व्होल्टा, आलेस्सांद्रो जूझेप्पे :( १८ फेब्रुवारी १७४५ –५ मार्च १८२७). इटालियन भौतिकीविज्ञ. त्यांचे पूर्ण नाव आलेस्सांद्रो जूझेप्पे आंतॉन्यो आनास्ताझ्यो व्होल्टा (व्हॉल्ता). त्यांनी व्होल्टा विद्युत चितीचा शोध लावल्यामुळे प्रथमच प्रवाही विद्युत अखंडितपणे पुरविणारा उदगम उपलब्ध झाला. त्यांचा जन्म इटलीतील कॉमो (लॉबर्डी) येथे. ते कॉमो येथील रॉयल स्कूलमध्ये भौतिकीचे (१७७४ –७९) व नंतर पाव्हिया विद्यापीठात निसर्गविज्ञानाचे (१७७९ – १८०४) प्राध्यापक होते.

व्होल्टा यांनी विद्युत् मापकांमध्ये केलेल्या सुधारणांसंबंधीचे वर्णन १७६९ व १७७१ मध्ये १७६९ प्रसिद्ध केले. १७७५ मध्ये त्यांनी इलेक्ट्रोफोरस या स्थिर विद्युत् भारनिर्मिती करणाऱ्या उपकरणाचा शोध लावला. या उपकरणामुळे टिकून राहणारा व सहज पुनर्भारित करता येईल असा स्थिर विद्युत उद्गम उपलब्ध झाला. अतिशय अल्प विद्युत् भार ओळखण्यासाठी याचा उपयोग होत असल्याचे व्होल्टा यांनी १७८२ मध्ये जाहीर केले. आगोदरच्या विद्युत् मापकांच्या संवेदनक्षमतेमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे विद्युत् दर्शकाचा शोध लागला.

व्होल्टा यांनी १७७८ साली मिथेन वायूचा शोध लावून तो अलग केला. तसेच वायूंच्या घनफळांमधील व बदलांचे मापन करण्यासाठी वायुमापक नलिकेचा शोध लावला. या नलिकेचा वापर करून त्यांनी मार्श वायूचा (मिथेनचा) अभ्यास केला व तो हायड्रोजनपेक्षा वेगळा असल्याचे दाखवले. मार्श वायूचे विश्लेषण करणारा एक निबंधही त्यांनी प्रसिद्ध केला.

लुईजी गॅल्व्हानी यांच्या प्राणिजन्य विद्युत या विषयावरील लेखाने व्होल्टा यांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी लागोपाठ अनेक प्रयोग केले. त्यांतून धातूच खरोखरच उद्दीपक आहेत, तर तंत्रिका स्वतः अक्रिय आहेत हे त्यांच्या लक्षात आले. प्राण्याच्या ऊतकांची गरज नसणाऱ्या नवीन वीज प्रकाराला त्यांनी धातुजन्य विद्युत् असे नाव दिले. परिणामतः प्राणिजन्य विद्युत् व धातुजन्य विद्युत यांच्या समर्थकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला. दोन वेगवेगळ्या धातूंच्या स्पर्शातून थोडासाच विद्युत् परिणाम निर्माण होतो, एवढेच नसून विशिष्ट प्रकारच्या द्रायूंना (द्रवांना किंवा वायूंना) स्पर्श करणारे धातूसुद्धा अशा प्रकारचा परिणाम निर्माण करतात, असे व्होल्टा यांनी दाखविले. तसेच आर्द्रता आणि लोखंड व तांबे यांसारख्या भिन्न धातूंमधील रासायनिक विक्रियांतून वीज निर्माण होऊन ती वाहते, असे त्यांनी सुचविले. पहिल्या विद्युत् घटाचा शोध २० मार्च १८०० रोजी त्यांनी जाहीर केला.

व्होल्टा यांचे संशोधन लंडनच्या रॉयल सोसायटीच्या फिलॉसॉफिकल ट्रॅंझॅक्शन्स या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले(१८००). नियत विद्युत् प्रवाह सुरू करणे शक्य झाल्यामुळे संशोधनाची अनेक नवीन क्षेत्रे खुली झाली. (उदा., विद्युत् रसायनशास्त्र).

नेपोलियन यांच्या निमंत्रणावरून १८०१ मध्ये व्होल्टा यांनी पॅरिसच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फ्रान्समध्ये आपल्या शोधांसंबंधी एक व्याख्यानमाला गुंफली. १७९१ मध्ये त्यांची लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड झाली. पॅड्युआ विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विद्याशाखेचे संचालक म्हणून त्यांनी १८१९ पर्यँत काम केले. व्होल्टा यांचे प्रकाशित लेखन सात खंडांमध्ये संकलिक करण्यात आले (१९१८ – २९). त्यांच्या सन्मानार्थ विद्युत् चालक प्रेरणेच्या एककाला व्होल्टा हे नाव देण्यात आले (१८८१).

व्होल्टा कॉमो येथे मृत्यू पावले.

सूर्यवंशी, वि. ल.