हॉल, जॉन लेविस : (२१ ऑगस्ट १९३४). अमेरिकन भौतिकीविज्ञ. हॉल यांनाथिओडोर डब्ल्यू. हान्श आणि रॉय जे. ग्लाउबर यांच्यासमवेत २००५ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून मिळाले. पारितोषिकाची अर्धी रक्कम हॉल आणि हान्श यांना लेसर आधारित परिशुद्ध वर्णपटविज्ञानाचा विकास केल्याबद्दल आणि उर्वरित अर्धी रक्कम रॉय जे. ग्लाउबर यांना पुंज सिद्धांतातील प्रकाशीय कलामेलन या कार्याबद्दल मिळाली. 

 

जॉन लेविस हॉल
 

 हॉल यांचा जन्म डेन्व्हर (कोलोरॅडो) येथे झाला. त्यांनी पिट्सबर्ग येथील कार्नेगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेत भौतिकी विषयाचे अध्ययन केले आणि बी.एस्. (१९५६), एम.एस्. (१९५८) व पीएच्.डी. (१९६१) या पदव्या संपादन केल्या. यानंतर त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ स्टँडर्ड्स (आताचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी) आणि कोलोरॅडो विद्यापीठ यांद्वारे संचालित जॉइंट इन्स्टिट्यूट फॉर लॅबोरेटरी ॲस्ट्रोफिजिक्स (जेआयएलए) येथे संशोधन केले. त्यांनी लेसर तंत्रविद्येचा वापर करून लेसर कंप्रता स्थिरीकरण, उच्च विभेदन व अतिसंवेदनक्षम लेसर वर्णपटविज्ञान, लेसर शीतलीकरण, पुंज प्रकाशकी आणि उच्च परिशुद्ध मापने यांसंबंधी अनेक शोध लावले व ते विकसित केले. 

 

हान्श यांच्याबरोबर संशोधन कार्य करीत असताना हॉल यांनी प्रकाशीय कंप्रता मोजण्याच्या संशोधनास सुरुवात केली. १९७० च्या दशकाच्या शेवटी हान्श यांनी प्रकाशीय कंप्रता फणी-तंत्राची संकल्पना मांडली. त्यामध्ये त्यांनी लेसर प्रकाशाचे अतिसूक्ष्म स्पंद हे परिशुद्ध स्थानीय कंप्रतेच्या शिखरबिंदूचा संच तयार करीत असतात आणि ते केसांच्या फणीच्या दातांसारखे समांतर असतात, असे सिद्ध केले. त्यामुळे प्रकाशीय कंप्रता अचूकपणे पंधरा दशांश स्थळापर्यंत अथवा क्वाड्रिलियनचा एक भाग (१०¹⁵) इतकी मोजता येऊ शकेल, अशी व्यवहार्य पद्धत उपलब्ध झाली. हॉल आणि हान्श यांनी या सिद्धांताच्या तपशिलासंबंधीचे संशोधन-कार्य २००० मध्येच पूर्ण केले होते. 

 

हॉल यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले. त्यांचे २३० पेक्षा अधिक शास्त्रीय लेख विविध नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची १० एकस्वे (पेटंटे) मिळाली आहेत. ते नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेचे सभासद आणि ऑप्टिकल सोसायटी ऑफ अमेरिका व अमेरिकन फिजिकल सोसायटी या संस्थांचे फेलो आहेत. 

 

हॉल हे २००४ मध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्टँडर्ड्स अँड टेक्नॉलॉजी या संस्थेमधून सेवानिवृत्त झाल्यानंतर लेसर तंत्रशास्त्र सल्लागार कंपनीचे मुख्य अधिकारी झाले. 

खोब्रागडे, स्नेहा दिलीप