ब्लॅक, जोसेफ : [१६ एप्रिल १७२८-६ डिसेंबर (१० नोव्हेंबर ?) १७९९]. स्कॉटिश रसायनशास्त्रज्ञ व भौतिकीविज्ञ. स्थिर हवेच्या (कार्बन डाय-ऑक्साइडाच्या) पुनर्शोधाकरिता आणि सुप्त उष्णता व विशिष्ट उष्णता [⟶ उष्णता] या संकल्पनांच्या शोधाकरिता ते प्रसिद्ध आहेत.

ब्लॅक यांचा जन्म फ्रान्समधील बॉर्दो येथे झाला. ग्लासगो विद्यापीठात त्यांनी विल्यम कलेन यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनशास्त्राचा अभ्यास केला व त्यांचे साहाय्यक म्हणून तीन वर्षे काम केले. १७५२ मध्ये त्यांनी एडिंबरो विद्यापीठात प्रवेश केला व १७५४ साली वैद्यकाची एम्. डी. पदवी संपादन केली. १७५६ मध्ये कलेन एडिंबरोला गेल्यावर त्यांच्या जागी ग्लासगो येथे ब्लॅक यांची शारीर व रसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. पुढे १७६६ मध्ये एडिंबरो विद्यापीठात त्यांची रसायनशास्त्राच्या प्राध्यापकपदावर नेमणूक झाल्यावर त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सोडून देऊन पूर्णपणे अध्यापन कार्यास वाहून घेतले.

पदवीकरिता १७५४ मध्ये सादर केलेला त्यांचा मूळ लॅटिन प्रबंध पुढे १७५६ मध्ये विस्तारित रूपात इंग्रजीत ‘एक्सपिरिमेंट्स अपाउन मॅग्नेशिया अल्बा, क्विकलाइम अँड सम अदर अल्कलाइन सबस्टन्सेस’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाला. या प्रबंधातील ब्लॅक यांच्या कार्यामुळे नंतर ए. एल्. लव्हॉयझर व इतर शास्त्रज्ञांच्या कार्याद्वारे आधुनिक राश्यात्मक रसायनशास्त्राच्या (रासायनिक पदार्थांतील घटक द्रव्यांचे राश्यात्मक निर्धारण करणाऱ्या रसायनशास्त्राच्या शाखेच्या) झालेल्या विकासाचा पाया घातला गेला. या प्रबंधात त्यांनी मॅग्नेशिया अल्बा (मॅग्नेशियम कार्बोनेट) तापवून काळजीपूर्वक केलेल्या राश्यात्मक प्रयोगांचे वर्णन केलेले असून तापविल्यामुळे या पदार्थाच्या वजनात आलेली घट सामान्य हवेपेक्षा एक निराळी हवा या पदार्थापासून मुक्त झाल्यामुळे येते, असे तराजूचा उपयोग करून दाखवून दिले. या हवेला त्यांनी ‘स्थिर हवा’ असे नाव दिले. या वायूचे (म्हणजेच कार्बन डाय -ऑक्साइडाचे) वर्णन पूर्वी जे. बी. व्हान हेल्माँट (१५७७ – १६४४) यांनी Gas sylvestre या नावाने केलेले होते. या वायूला पुढे १७८७ मध्ये लव्हॉयझर यांनी ‘कार्बानिक अम्ल वायू’ असे नाव दिले. ब्लॅक यांनी असेही दाखविले की, सौम्य क्षारांतून (अम्लाशी विक्रिया झाल्यास लवण देणाऱ्या पदार्थांतून) स्थिर हवा निघून गेली की, ते दाहक (अधिक क्षारीय) बनतात आणि या वायूचे परत शोषण केले म्हणजे दाहक क्षार पुन्हा सौम्य होतात. ब्लॅक यांनी कार्बन डाय-ऑक्साइडाचा तपशीलवार जरी अभ्यास केला नाही, तरी हा वायू अम्लाप्रमाणे क्रिया करतो, तसेच किण्वनाच्या (पदार्थ आंबवण्याच्या) क्रियेत, श्वसनक्रियेत आणि लोणारी कोळशाच्या ज्वलनात तो निर्माण होतो असे दाखवून हा वायू हवेचा एक नियमित घटक आहे, असे अनुमानही त्यांनी काढले होते.

ग्लासगो येथे त्यांनी आपले लक्ष उष्णतेच्या अभ्यासाकडे वळविले आणि या अभ्यासातही त्यांनी आपल्या रसायनशास्त्रातील कार्याप्रमाणेच राश्यात्मक दृष्टिकोन ठेवला. त्यांना असे दिसून आले की, बर्फ वितळत असताना त्याचे तापमान न बदलता तो उष्णता घेत राहतो. ही उष्णता बर्फाच्या कणांशी संयोग पावते व त्यामुळे ती सुप्त रहाते असे त्यांनी प्रतिपादन मांडले. त्याचप्रमाणे दिलेल्या राशीच्या पाण्याचे तापमान त्याच्या उकळबिंदूइतके वाढविण्यापर्यंत एखाद्या उष्णता उद्‌गमाला लागणारा काळ व त्याच उद्‌गमाला पाण्याचे बाष्पीकरण करण्यास लागणारा काळ यांची तुलना करीत असताना त्यांना असे आढळून आले की, बाष्पीकरणात उष्णता शोषली जाऊन ती ‘सुप्त’ होते कारण ती तापमानात वाढ झाल्याचे दर्शवीत नाही. त्यांनी आपले गृहीतक १७६१ मध्ये राश्यात्मक रीतीने पडताळून पाहिले. तथापि त्यांनी यासंबंधी तपशीलवार वर्णन कधीच प्रसिद्ध केले नाही. त्यांनी लावलेल्या सुप्त उष्णतेच्या संकल्पनेच्या शोधाचा उपयोग करून जेम्स वॉट यांनी अलग संघनकाचा (वाफेचे द्रवीकरण करणाऱ्या उपकरणाचा) शोध लावला व टॉमस न्यूकोमेन यांच्या वाफेच्या एंजिनात क्रांतिकारक सुधारणा घडवून आणली [⟶ वाफ एंजिन]. ब्लॅक यांना असेही आढळून आले होते की, एकाच द्रव्यमानाच्या निरनिराळ्या पदार्थांचे तापमान एकाच तापमानापर्यंत वाढविण्यासाठी निरनिराळी उष्णता द्यावी लागते आणि अशा प्रकारे विशिष्ट उष्णतेच्या सिद्धांताचा त्यांनी पाया घातला. त्यांनी असेही दाखविले की, समान उष्णता दिली किंवा काढून घेतली, तर तापमापकातील द्रवाच्या आकारमानात समान बदल होतात.

ब्लॅक एडिंबरो येथे मृत्यू पावले. त्यानंतर १८०३ मध्ये त्यांचे सहकारी जॉन रॉबिसन यांनी त्यांची व्याख्याने संपादित करून लेक्चर्स ऑन द एलेमेंट्स ऑफ केमिस्ट्री या शीर्षकाखाली प्रसिद्ध केली.

भदे, व. ग.