मायर, मारीआ गोपर्ट : (२८ जून १९०६ –    ). जर्मन-अमेरिकन भौतिकीविज्ञ. अणुकेंद्राच्या कवच प्रतिमानाचा (मॉडेलचा) शोध व त्याच्या आधारे विविध अणुकेंद्रीय घटनांचे मांडलेले स्पष्टीकरण यांबद्दल मायर यांना ⇨ योहानेस हान्स डानियल येन्झेन व ⇨ यूजीन पॉल विग्नर यांच्या समवेत १९६३ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला.

मायर याचा जन्म जर्मनीतील (आता पोलंडमधील) काटोव्हित्स येथे झाला. १९२४ मध्ये त्यांनी गर्टिगेन विद्यापीठात प्रवेश केला व माक्स बोर्न यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९३० मध्ये त्यांनी भौतिकीची पीएच्. डी. पदवी मिळविली. त्याच वर्षी त्यांनी जोसेफ ई. मायर या अमेरिकन भौतिकीय रसायनशास्त्रज्ञांशी विवाह केला आणि त्यांच्या बरोबर वॉल्टिमोर येथील जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठात संशोधनासाठी गेल्या. तेथे त्यांचे पती व कार्ल एफ्. हर्झफेल्ड यांच्या समवेत त्यांचे अनेक संशोधन निबंध प्रसिद्ध झाले. १९३३ मध्ये त्यांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळाले. १९३९ मध्ये त्या कोलंबिया विद्यापीठात गेल्या व तेथे त्यांनी सेरा लॉरेन्स कॉलेजात अध्यापन केले पण मुख्यत्वे अमेरिकेच्या अणुबाँब प्रकल्पाकरिता उभारलेल्या एस्. ए. एम्. लॅबोरेटरीत युरेनियमाचे समस्थानिक (अणुक्रमांक तोच पण भिन्न अणुभार असलेले त्याच मूलद्रव्याचे प्रकार) अलग करण्यासंबंधी त्यांनी संशोधन केले. १९४६ मध्ये त्या शिकागो विद्यापीठाच्या भौतिकी विभागात व इन्स्टिट्यूट फॉर न्यूक्‍लिअर स्टडीज या संस्थेत प्राध्यापिका झाल्या. याच वेळी त्या अमेरिकेच्या अणुऊर्जा मंडळाच्या ऑर्‌गॉन नॅशनल लॅबोरेटरीतही संशोधन करीत होत्या. १९६० मध्ये ला हॉइया येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात त्या भौतिकीच्या प्राध्यापिका झाल्या.

त्यांचे कार्यक्षेत्र १९४८ पूर्वी रेणवीय संरचना, घन अवस्था सिद्धांत, प्रावस्था परिवर्तन सिद्धांत [→ प्रावस्था नियम] व सांख्यिकीय यामिकी [→ सांख्यिकीय भौतिकी] या विषयांसंबंधी होते. स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स हा त्यांनी पतिसमवेत लिहिलेला ग्रंथ १९४० मध्ये प्रसिद्ध झाला. १९४८ नंतर यांनी आपले लक्ष अणुकेंद्रीय भौतिकीकडे वळविले. अणुकेंद्रातील संवृत (बंद) कवचांच्या लक्षणांचा त्यांनी पुन्हा शोध लावला व पूर्वी त्यांच्या अस्तित्वासंबंधी आढळलेल्या सूचक लक्षणांना त्यामुळे धार मिळाला. संवृत कवचयुक्त अणुकेंद्रे इतर अणुकेंद्रांपेक्षा अधिक स्थिर आणि अधिक विपुल असतात, त्यांच्या पहिल्या उत्तेजित अवस्था अतिशय उच्‍च असतात आणि संवृत इलेक्ट्रॉन कवचे असलेल्या ⇨ अक्रिय वायूंप्रमाणे त्यांचे गुणधर्म असल्याचे दिसून येते. या सर्व अणुकेंद्रांतील न्यूट्रॉनांची संख्या विशिष्ट (२, ८, २०, २८, ५०, ८२, १२६) अशी असते व तितकीच संख्या प्रोटॉनांचीही असते. पुढे या संख्या ‘कूट अंक’ [→ अणुकेंद्रीय भौतिकी] या नावाने ओळखण्यात येऊ लागल्या. वरील गुणलक्षणांवरून मायर यांनी असा निष्कर्ष काढला की, अणुकेंद्राचे घटक म्हणजे प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना पूर्वी शास्त्रज्ञांना वाटत होती त्यापेक्षा अधिक व एकमेकांपासून स्वतंत्र अशी गती असते. अणूकेंद्रातील घटकांच्या परिवलनाची दिशा अणुकेंद्रीय कक्षांच्या ऊर्जा निर्धारित करण्यात महतत्त्वाच्या असतात. (इलेक्ट्रॉन कवचांमध्ये मात्र असे होत नाही), असाही शोध त्यांनी लावला. १९४९ मध्ये त्यांनी अणुकेंद्रीय कवच सिद्धांताच्या आधारे कूट अंकांचे स्पष्टीकरण दिले. याखेरीज इतर अनेक अणुकेंद्रीय घटनांचेही विश्लेषण त्यांनी या सिद्धांताच्या आधारे केले. याच सुमारास यंन्झेन यांनीही स्वतंत्रपणे ओटो हॅक्सेल व हान्स एफ्. स्यूस यांच्या सहकार्याने अणुकेंद्रीय कवच प्रतिमानाचा सिद्धांत मांडला होता. पुढे येन्झेन व मायर यांनी परस्पर सहकार्याने एलिमेंटरी थिअरी ऑफ न्यूक्‍लिअर शेल स्ट्रक्चर हा ग्रंथ लिहिला व तो १९५५ मध्ये प्रसिद्ध झाला.

नोबेल पारितोषिकाची निम्मी रक्कम मायर व येन्झेन यांना आणि निम्मी विग्नर यांना विभागून मिळाली. १९५६ मध्ये मायर यांची नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर निवड झाली. रसेल सेज कॉलेज व इतर अनेक संस्थांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदव्या दिलेल्या आहेत.

भदे, व. ग.