नैकवर्णता: (प्लीओक्रोइझम). काही रंगीत द्विप्रणमनी (ज्यांमध्ये एका आपाती किरणासाठी ज्यांच्या दिशेत बदल झालेला आहे असे दोन किरण मिळतात अशा) स्फटिकांमध्ये स्फटिकाच्या निरनिराळ्या अक्षांच्या दिशेने पाहिले असता वेगवेगळे रंग दिसतात. अशा स्फटिकांत निरनिराळ्या ध्रुवण दिशांत (प्रकाश तरंग ज्या विशिष्ट प्रतलांत कंप पावतात त्या प्रतलांच्या दिशांत) विशिष्ट रंगांच्या प्रकाशाचे कमीअधिक प्रमाणात शोषण होते. इओलाइट आणि तोरमल्ली (टुर्मलीन) यांच्या स्फटिकांत हा आविष्कार एवढा तीव्र असतो की, प्रकाशाचा एक ध्रुवित घटक पूर्णपणे शोषला जातो व यामुळे तोरमल्ली स्फटिकाचा ध्रुवणमापक उपकरणात विश्लेषक म्हणून उपयोग करण्यात येतो [→ ध्रुवणमिति]. हल्ली नैकवर्णता या संज्ञेऐवजी रेषीय किंवा वृत्तध्रुवित द्विवर्णता या संज्ञा वापरल्या जातात [→ प्रकाशकी].

शिरोडकर, सु. स.