फ्रेनेल, आग्यूस्तीन झां : (१० मे १७८८-१४ जुलै १८२७). फ्रेच भौतिकीविज्ञ व अभियंते. ⇨ प्रकाशकी या विषयात त्यांनी महत्त्वाचे कार्य केले. नॉर्मंडीतील ब्रॉल्यी येथे त्यांचा जन्म झाला. पॅरिस येथिल एकोल पॉलिटेक्नकमध्ये शिक्षण घेतल्यानंतर विविध सरकारी खात्यांत त्यांनी स्थापत्य अभियंते म्हणून काम केले. १८१४ मध्ये नेपोलियन आल्बाहून परतल्यावर फ्रेनेल यांची नोकरी राजकीय कारणास्तव काही काळ खंडित झाली व त्या वेळीच त्यांनी प्रकाशकीमधील संशोधनास प्रारंभ केला. तथापि नेपोलियन यांच्या पराभवानंतर फ्रेनेल यांना नोकरीत परत घेण्यात आले व त्यानंतर फुरसतीच्या वेळीच त्यांना संशोधन करणे शक्य झाले.

बारीक फटीतून येणाऱ्या प्रकाशकिरणाच्या विवर्तनासंबंधीचे (मार्गातील पदार्थाच्या कडेवरून जातांना होणाऱ्या दिशाबदलासंबंधीचे) आपले संशोधन कार्य त्यांनी १८१६ मध्ये Annales de chimie et de physique या नियतकालिकात प्रसिद्ध केले. व्यतिकरणासंबंधीच्या (सारख्या तरंगलांबींच्या दोन वा अधिक तरंगमाला एकावर एक येऊन मिसळल्यामुळे एका आड एक सुप्रकाशित व अप्रकाशित पट्ट निर्माण होण्याच्या आविष्कारासंबंधीच्या) त्यांच्या गणितीय विश्लेषणामुळे व प्रायोगिक संशोधनामुळे प्रकाशाच्या स्वरूपाविषयीचा तरंग सिद्धांत प्रस्थापित होण्यास फार मदत झाली [⟶ प्रकाश]. यामुळे व्यतिकरण पट्ट उत्पन्न करणाऱ्या बऱ्याच उपकरणांना फ्रेनेल यांचे नाव देण्यात आले आहे. डी. एफ्. ॲरोगो यांच्याबरोबर त्यांनी ध्रुवित (एकाच प्रतलात कंप पावणाऱ्या) प्रकाशकिरणांच्या व्यक्तिकरणासंबंधी अभ्यास केला. वृत्तीय ध्रुवित प्रकाशकिरण [⟶ प्रकाशकी] मिळविण्यासाठी त्यांनी समचतुर्भुजाकृती काचेचा उपयोग केला. ⇨ दीपगृहातील प्रकाशयोजनेसाठी आरशांच्याऐवजी त्रिकोणी लोलक व भिंग यांनी बनणारी संयुक्त प्रणाली (फ्रेनल भिंग) जास्त उपयुक्त आहे, असे त्यांनी दाखवून दिले.

फ्रेनेल यांच्या या महत्त्वपूर्ण कार्याला त्यांच्या आयुष्यात फारशी प्रसिद्धी व प्रशंसा मिळाली नाही. १८२३ मध्ये फ्रान्सच्या ॲकॅडेमी दे सायन्सेसचे व १८२५ मध्ये लंडनच्या रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून त्यांची निवड झाली. रॉयल सोसायटीने १८२७ मध्ये (त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या महिन्यात) रम्फर्ड पदक देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. पॅरिसजवळील व्हील-दावरे येथे क्षयरोगाने त्यांचा अकाली मृत्यू झाला.

भदे, व. ग.