हॉर्स्ट लूटव्हिख स्टॉर्मर

स्टॉर्मर, हॉर्स्ट लूटव्हिख : (६ एप्रिल १९४९). जर्मनीत जन्मलेले अमेरिकन भौतिकीविज्ञ. अंशात्मक-पुंज-हॉल परिणामाचा शोध लावून त्याचे स्पष्टीकरण दिल्याबद्दल १९९८ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिक स्टॉर्मर यांना डॅनिएल त्सुई आणि रॉबर्ट लॉघलिन यांच्यासमवेत विभागून मिळाले.

स्टॉर्मर यांचा जन्म फ्रँकफुर्ट आम मेन, पश्चिम जर्मनी (सध्याचे जर्मनी) येथे झाला. त्यांनी स्टटगार्ट विद्यापीठात भौतिकी विषयातील पीएच्.डी.  पदवी संपादन केली (१९७७). अमेरिकेची संयुक्त संस्थाने या देशात स्थलांतरित झाल्यानंतर त्यांनी बेल प्रयोगशाळांमध्ये त्सुई यांच्यासमवेत संशोधनास सुरुवात केली (१९७८). याच प्रयोगशाळांपैकी फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीचे ते प्रमुख आणि कोलंबिया विद्यापीठात प्राध्यापक होते (१९९२—९८).

स्टॉर्मर व त्सुई यांचे संशोधन हॉल परिणामावर होते. हॉल परिणामामध्ये प्रबल चुंबकीय ध्रुवांदरम्यान विद्युत् प्रवाह वाहून नेणारे सपाट पातळ पटल ठेवले असता, त्यात विद्युत् दाब निर्माण झाल्याचे त्यांना आढळले. क्लाउस फोन क्लिट्झिंग यांच्या १९८० मधील संशोधनाप्रमाणे अतिशय कमी तापमानाला चुंबकीय क्षेत्राची तीव्रता हळूहळू व संतत वाढविली असता, विचलित विद्युत् प्रवाहाचा विद्युत् दाब (हॉल रोधात) पृथक् टप्प्यांनी आढळतो व अशामुळे पुंज गुणधर्म दिसून येतात. स्टॉर्मर व त्सुई यांनी क्लिट्झिंग यांचे संशोधनकार्य पुढे नेले. अतिशय प्रबल चुंबकीय क्षेत्रात आणि निरपेक्ष शून्य तापमानाजवळ अर्धसंवाहक पदार्थामधील हॉल परिणामाचे त्यांनी निरीक्षण केले. हा हॉल परिणाम केवळ  टप्प्याटप्प्याने बदलत नसून अंशात्मक वाढीने सुद्धा वाढतो असे त्यांना दिसून आले (१९८२). पदार्थामध्ये विद्युत् प्रवाह प्रवाहित करण्यासाठी इलेक्ट्रॉनाचा अंशात्मक विद्युत् भार असावा लागतो, हे त्यांनी निदर्शनास आणून दिले. लॉघलिन यांनी १९८३ मध्ये या आविष्काराचे वर्णन केले. प्रबल चुंबकीय क्षेत्रातील इलेक्ट्रॉन हे पुंजकीय द्रायू तयार करीत असून ते क्वासी कणांनी बनलेले असतात आणि त्यांना अंशात्मक विद्युत् भार असतात, असे त्यांनी सूचित केले.

खोब्रागडे, स्नेहा दिलीप