जॉन बारडिन

बारडीन, जॉन : (२३ मे १९०८- ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. बारडीन यांना ⇨वॉल्टर हौझर ब्रॅटन व ⇨विल्यम ब्रॅडफोर्ड शॉक् ली यांच्याबरोबर ⇨अर्धसंवाहकांसंबंधीचे संशोधन व ट्रँझिस्टर परिणामाचा शोध या कार्याकरिता १९५६ चे नोबेल पारितोषिक मिळाले. तसेच त्यांना ⇨लीअन एन्. कूपर व ⇨जॉन रॉबर्ट स्कीफर यांच्याबरोबर ⇨अतिसंवाहकतेच्या सिद्धांताचा विकास केल्याबद्दल १९७२ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. एकाच ज्ञानक्षेत्रात दोनदा नोबेल पारितोषिक मिळालेले ते पहिलेच शास्त्रज्ञ होत.

बारडीन यांचा जन्म मॅडिसन (विस्कॉन्सिन) येथे झाला. त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठाच्या विद्युत् अभियांत्रिकीतील बी. एस्. (१९२८) व एम्. एस्. (१९२९) या पदाव्या मिळविल्या. त्याच विद्यापीठात त्यांनी दोन वर्षे अनुप्रयुक्त भूभौतिकी व आकाशकांपासून (ॲटेनांपासून) उत्सर्जित होणारे प्रारण (तरंगरुपी ऊर्जा) यांसंबंधीच्या गणितीय प्रश्नांविषयी संशोधन केले. १९३०-३३ या काळात त्यांनी पिट्सबर्ग (पेनसिल्व्हेनिया) येथील गल्फ रिसर्च लॅबोरेटरीजमध्ये खनिज तेलाच्या शोधाच्या दृष्टीने चुंबकीय आणि गुरूत्वाकर्षणीय सर्वेक्षणांच्या अर्थबोधनाकरिता पद्धती विकसित करण्यासाठी भूभौतिकीविज्ञ म्हणून संशोधन केले. १९३३ मध्ये त्यांनी प्रिन्स्टन विद्यापीठात गणितीय भौतिकीमध्ये संशोधन करण्यास प्रारंभ केला. तथापि संशोधन प्रबंध पूर्ण करण्यापूर्वीच त्यांची हार्व्हर्ड विद्यापीठात फेलो म्हणून निवड झाली. तेथे त्यांनी जे. एच् व्हॅन व्ह् लेक व पी. डब्ल्यू. ब्रिजमन यांच्याबरोबर धांतूंतील ससंजन (आंतररेणवीय आकर्षण प्रेरणांमुळे धांतूंतील भाग संलग्न राहणे) व विद्युत् संवहन यासंबंधी संशोधन केले. १९३६ मध्ये त्यांना प्रिन्स्टन विद्यापीठाची पीएच्.डी पदवी मिळाली. १९३८-४१ मध्ये ते मिनेसोटा विद्यापीठात भौतिकीचे साहाय्यक प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात त्यांनी १९४१-४५ या काळात वॉशिंग्टन येथील नेव्हल ऑर्डनन्स लॅबोरेटरीमध्ये मुलकी भौतिकीविज्ञ म्हणून काम केले. युद्धानंतर १९४५ सालाच्या शेवटी ते बेल टेलिफोन लॅबोरेटरीजमधील ⇨घन अवस्था भौतिकीविषयी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटात दाखल झाले व तेथे त्यांनी १९५१ पर्यंत काम केले. त्या वर्षी इलिनॉय विद्यापीठात भौतिकी व विद्युत् अभियांत्रिकीचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक झाली आणि १९७५ मध्ये त्याच विद्यापीठात ते गुणश्री प्राध्यापक झाले.

बारडीन यांनी १९४५ नंतर प्रामुख्याने अर्धसंवाहक व धातू यांतील विद्युत् संवहन, अर्धसंवाहकांचे पृष्ठीय गुणधर्म, अतिसंवाहकतेसंबंधीचा सिद्धांत आणि घन पदार्थांतील अणूंचे विसरण (एकमेकांत आपोआप मिसळण्याची क्रिया) या विषयांवर संशोधन केले. १९५७ मध्ये बारडीन व त्यांचे सहकारी कूपर व स्क्रीफर यांनी प्रथमच अतिसंवाहकतेच्या आविष्काराचे यशस्वी स्पष्टीकरण दिले. याकरिता त्यांनी मांडलेला सिद्धांत ‘बीसीएस सिद्धांत’ (बारडीन, कूपर व स्क्रीफर या नावांच्या आद्याक्षरांचा समावेश केलेल्या) या नावाने ओळखला जातो. अतिसंवाहकतेच्या स्पष्टीकरणार्थ त्यांनी विकसित केलेल्या गणितीय पद्धतींचा उपयोग पुढे अणुकेंद्रीय संरचनेतील विविध वैशिष्ट्यांच्या विवरणासाठी यशस्वीपणे करण्यात आला ⇨मूलकणांच्या सिद्धांतातही या पद्धती वापरण्यात आल्या. बारडीन यांनी त्यानंतर त्यांच्या सिद्धांताचा विस्तार व अनुप्रयोग यासंबंधीच बहुतांशी संशोधन केले.

बारडीन हे अमेरिकन फिजिकल सोसायटीचे फेलो तसेच अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट् स ॲड सायन्स, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९५४), लंडनची रॉयल सोसायटी, भारतातील इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. कित्येक वैज्ञानिक संस्थांचे सदस्य आहेत. अमेरिकेच्या अध्याक्षांच्या विज्ञान सल्लागार समितीचे ते १९५९-६२ मध्ये सदस्य होते. नोबेल पारितोषिकांखेरीज फिलाडेल्फियाच्या फ्रँक्लिन इन्स्टिट्यूटचे स्ट्यूअर्ट बॅलेंटाइन पदक (१९५२) व फिलाडेल्फिया शहरातर्फे जॉन स्कॉट पदक (१९५५) ही दोन्ही पदके ब्रॅटन यांच्याबरोबर तसेच फ्रिट्स लंडन पुरस्कार (१९६२), फ्रँक्लिन पदक (१९७५), अमेरिकेच्या अध्यक्षांचे फ्रीडम पदक (१९७७) इ. अनेक बहुमान त्यांना मिळाले. ते अमेरिकेन फिजिकल सोसायटीचे १९६८-६९ मध्ये अध्यक्ष होते. द फिजिकल रिव्ह्यू आणि रिव्ह्यूज ऑफ मॉडर्न फिजिक्स या नियतकालिकांच्या संपादक मंडळावर त्यांनी काही काळ काम केले.

भदे, व. ग.