क्रुक्स, सर विल्यम : (१७ जून १८३२–४ एप्रिल १९१९). इंग्‍लिश भौतिकीविज्ञ व रसायनशास्त्रज्ञ. थॅलियम या मूलद्रव्याच्या शोधाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म लंडन येथे झाला. रॉयल कॉलेज ऑफ केमिस्ट्री येथे रसायनशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर १८५०–५४ मध्ये होफमान यांचे साहाय्यक म्हणून क्रुक्स यांनी काम केले. त्यानंतर ते १८५४ मध्ये ऑक्सफर्ड येथील रॅडिक्लिफ वेधशाळेतील वातावरणविज्ञान शाखेचे प्रमुख व १८५५ साली चेस्टर येथील सायन्स कॉलेजमध्ये रसायनशास्त्रचे प्राध्यापक होते. १८५६ मध्ये ते लंडन येथे स्थायिक झाले व तेथेच त्यांनी नंतर रासायनिक सल्लागार म्हणून काम केले. त्यांनी १८५९ साली केमिकल न्यूज या नियतकालिकाची स्थापना केली आणि १८६४ नंतर क्वार्टर्ली जर्नल ऑफ सायन्स  या नियतकालिकांचे संपादन केले.

सेलेनियम या मूलद्रव्याच्या सेलेनोसायनाइडे या संयुगांबद्दल त्यांनी १८५१ साली एक निबंध प्रसिद्ध केला. १८६१ मध्ये थॅलियम या नवीन मूलद्रव्याचा वर्णपट तंत्राच्या साहाय्याने शोध लावला व १८७३ मध्ये त्याच्या अणुभाराचे मापन केले. अतिशय कमी दाबाखाली असलेल्या वायूंच्या गुणधर्मांचा तसेच विरल मृत्तिका-मूलद्रव्यांचा (अणुक्रमांक ५७ ते ७१ असलेल्या मूलद्रव्यांचा) त्यांनी अभ्यास केला. सोने व चांदी या धातू त्यांच्या धातुकांपासून (कच्च्या धातूंपासून) वेगळ्या करण्यासाठी त्यांनी सोडियम संयोजन पद्धतीचा शोध लावला. प्रारित (तरंगरूपी) ऊर्जेच्या अभिज्ञानासाठी उपयुक्त असे रेडिओमीटर हे उपकरण तयार केले [→ उष्णता प्रारण]. विरलीकृत वायूतील विद्युत् विसर्जनाचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी ‘क्रुक्स नलिका’ तयार केली. युरेनियमापासून त्याचा युरेनियम-एक्स हा क्रियाशील भाग वेगळा करण्यात त्यांनी यश मिळविले. रेडियमाच्या गुणधर्मांचा अभ्यास करून त्यांनी आल्फा प्रारणाच्या संशोधनास उपयुक्त अशा स्पिनथारीस्कोप या उपकरणाचा शोध लावला. वितळलेल्या उष्ण काचेपासून निघणाऱ्या अपायकारक किरणांपासून कामगारांच्या डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी त्यांनी डोळ्यांसमोर धरण्यासाठी एका विशिष्ट प्रकारच्या काचेचा शोध लावला. यावरूनच चष्म्याच्या ‘क्रुक्स-काचा’ हा शब्दप्रयोग प्रचारात आला.

चित्‌शक्तिवादाचा (स्पिरिच्युॲलिझमाचा) त्यांनी सखोल अभ्यास करून अनेक माध्यम व्यक्तींच्या शास्त्रीय चाचण्या घेतल्या व त्यांसंबंधी अनेक लेख प्रसिद्ध केले. या अभ्यासाच्या संदर्भात त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यांनी विविध विषयांवरील सु. २५०–३०० शास्त्रीय निबंध तसेच काही ग्रंथ प्रसिद्ध केले. त्याचबरोबर त्यांनी इतर काही शास्त्रीय नियतकालिकांचे व ग्रंथांचे संपादनही केले.

त्यांना १८९७ मध्ये ‘नाईट’ व १९१० साली ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हे किताब प्राप्त झाले. त्यांना ॲल्बर्ट सुवर्णपदक (१८९९) व सोसायटी ऑफ केमिकल इंडस्ट्रीजचे सुवर्णपदक (१९१२) हे बहुमान मिळाले. ते रॉयल सोसायटीचे, तसेच अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस व इतर अनेक शास्त्रीय संस्थांचे सन्माननीय सदस्य होते. ते लंडन येथे मृत्यु पावले.

भदे, व. ग.