सेल्सिअस, आंडर्स : (२७ नोव्हेंबर १७०१ — २५ एप्रिल १७४४. स्वीडिश ज्योतिर्विद. त्यांनी सेल्सिअस तापक्रम १७४२ मध्ये शोधून काढला. याला पुष्कळदा सेंटिग्रेड तापक्रम म्हणतात.
सेल्सिअस यांचा जन्म अप्साला (स्वीडन) येथे झाला. ते १७३० — ४४ या काळात अप्साला विद्यापीठात ज्योतिषशास्त्राचे प्राध्यापक होते. या काळातच त्यांनी जर्मन, ब्रिटन, फ्रान्स व इटली येथील वेधशाळांना भेटी दिल्या होत्या. १७४० मध्ये त्यांनी अप्साला वेधशाळा उभारली व ते त्या वेधशाळेचे संचालक झाले. त्यांनी व इतरांनी १७१६—३२ या काळात न्यूरेंबर्ग येथे उत्तर ध्रुवीय प्रकाशाचे (ऑरोरा बोरिॲलिसचे) ३१६ वेध घेतले होते. त्यांनी १७३३ मध्ये प्रसिद्ध केले. मध्यान्हवृत्ताचा चाप मोजण्याचा त्यांनी पुरस्कार केला होता व यासाठी संघटित केलेल्या मोहिमेत त्यांनी भाग घेतला होता. या मोहिमेमुळे पृथ्वी ध्रुवांपाशी काहीशी चपटी आहे, या न्यूटन यांच्या उपपत्तीची खात्री पटली. स्वीडीश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसपुढे सादर केलेल्या संशोधनपर लेखात त्यांनी तापमापकाचे वर्णन केले होते (१७४२) ‘ डिसर्टेशन ऑन न्यू मेथड ऑफ डिटरमिनिंग द डिस्टन्स ऑफ द सन फ्रॉम द अर्थ ’ (१७३०) आणि ‘ डिस्क्विझीशन ऑन ऑब्झर्व्हेशन्स मेड इन फ्रान्स फॉर डिटरमिनिंग द शेप ऑफ द अर्थ ’ (१७३८) या इंग्रजी शीर्षकार्थांनी लिहिलेले त्यांचे लेखही मोलाचे आहेत. त्यांचे काही महत्त्वाचे लेख स्वीडिश ॲकॅडेमीच्या इतिवृत्तात प्रसिध्द झाले होते. ते रॉयल सोसायटीचे सदस्य होते.
सेल्सिअस यांच्या नावे प्रसिद्ध असलेला तापक्रम हा पाण्याचा गोठणबिंदू ०० आणि उकळबिंदू १०० असतो, या गृहितांवर आधारलेला आहे. या दोन निर्धारित बिंदूंच्या दरम्यान १०० अंशांचे अंतर असल्याने या तापक्रमाला कधीकधी सेंटिग्रेड (शतमान) तापक्रम म्हणतात. हा तापक्रम जेथे मेट्रिक (दशमान) एकके स्वीकारण्यात आली आहेत. तेथे सर्वसाधारणपणे वापरतात, तसेच वैज्ञानिक कामांत हा तापक्रम सर्वत्र वापरला जातो. अप्साला येथे सेल्सिअस यांचे निधन झाले.
पहा : तापमापन.
भदे, व. ग.
“