि किंमतवान असतो, तर १६ मिमी. फिल्मचा प्रक्षेपक आटोपशीर आकारमानाचा व माफक किंमतीचा असतो. गावोगावी जाऊन करावयाच्या फिरत्या चित्रपट प्रक्षेपणासाठीही कित्येकदा १६ मिमी. फिल्मचा उपयोग केला जातो. फिल्मची रुंदी, तिच्यावरील मार्गदर्शक छिद्रांचे आकारमान, छायाचित्रांचे आकारमान, ध्वनिमार्गाची रुंदी इ. गोष्टी आंतरराष्ट्रीय संकेतानुसार निश्चित केल्या आहेत.

गतीचा आभास : दृक्‌पटलावर एखाद्या वस्तूची प्रतिमा पडल्यावर ती वस्तू दृष्टिआड केल्यानंतरही पुढे सुमारे /१० सेकंदपर्यंत आपणास ती त्याच ठिकाणी दिसत राहते. डोळ्याच्या या गुणधर्माला दृष्टिसातत्य असे म्हणतात. याचा उपयोग प्रक्षेपित चित्रांमध्ये गतीचा आभास निर्माण करण्यासाठी केला जातो.

चित्रपटातील विशिष्ट प्रसंगाचे चित्रण करताना त्या प्रसंगाची प्रती सेकंदाला २४ या त्वरेने लागोपाठ छायाचित्रे घेतात. यांपैकी प्रत्येक छायाचित्राला चित्रचौकट असे म्हणतात. योग्य संस्करणानंतर ही चित्रे याच त्वरेने पडद्यावर प्रक्षेपित केल्यास पहाणाऱ्याला प्रक्षेपित चित्रांच्या बदलांची जाणीव होत नाही व मूळ प्रसंगातील हालचालीच दिसतात असे भासते. साध्या अंतरादर्शाला अशा तऱ्हेने लागोपाठ चित्रचौकटीत प्रक्षेपित करण्याच्या यंत्रणेची जोड दिली की, त्याचे चलच्चित्र प्रक्षेपकात रूपांतर होईल.

चित्रबदलाची तत्त्वे :चित्रे एकसारखी बदलत जात असल्यामुळे पडद्यावरील चित्रात एक प्रकारची लुकलुक दिसते व ती डोळ्यांना त्रासदायक वाटते. चित्र बदलाची त्वरा वाढवली की, ही लुकलुक कमी होते पण मग तेवढ्याच वेळात जास्त लांबीची फिल्म खर्ची पडते. या दोन्ही गोष्टींचा समन्वय करून प्रती सेकंदास २४ चित्रचौकटीची त्वरा ही इष्टतम म्हणून निवडण्यात आली आहे. 


 प्रत्येक चित्रचौकट प्रक्षेपिक होत असताना ती प्रक्षेपकातील चित्रद्वारासमोर अगदी (सपाट व) स्थिर राहिली पाहिजे. त्याचप्रमाणे एक चित्रचौकट जाऊन दुसरी येत असताना पडद्यावर तात्पुरता काहीही प्रकाश प्रक्षेपित होता कामा नये म्हणजे चित्रबदल होताना चित्रद्वारासमोरून फिल्म झटक्याने ओढली गेली पाहिजे व बदल पूर्ण झाला की, चित्रद्वारासमोरील चित्रचौकट एकदम स्थिर झाले पाहिजे व मग तिचे प्रक्षेपण सुरू झाले पाहिजे. असे खंडित प्रक्षेपण मिळण्यासाठी प्रक्षेपक दीप व चित्रद्वार यांच्या दरम्यान एक फिरती झडप ठेवलेली असते (आ. ५). या झडपेचा आकार दोन पात्यांच्या विद्युत्‌ पंख्यासारखा असून ती फिरताना जेव्हा एखादे पाते प्रकाशाच्या मार्गात येते तेव्हा प्रकाश खंडित होतो. या झडपेचा वेग असा ठेवतात की, विशिष्ट चित्रचौकटीचे प्रक्षेपण होत असताही मध्यंतरी एकदा प्रकाश खंडित होतो. त्यामुळे एकच चित्र लागोपाठ दोनदा प्रक्षेपित होते व पडद्यावर प्रती सेकंदाला ४८ वेळा चित्रे प्रक्षेपित झाल्यासारखा परिणाम होऊन लुकलुक खूपच कमी होते.

चलच्चित्र प्रक्षेपक :आ. ५ मध्ये ३५ मिमी. चित्रपटाच्या प्रक्षेपकाची रचना दाखविली आहे. या प्रक्षेपकाचे ५ मुख्य भाग पडतात : (अ) दीपपेटिका, (आ) फिरती झडप, (इ) प्रक्षेपक भिंग-प्रणाली, (ई) प्रकाशीय ध्वनी पेटी, (उ) अवरुद्ध गतीने फिल्म सरकविणारी यंत्रणा. याशिवाय मूर्तस्वरित (स्टिरिओफोनिक) ध्वनियुक्त चित्रपटासाठी एक चुंबकीय ध्वनी पेटीही असते.

(अ) दीपपेटिका : हीमध्ये प्रखर प्रकाशाचा उद्‌गम व परावर्तक यांचा समावेश होतो. परावर्तक विवृत्तपृष्ठीय असून त्याच्या एका केंद्रावर प्रकाश उद्‌गम ठेवलेला असतो. परावर्तकाचा दुसरा केंद्रबिंदू चित्रद्वारावर पडेल अशी योजना करतात. त्यामुळे सुप्रकाशित चित्र पडद्यावर मिळू शकते. सामान्यतः परावर्तक हा मागील पृष्ठावर चांदीचा मुलामा दिलेल्या काचेचा असतो परंतु अत्याधुनिक उपकरणात व्यतिकरणाच्या तत्त्वावर [⟶ प्रकाशकी] चालणारा पटलथरांचा परावर्तक वापरतात. याच्या पृष्ठभागावरून दृश्य प्रकाशाचे जोरदार परावर्तन होते परंतु अवरक्त (दृश्य वर्णपटातील तांबड्या रंगाच्या पलीकडील अदृश्य) किरणांचे पारगमन होते. त्यामुळे फिल्म फार गरम होत नाही.

आ. ५. ३५ मिमी. चित्रपटासाठी प्रक्षेपक : (१) प्रक्षेपित करावयाच्या फिल्मची (उलगडणारी) चक्री, (२) वरचे दातेरी चक्र, (३) चित्रद्वार, (४) प्रक्षेपक भिंग-प्रणाली, (५) फिरती झडप, (६) फिरत्या झडपेचे समोरून दिसणारे दृश्य, (७) धोका-निवारक झडप, (८) फिल्मला अवरुद्ध गती देणारे (चित्र बदल करणारे) दातेरी चक्र, (९) खालचे दातेरी चक्र, (१०) प्रकाशीय ध्वनी पेटी, (११) फिल्म गुंडाळणारी चक्री, (१२) विवृत्तपृष्ठीय परावर्तक, (१३) कार्बनी प्रज्योतीची ऋण कांडी, (१४) प्रज्योतीची धन कांडी, (१५) फिल्मची सैल वेटोळी. (उपकरणामधून जाणारा फिल्मचा मार्ग तुटक रेषेने दाखविला आहे).

प्रकाश उद्‌गम बहुधा कार्बनी प्रज्योत असून ती सु. ६० व्होल्ट एकदिश विद्युत्‌ दाबावर चालते व सु. ४० ते १८० अँपि. विद्युत्‌ प्रवाह घेते. विद्युत्‌ प्रवाह जितका जास्त तितका अधिक प्रखर प्रकाश मिळतो. प्रज्योत चालू असेतो कार्बनी कांड्यांची झीज होत जाते. त्यांच्या टोकांमधील अंतर स्थिर ठेवण्यासाठी स्वयंचलित इलेक्ट्रॉनीय यंत्रणा वापरावी लागते. हे टाळण्यासाठी प्रज्योतीऐवजी १ ते ३ किवॉ. शक्तीचा झेनॉन विसर्जन दीप वापरण्यात येऊ लागला आहे. याच्याही पुढची सुधारणा म्हणजे फिलिप्स कंपनीने तयार केलेला पाऱ्याचा केशनलिका दीप होय. याच्यामधून उच्च विद्युत्‌ प्रवाहाचे स्पंद प्रती सेकंदाला ७२ या त्वरेने सोडले जातात. प्रत्येक स्पंद २ ते ३ मिलिसेकंद टिकतो व फक्त या स्पंदकालातच दीप अतिप्रखर प्रकाशाचे लोळ उत्सर्जित करतो. यामुळे विद्युत्‌ शक्तीची बचत होते, प्रक्षेपक गरम होण्याचे प्रमाण खूपच कमी होते आणि दिव्याचा प्रकाशच खंडित असल्याने फिरत्या झडपेची जरूरी राहत नाही. त्याचबरोबर लुकलुकही कमी होते.

(आ) फिरती झडप : योग्य वेळी ठराविक कालापर्यंत प्रकाशाचा झोत फिल्मवर सोडणे किंवा तो खंडित करणे हे फिरत्या झडपेचे कार्य असते. त्याचे वर्णन वर आलेच आहे. काही कारणाने फिल्म सरकण्याचा वेग कमी झाल्यास तिच्यावर केंद्रित होणाऱ्या प्रकाशामुळे ती पेटू नये यासाठी प्रकाश आपोआप खंडित करण्यासाठी धोका-निवारक झडपेची योजना केलेली असते.

(इ) प्रक्षेपक भिंग-प्रणाली : चित्रपटगृहातील पडदा व प्रक्षेपक यांच्यामधील अंतर व प्रक्षेपित चित्राचे अपेक्षित आकारमान याला अनुसरून भिंग-प्रणालीचे परिणामी केंद्रांतर (f) निवडले जाते. तिचा केंद्रांक (भिंगातून जाणाऱ्या प्रकाशाचे प्रमाण दर्शविणारा अंक) सामान्यतः f/2 असतो. प्रक्षेपक चालू असताना प्रखर प्रकाशझोतामुळे भिंगे खूप गरम होतात. त्यामुळे होणाऱ्या त्यांच्या प्रसरणाला वाव राहील अशा तऱ्हेने भिंगांची मांडणी करावी लागते. त्याचप्रमाणे या उष्णतेचा अनिष्ट परिणाम होणार नाही अशा द्रव्यापासून ही भिंगे बनविली जातात.

(ई) प्रकाशीय व चुंबकीय ध्वनी पेटी : यांच्या रचनेसाठी ‘ध्वनिमुद्रण व पुनरुत्पादन’ ही नोंद पहावी.

आ. ६. अनरुद्ध गतीने फिल्म सरकविणारी एक यंत्रणा : (१) स्थिर वेगाने फिरणारा दांडा, (२) दांड्यावर बसविलेला कॅम, (३) विकेंद्री खीळ, (४) फटीयुक्त चौफुली, (५) फिल्म खेचणारी दातेरी चक्रे.

(उ) अवरुद्ध गतीने फिल्म सरकविणारी यंत्रणा : आ. ६ मध्ये चित्रद्वारासमोरून अवरुद्ध गतीने फिल्म सरकविणारी एक यंत्रणा दाखविले आहे.

स्थिर वेगाने फिरणाऱ्या दांड्यावर आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक कॅम [⟶ कॅम] व विकेंद्रस्थानी एक खीळ (पीन) बसविलेली असतात. त्याच्या शेजारी दुसऱ्या दांड्यावर मध्ये फटी असणारी एक चौफुली (माल्टीज क्रॉस) व अवरुद्ध गतिदायक दातेरी चक्रे असतात. प्रत्येक चक्रावर एकूण १६ दाते असून ते फिल्मवरील मार्गदर्शक छिद्रांत बरोबर अडकू शकतात. एका चित्रचौकटीला ४ छिद्रे असतात. त्यामुळे या चक्रांचा एक चतुर्थांश फेरा झाला की, बरोबर एक चित्रचौकट पुढे खेचली जाते.

खीळ फिरताना चौफुलीच्या एखाद्या भुजेमधील फटीत अडकली की, दोन्ही एकमेकींशी संलग्न होतात आणि चौफुली व तिचा दांडाही फिरू लागतो. चौफुलीचा / फेरा झाला की, खीळ फटीतून निसटते व कॅममुळे चौफुलीचे भ्रमण थांबविले जाते. खीळ राहिलेला / फेरा पुरा करीपर्यंत अशा तऱ्हेने चौफुली (व म्हणून चित्रद्वारासमोरील चित्रचौकट) स्थिर राहतात. मग पुन्हा चौफुलीच्या पुढल्या भुजात खीळ अडकून फिल्म १ चित्रचौकट पुढे ओढली जाते. याप्रमाणे / फेऱ्यात चित्रचौकट पुढे ओढणे व पुढील / फेरा होईतो ती स्थिर ठेवणे, या क्रिया लागोपाठ होत जातात. 


 सिनेमास्कोप पद्धतीची फिल्म ३५ मिमी. रुंदीचीच असते परंतु प्रक्षेपित चित्र सु. दुप्पट रुंद असते. या पद्धतीच्या प्रक्षेपणासाठी प्रतिमेचे फक्त रुंदीच्या दिशेने जास्त वर्धन करणारे ॲनामॉर्फिक भिंग मुख्य प्रक्षेपक भिंगाच्या पुढे लावता येते. हे भिंग म्हणजे एक चित्याकार भिंग असून त्याचा अक्ष उभा ठेवतात. म्हणजे फक्त आडव्या दिशेनेच ते प्रतिमेचे वर्धन करू शकते. [⟶ चलच्चित्रपट तंत्र].

सामान्यतः चित्रपटांच्या बाबतीत ६०० मी. लांबीची ३५ मिमी. फिल्म एका चक्रीवर गुंडाळलेली असते. प्रक्षेपण करताना अशा तीन फिल्म एकाच मोठ्या चक्रीवर गुंडाळून घेतात. विशिष्ट चित्रचौकटीशी संबंधित असलेला आवाज प्रकाशीय ध्वनिमार्गात त्या चौकटी पुढे २० चौकटी वर असतो व चुंबकीय ध्वनिमार्गात तो २८ चौकटी मागे असतो. याला अनुसरून आकृतीत तुटक रेषेने दाखविलेल्या मार्गाने प्रथम फिल्म प्रक्षेपकातून ओवून घेतात आणि मग प्रक्षेपण सुरू करतात. आधुनिक प्रक्षेपकाचे बहुतेक सर्व कार्य स्वयंचलित यंत्रणेने नियंत्रित केलेले असते.

 प्रकाशझोतक्षेपक : यामध्ये प्रकाश उद्‌गमापासून येणारे किरण एकत्रित करून त्यांचे एका विशिष्ट क्षेत्राकडे प्रक्षेपण करणे हे मुख्य कार्य असते. ह्याच्या योगाने खूप दूर अंतरावरील वस्तूचे तीव्र प्रकाशन करता येते. उदा., नाटकात एखाद्या विशिष्ट नटावर प्रकाशझोत टाकून त्या पात्राला उठाव देतात. यासाठी प्रकाश उद्‌गमाला खास आकाराच्या परावर्तकाची जोड द्यावी लागते.

आ. ७. अन्वस्तपृष्ठीय परावर्तक : (१) परावर्तक, (२) परावर्तकाचे केंद्रातर, (३) परावर्तनाचा व्यास, (४) दिवा, (५) दिव्याचा व्यास.

अन्वस्तपृष्ठीय परावर्तक : आ. ७ मध्ये अशा प्रकारचा परावर्तक दाखविला आहे. ह्या परावर्तकाच्या केंद्रबिंदूवर दिवा ठेवला असता परावर्तित किरण समांतर जातात. तथापि दिवा हा बिंदुरूप नसल्यामुळे किरणांचे समांतर मार्गापासून थोडे विचलन होते. हे विचलन किती प्रमाणात होईल हे दिव्याच्या आकारमानावर, परावर्तकाच्या केंद्रांतरावर आणि त्याच्या व्यासावर अवलंबून असते. एखाद्या कमी तीव्रतेच्या दिव्यापासून मोठ्या परावर्तकाच्या साहाय्याने लहान शलाका मिळविल्यास ती बरीच तीव्र असते. हा परावर्तक चकचकीत धातूचा किंवा पारा लावलेल्या काचेचा असतो. दिवा परावर्तकाच्या केंद्रापासून दूर नेल्यास परावर्तित किरण पसरतात.

प्रकाश उद्‌गम बिंदुमात्र नसल्यामुळे अन्वस्तपृष्ठीय परावर्तक वापरून मिळणाऱ्या प्रकाशझोतातील प्रकाश-तीव्रतेचे वितरण अपेक्षेनुसार मिळत नाही. यासाठी दिव्यामागे अन्वस्तपृष्ठीय परावर्तक व पुढे एक प्रणमनी भिंग (प्रकाशझोत अधिक क्षेत्रावर विस्तारणारे-पसरविणारे-भिंग) अशी संयुक्त रचना वापरतात. या भिंगाचा आकार प्रक्षेपित प्रकाशझोत ज्या स्वरूपाचा हवा असेल त्यानुसार केलेला असतो. मोटारीचे पुढचे दिवे

आ. ८. परावर्तक व प्रणमनी भिंग यांचा संयुक्त उपयोग : (१) परावर्तक, (२) केंद्रबिंदूवर ठेवलेला दिवा, (३) बहिर्गोल पृष्ठे, (४) अंतर्गोल पृष्ठे.

हे या रचनेचे उदाहरण आहे. आ. ८ मध्ये दाखविलेल्या भिंगांतील वरच्या अर्धात बहिर्गोल पृष्ठे व खालच्या अर्धात अंतर्गोल पृष्ठे अंतर्भूत केली असून त्यामुळे होणारे किरणांचे प्रणमनही (दिशेत होणारा बदलही) दाखविले आहे.

मोटारीच्या पुढच्या दिव्यात ४० ते ६० वॉट शक्तीचे तप्त तंतू विद्युत् दीप वापरतात आणि वरीलप्रमाणे भिंग व परावर्तक यांच्यामुळे पुढच्या दिशेने याची दीप्ति-तीव्रता १,००,००० कँडेलापर्यंत मिळविली जाते. समोरून येणाऱ्या वाहनाच्या चालकाचे डोळे दिपू नयेत म्हणून त्या वेळी परावर्तक फिरवून किंवा दुसरा दिवा चालू करून हा झोत खाली झुकविण्याची व्यवस्था असते.

इमारतींचे बाह्य भाग, मोटारगाड्या ठेवण्याचे तळ, विविध खेळांची मैदाने इत्यादींच्या प्रकाशनासाठी तप्त तंतू दीप किंवा पाऱ्याच्या बाष्पाचे दीप अन्वस्तपृष्ठीय परावर्तकासह वापरतात.


आ. ९. विवृत्तपृष्ठीय परावर्तक : (१) परावर्तक पृष्ठ, (२) पृष्ठानजीकच्या केंद्रबिंदूवर ठेवलेला दिवा, (३) दूरच्या केंद्रबिंदूवर एकत्रित आलेले किरण.

विवृत्तपृष्ठीय परावर्तक : या परावर्तकाला दोन केंद्रबिंदू असतात. पृष्ठाच्या नजीकच्या केंद्रबिंदूवर दिवा ठेवल्यास परावर्तित किरण दूरच्या केंद्रबिंदूपाशी एकत्रित येतात (आ. ९). येथेही दिवा हा बिंदुमात्र प्रकाश उद्‌गम नसल्याने परावर्तित किरण दुसऱ्या केंद्रबिंदूच्या भोवताली छोट्याशा क्षेत्रात एकत्रित येतात. या परावर्तकापुढे बहिर्वक्र भिंग ठेवून अपेक्षित वितरणाचा प्रकाशझोत मिळविता येतो. अशा वेळी बहिर्वक्र भिंगाचा केंद्रबिंदू परावर्तकाच्या दुसऱ्या केंद्रबिंदूवर अनुपाती होईल अशी रचना करतात.

आ. १०. सपाट-बहिर्वक्र भिंगातून मिळणारे प्रकाशकिरणमार्ग : (१) दिवा, (२) सपाट-बहिर्वक्र भिंग.

सपाट-बहिर्वक्र भिंग : (एक बाजू सपाट व दुसरी बहिर्वक्र असणारे भिंग). प्रकाशझोत केंद्रित करण्यासाठी अशा भिंगाचा चांगला उपयोग होतो (आ. १०). या भिंगाचा व्यास लहान असेल, तर वक्र भाग गोलीय असतो. मोठ्या व्यासाच्या भिंगाचे वक्र पृष्ठ जवळजवळ विवृत्तीय असते.

आगगाडीचे सिग्नल किंवा गाडी थांबविण्या-सुटण्यासाठी दाखविले जाणारे तांबडे-हिरवे दिवे यांच्यासाठी या प्रकारचा प्रक्षेपक वापरण्यात येतो. येथे कोणतीही वस्तू प्रकाशित करण्याचा उद्देश नसतो, तर खुद्द दिवाच स्पष्टपणे दिसावा हा हेतू असतो.

आ. ११. पायऱ्यांची भिंगे : (अ) बाहेरून पायऱ्या असलेले भिंग (आ) आतून पायऱ्या असलेले भिंग : (१) दिवा, (२) भिंग, (३) भिंगावरील पायऱ्या.

पायऱ्यांची भिंगे : या भिंगांच्या साहाय्याने प्रक्षेपित प्रकाशझोताला इच्छित आकार देता येतो. संपूर्ण भिंगापेक्षा ती वजनाला हलकी व निर्मितीला सुकर असतात. आ. ११ वरून या भिंगांच्या कार्याची कल्पना येईल. खास करून दीपगृहातील दिव्यासाठी प्रथम या भिंगांची योजना केली गेली [⟶ दीपगृह]. प्लॅस्टिकपासून ओतकाम करूनही अशी भिंगे तयार करता येतात.

 लोलकांचा उपयोग : इष्ट दिशेने प्रकाशकिरण वळवून त्यांचे केंद्रीकरण करण्यासाठी लोलकाचाही उपयोग केला जातो. लोलकातून होणारे संपूर्ण अंतर्गत परावर्तन [⟶ प्रकाशकी] व लोलकामुळे होणारे प्रणमन या दोहोंचाही उपयोग करून घेणाऱ्या प्रणालीला परामनी (परावर्तन + प्रणमनी कॅटॉडायॉप्ट्रिक) प्रणाली असे म्हणतात. दीपगृहात यांचा विशेष वापर होतो [⟶ दीपगृह]. आ. १२ वरून या रचनेचे कार्य समजू शकेल. या आकृतीत काही प्रातिनिधिक किरणांचे मार्ग दिग्दर्शित केले आहेत.

वर्तुळदीप : (स्पॉटलाइट). मर्यादित क्षेत्राचे एकविध प्रकाशन करण्यासाठी वर्तुळदीपाचा उपयोग करतात उदा., शस्त्रक्रिया करताना शस्त्रक्रियेच्या टेबलावर किंवा नाटकामध्ये विशिष्ट पात्राला उठाव देण्यासाठी, पुतळे प्रकाशित करण्यासाठी इत्यादी. प्रकाशित करण्याच्या क्षेत्राचा आकार वर्तुळाकार, चौकोनी वा इतर कोणताही असू शकतो.

याची रचना सामान्यत: अंतरादर्शासारखीच असते. मात्र पारदर्शिकेच्या जागी येथे इष्ट आकाराची एक खिडकी बसवितात व प्रक्षेपक भिंगाच्या साहाय्याने या खिडकीची प्रतिमा इच्छित जागी प्रक्षेपित करतात.

रंगभूमीवर प्रकाशन करण्यासाठी आता खास वर्तुळदीप तयार करण्यात आले आहेत. यामधील दिवा बहुधा १,००० ते ५,००० वॉट शक्तीची झेनॉन प्रज्योत किंवा उच्च दाबाचा पाऱ्याचा विसर्जन दीप असतो. त्याच्या मागे अन्वस्तपृष्ठीय किंवा विवृत्तपृष्ठीय परावर्तक व पुढे साधे किंवा पायऱ्यांचे बहिर्गोल भिंग (फ्रेनेल भिंग) बसविलेले असते. आ. १३ मध्ये असे दोन वर्तुळदीप दाखविले आहेत. अशा दीपांच्या साहाय्याने सु. ३० मी. अंतरावर १ मी. व्यासाचा अतिप्रखर प्रकाशझोत पाडता येतो. ‘डिमर’च्या साहाय्याने या दिव्याचे तेज आवश्यक त्या प्रमाणात कमी करता येते किंवा मध्ये रंगीत काचा घालून रंगीत झोत पाडता येतात.


आ. १२ दीपगृहात वापरली जाणारी परामनी लोलक प्रणाली : (१) दिवा, (२) दिव्याच्या मागील संपूर्ण अंतर्गत परावर्तक लोलक, (३) दिव्याच्या पुढील संपूर्ण अंतर्गत परावर्तक लोलक, (४) प्रणमनी लोलक, (५) बहिर्वक्र भिंग.

आ. १३. वर्तुळदीपाचे दोन प्रकार : (अ) पहिला प्रकार : (१) अन्वस्तपृष्ठीय परावर्तके, (२) फ्रेनेल भिंग (आ) दुसरा प्रकार : (१) विवृत्तपृष्ठीय परावर्तक, (२) साधे बहिर्गोल भिंग.

शोध दीप : यांची सर्वसामान्य रचना वर्तुळदीपासारखीच असते परंतु यांचे प्रकाशझोत खूपच जास्त दूरवर प्रक्षेपित करावयाचे असतात. प्रकाशित करावयाचे क्षेत्रही अधिक मोठे असावे लागते. त्यामुळे यातील दिवे जास्त प्रखर असावे लागतात. शत्रूच्या विमानांचा माग घेणे, ढगांच्या गतीचा अभ्यास करणे अशा कामासाठी यांचा उपयोग करावा लागतो. युद्धात वापरताना तोफांच्या दणक्याने वा अन्य कारणाने अशा दीपांची सहजासहजी नुकसानी होऊ नये इतके ते दणकट असावे लागतात.

पहा : प्रदीपन अभियांत्रिकी विद्युत् दिवे.

संदर्भ :  1. Brown, E. Modern Optics, New York, 1965.

            2. Cricks, R. H. The Complete Projectionist, London, 1949.

            3. Hewitt, H. Vause, A. S. Lamps and Lighting, London, 1966.

पुरोहित, वा. ल. घन, प. द.