ब्रॉग्ली, ल्वीव्हीक्तॉरदः (१५ ऑगस्ट १८९२ – ). फ्रेंच भौतिकीविज्ञ. आधुनिक भौतिकीत दूरगामी महत्त्वाच्या ठरलेल्या इलेक्ट्रॉनांच्या तरंगरूपाच्या शोधाबद्दल त्यांना १९२९ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा सन्मान मिळाला. त्यांनी तरंग यामिकीचा [⟶ पुंजयामिकी] पाया घालण्याचे महत् कार्य केले.

ब्रॉग्ली यांचा जन्म दीएप येथे झाला. ते ⇨ मॉरिस द ब्रॉग्ली या भौतिकीविज्ञांचे धाकटे बंधू होत. प्रथमतः त्यांनी इतिहासाचा अभ्यास करून १९१० मध्ये त्या विषयाची पदवी मिळविली परंतु विज्ञानाच्या आवडीमुळे त्यांनी १९१३ मध्ये भौतिकीय विज्ञानाचीही पदवी संपादन केली. पहिल्या महायुद्धात त्यांना सक्तीने लष्करात भरती व्हावे लागले आणि १९१४ -१८ या काळात त्यांनी आयफेल टॉवरमधील लष्करी रेडिओ केंद्रात काम केले. महायुद्धानंतर मॉरिस व त्यांचे सहकारी करीत असलेल्या प्रायोगिक कार्यात भाग घेण्याबरोबरच ल्वी यांनी सैद्धांतिक भौतिकीचा, विशेषतः ⇨ पुंज सिद्धांताचा, अभ्यास केला. १९२४ मध्ये त्यांनी पुंज सिद्धांतावरील आपल्या संशोधनावर आधारलेला प्रबंध पॅरिस विद्यापीठाला सादर केला व त्याबद्दल त्यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. सार्‌बॉन येथे दोन वर्षे अध्यापन केल्यानंतर पॅरिस येथे नव्यानेच स्थापन झालेल्या इन्स्तित्यूत आंरी प्वँकारे या संस्थेत सैद्धांतिक भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली. १९३२ – ६२ या काळात ते पॅरिस विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखेत सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक होते.

ॲल्बर्ट आइन्स्टाइन यांनी १९०५ मध्ये ⇨ प्रकाशविद्युत् परिणामाचे विवरण करताना प्रकाश तरंग व प्रकाश कण [⟶ फोटॉन] यांच्या सह अस्तित्वाची संकल्पना मांडली. १९२२ च्या सुमारास द ब्रॉग्ली यांना प्रकाशाचा पुंज सिद्धांत आणि इलेक्ट्रॉनांचा कणात्मक सिद्धांत हे दोन्ही समाधानकारक नाहीत, अशी जाणीव झाली. सैद्धांतिक संशोधनाच्या आधारे त्यांनी द्रव्याच्या कोणत्याही कणाबरोबर (उदा., इलेक्ट्रॉनाबरोबर) ‘द्रव्य तरंग’ संबद्ध असतात, ही आइन्स्टाइन यांच्या संकल्पनेचा विस्तार करणारी संकल्पना मांडली. यासंबंधीचे त्यांचे पहिले दोन निबंध १९२२ मध्ये प्रसिद्ध झाले. १९२३ मध्ये त्यांनी मांडलेल्या कला तरंगांच्या [स्थिर कला असलेल्या तरंगांच्या ⟶ तरंग गति] संकल्पनेमुळे तरंग यामिकीच्या सिद्धांताची सुरुवात झाली. त्यांनी १९२४ मध्ये डॉक्टरेटसाठी सादर केलेल्या प्रबंधात आपला एकूण सिद्धांत सुसंगतपणे व अधिक विस्ताराने मांडला. या प्रबंधात त्यांनी मांडलेल्या कल्पना नावीन्यपूर्ण असल्याने शास्त्रीय जगतात विस्मयकारक ठरल्या. आइन्स्टाइन यांनी या प्रबंधाचे महत्व जाहीरपणे मान्य केल्याने त्या काळच्या सैद्धांतिक भौतिकीविज्ञांचे द ब्रॉग्ली यांच्या सिद्धांताकडे लक्ष वेधले गेले. ई. श्रोडिंजर यांनी द ब्रॉग्ली यांच्या द्रव्य तरंगांच्या गृहीताची माहिती समजल्यावरून त्याच्या आधारे तरंग यामिकीची सैद्धांतिक उभारणी केली. तथापि या सैद्धांतिक संकल्पनेला १९२७ मध्ये अमेरिकन भौतिकीविज्ञ सी. जे. डेव्हिसन व एल्. एच्. गर्मर यांनी तसेच स्वतंत्रपणे ब्रिटिश भौतिकीविज्ञ सर जी. पी. टॉमसन यांनी ⇨ इलेक्ट्रॉन विवर्तन या आविष्काराचा शोध लावल्यावरच प्रायोगिक पुरावा मिळाला. त्याच वर्षी द ब्रॉग्ली यांनी एका निबंधाद्वारे तरंग यामिकीतील रेखीय (एकघाती) समीकरणे सोडविण्यासाठी ‘दुहेरी निर्वाहाचा (उत्तराचा) सिद्धांत’ मांडला आणि त्यावरून कण हा त्याच्या तरंगात अशा प्रकारे गतिमान असतो की, त्याचे अंतर्गत कंपन तो ज्या तरंगाबरोबर जातो त्याच्याशी स्थिर कलेमध्ये असते, असे प्रतिपादन केले. ब्रूसेल्स येथे त्या वर्षी भरलेल्या सॉल्व्हे काँग्रेसमध्ये माक्स बोर्न, नील्स बोर व त्यांचे विद्यार्थी यांनी मांडलेले आणि बोर यांच्या पूरकतेच्या संकल्पनेवर आधारलेले नवीन यामिकीचे शुद्ध संभाव्यतात्मक विवरण द ब्रॉग्ली यांच्या विवरणाच्या विरोधी होते. त्या वेळी ब्रॉग्ली यांना त्यांचे विवरण मांडण्याकरिता बोलविण्यात आले आणि आइन्स्टाइन व श्रोडिंजर यांनी या विवरणावर महत्त्वाचे आक्षेप घेऊनही बहुसंख्य सैद्धांतिक भौतिकीविज्ञांनी द ब्रॉग्ली यांचे विवरण ग्राह्य धरले. तथापि मागाहून बोर्न, बोर व डब्ल्यू. हायझेनबेर्क यांचे विवरण सर्वत्र मान्यता पावले. द ब्रॉग्ली यांनी आपला सिद्धांत १९५४ नंतर नवीन रूपात विकसित करण्याचा प्रयत्न केला. १९३० – ५० या काळात त्यांनी तरंग यामिकीच्या विस्तारासंबंधी उदा., पी. ए. एम्. डिरॅक यांचा इलेक्ट्रॉन सिद्धांत [⟶ पुंज यामिकी], प्रकाशाच्या स्वरूपासंबंधीचा नवा सिद्धांत, अणुकेंद्रीय भौतिकीतील अनुप्रयोग इत्यादींच्या संदर्भात संशोधन केले.

आधुनिक भौतिकीच्या तत्वज्ञानीय अन्वयार्थासंबंधीचे आपले विचार द ब्रॉग्ली यांनी व्याख्याने, लेख व ग्रंथ यांद्वारे मांडले. त्यांच्या दृष्टीने आणवीय भौतिकीमध्ये मूलभूत असलेले सांख्यिकीय (संख्याशास्त्रीय) विचार हे मूलगामी कारणांचे अज्ञान दर्शवितात की ते ज्ञात असावयास पाहिजे असलेल्या सर्व बाबी व्यक्त करतात, ही मध्यवर्ती समस्या होती. काही शास्त्रज्ञांच्या विश्वासाप्रमाणे मापनाची क्रिया जी राशी मापावयाची आहे (व जिच्यापासून मापन क्रिया अलग करता येत नाही) तिच्यावर परिणाम करीत असेल, तर वरीलपैकी दुसरी गोष्ट सत्य असली पाहिजे. १९२३ मधील त्यांच्या कार्यानंतर सु. ३० वर्षे त्यांनी मूलगामी कारणे अंतिम जाणिवेच्या दृष्टीने निदर्शित करणे शक्य नाही हा विचार सातत्याने मांडला परंतु कालांतराने ते सांख्यिकीय सिद्धांत पूर्णपणे निर्धारित व निर्धारणीय सत्यता आपली प्रायोगिक तंत्रे निष्फळ ठरविणाऱ्या चलांच्या (बदलत्या राशींच्या) मागे दडवितात, या आपल्या मूळ विचाराकडे वळले.

द ब्रॉग्ली फ्रान्सची ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९३३), फ्रेंच ॲकॅडेमी (१९४३), लंडनची रॉयल सोसायटी (१९५३), अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस (१९४२), इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. अनेक शास्त्रीय संस्थांचे सदस्य आहेत. फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे ते १९४२ – ७५ या काळात कायम सचिव होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना फ्रान्सच्या ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे आंरी प्वँकारे पदक (१९२९), सामान्य जनांना आधुनिक भौतिकीतील विचार समजावून सांगण्याकरिता केलेल्या प्रयत्नांबद्दल युनेस्कोचे पहिले कलिंग पारितोषिक (१९५४), फ्रेंच नॅशनल सायंटिफिक रिसर्च सेंटरचे सुवर्ण पदक (१९५६) वगैरे अनेक सन्मान मिळालेले आहेत. १९४५ नंतर ते फ्रान्सच्या अणुऊर्जा मंडळाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचे सदस्य होते. त्यांनी लिहिलेल्या अनेक ग्रंथांपैकी इंग्रजीत भाषांतरित झालेले ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : मॅटर अँड लाइट : द न्यू फिजिक्स (१९३९), न्यू परस्पेक्टिव्हज् इन फिजिक्स (१९६२), फिजिक्स अँड मायक्रोफिजिक्स (१९६०), नॉन – लिनियर वेव्ह मेकॅनिक्स (१९६०), द करंट इंटरप्रिटेशन ऑफ वेव्ह मेकॅनिक्‌स (१९६४). यांखेरीज त्यांनी वेव्ह मेकॅनिक्स अँड मॉलिक्युलर बायॉलॉजी (१९६६) हा ग्रंथ संपादित केला आहे.

भदे, व. ग.