समतोल : जोपर्यंत एखादया प्रणालीभोवती परिसरात बदल होत नाही, तोपर्यंत त्या प्रणालीच्या अवस्थेत बदल होत नाही. या परिस्थितीला समतोल म्हणतात. म्हणजे एखादया प्रणालीत असणाऱ्या सर्व प्रेरणा, प्रक्रिया व प्रवणता ( प्रवृत्ती ) या समान व विरोधी प्रेरणा, प्रक्रिया व प्रवणता यांनी बरोबर तोलल्या गेल्या असताना जी परिस्थिती निर्माण होते, तिला समतोल म्हणतात. समतोलित प्रणालीमध्ये आहे त्या स्थितीत आपणहून बदल घडत नसतो. असा बदल बाह्य कारणांनीच घडवून आणावा लागतो.

एकाच वेळी पदार्थावर अनेक प्रेरणा कार्य करीत असल्या, तरी त्यांच्यामुळे निर्माण होणारी निष्पन्न प्रेरणा व परिबल जर शून्य होत असेल, तर त्यामुळे पदार्थाला कोणत्याच प्रकारची गती मिळू शकत नाही. पदार्थाच्या अशा अवस्थेला समतोल अवस्था म्हणतात.

एखादया द्रव्य कणावर असणाऱ्या प्रेरणांची सदिश बेरीज शून्य येत असल्यास तो द्रव्यकण समतोल साधतो असे म्हणतात. ही बेरीज शून्य नसताना द्रव्यकण निष्पन्न प्रेरणेच्या दिशेत प्रवेगित होतो. प्रेरणांचे क्ष, य आणि झ या अक्षांच्या दिशांमधील घटक Fx , Fy व Fz या चिन्हांनी दर्शविल्यास, द्रव्यकण समतोल राहण्यासाठी S Fx ०, S Fy = ० व S Fz = ० या अटी पूर्ण व्हाव्या लागतात. दृढ पदार्थ अशा कणांनी बनलेला आहे, असे मानल्यास असा पदार्थ समतोलात राहण्यासाठी वरील अटींशिवाय आणखीही अटींची पूर्तता व्हावी लागते. ती म्हणजे पदार्थावर अस्तित्वात येणाऱ्या परिबलांची बेरीज S M शून्य असावी लागते. हीच अट वरीलप्रमाणे S Mx = ० , S My = ० व S Mz = ० अशी मांडता येते. दृढ पदार्थावर बाह्य प्रेरणा अस्तित्वात आली असता पदार्थाच्या द्रव्यकणांवर उत्पन्न होणाऱ्या अंतर्गत समतोलावस्थेत समान व विरूद्ध दिशांत असणाऱ्या प्रेरणा जोडयांच्या रूपातच असावयास हव्यात.

प्रेरणा ही सदिश वर्चसाच्या अवतराच्या रूपात व्यक्त करता येत असल्यामुळे समतोलाची S F = ० ही अट म्हणजेच प्रणालीची स्थितिज ऊर्जा अल्पतम असणे भासमान आहे. म्हणून एखादया खोलगट भांडयात ठेवलेल्या गोटीचा समतोल स्थिर असतो, तर टोकावर उभे केलेले अंडे अस्थिर समतोलात असते. समतोल बिघडू न देता पदार्थ गतिमान राहू शकत असल्यास त्या समतोलास नित्य वा तटस्थ समतोल म्हणतात. उदा., तंतोतंत सपाट असलेल्या प्रतलावर ठेवलेली गोटी.

पहा : यामिकी. शिरोडकर, सु. स.