ईरेन झॉल्यो-क्यूरीझॉल्यो-क्यूरी, ईरेन : (१२ सप्टेंबर १८९७–१७ मार्च १९५६). फ्रेंच भौतिकीविज्ञ. प्येअर व मारी क्यूरी यांची मुलगी व १९३५ च्या रसायनशास्राच्या नोबेल पारितोषिकाच्या सहविजेत्या. त्यांचा जन्म पॅरिस येथे झाला. सॉरबोन विद्यापीठात व पॅरिस विद्यापीठाच्या रेडियम इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतल्यानंतर आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. १९२६ मध्ये फ्रेदेरीक झॉल्यो यांच्याबरोबर त्या विवाहबद्ध झाल्या. १९३२ मध्ये आईनंतर रेडियम इन्स्टिट्यूटच्या प्रमुखपदावर त्यांची नेमणूक झाली.

आपल्या पतीबरोबर कृत्रिम किरणोत्सर्गी (कण वा किरण बाहेर टाकणारी) मूलद्रव्ये तयार करण्यात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले व या कार्याकरिता त्या दोघांस १९३५ चे रसायनशास्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. १९३६ मध्ये शास्त्रीय संशोधनाच्या सरकारी खात्यात उपसचिवपदावर त्यांची नेमणूक झाली. फ्रेंच अणुऊर्जा समितीच्या संघटनेकरिता त्यांनी १९४६ पासून आपल्या पतीसमवेत कार्य केले, तथापि त्यांच्या कम्युनिस्ट विचारसरणीमुळे १९५१ मध्ये त्यांना या कामावरून दूर करण्यात आले.

इ. स. १९४७ मध्ये सॉरबोन विद्यापीठात प्राध्यापक व तेथील रेडियम प्रयोगशाळेच्या संचालिका म्हणून त्यांची नेमणूक झाली. बरीच वर्षे किरणोत्सर्गी पदार्थ हाताळल्यामुळे त्यांना रक्तार्बुद (रक्ताचा कर्करोग) हा रोग होऊन त्यातच पॅरिस येथे त्यांचा अंत झाला.

भदे, व. ग.