पॉयंटिग, जॉन हेन्‍री :(९ सप्टेंबर १८५२-३० मार्च १९१४). ब्रिटिश भौतिकविज्ञ. त्यांनी गुरूत्त्वाकर्षण व विद्युत् या विषयांत महत्त्वाचे कार्य केले. त्यांचा जन्म मँचेस्टरजवळील माँटन येथे झाला. मँचेस्टर येथील ओएन्झ कॉलेजमध्ये १८६७-७२ मध्ये शिक्षण घेतल्यावर १८७२ साली त्यानी लंडन विद्यापीठाची बी. एससी. पदवी मिळवली. १८७२-७६ या काळात त्यांनी केंब्रिज येथिल ट्रिनिटी कॉलेजात शिक्षण घेतले व १८७६ साली ते रँग्लर झाले. ओएन्ज कॉलेजात भौतीकीचे प्रयोगनिर्देशक म्हणून काही काळ काम केल्यानंतर त्यांची ट्रिनिटी कॉलेजचे फेलो म्हणून १८७८ मध्ये निवड झाली व तेथिल कॅव्हेंडिश प्रयोगशाळेत त्यांनी जे. सी. मॅक्सवेल या ससुप्रसिध्द भौतिकीविज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १० वर्षे संशोधन केले. १८८० मध्ये बर्मिंगहॅम येथील मेसन कॉलेजात त्यांची भौतिकीचे प्रध्यापक म्हणून नेमणूक झाली. या कॉलेजाचेच १९०० साली बर्मिंगहॅम विद्यापीठात रूपांतर झाल्यावर पॉयंटिंग यांची तेथील विज्ञान शाखेच्या मुख्यधिकारी पदावर नेमणूक झाली व याच पदावर त्यांनी पुढे १२ वर्षे काम केले.

गुरूत्वाकर्षण स्थिरांक [⟶गुरूत्वाकर्षण] व पृथ्वीची सरासरी घनता काढण्यासाठी त्यांनी सु. १२ वर्षे प्रयोग करून त्यासंबंधी १८९३ मध्ये एक महत्त्वाचा निबंध प्रसिध्द केला. या निबंधाकरिता त्यांना अडम्स पारितोषिकाचा बहुमान मिळाला. या प्रयोगात त्यांनी दांडीचा तराजू वापरला व अचूक वजन करण्याच्या तंत्रातही सुधारणा केल्या. विद्युत् चुंबकिय क्षेत्रातील ऊर्जेच्या संक्रमणाविषयी १८४४ मध्ये प्रसिध्द केलेल्या निबंधात त्यांनी त्यांच्या नावाने प्रसिध्द असलेले प्रमेय मांडले. याच प्रमेयात उदभवणारा सदिश (महत्ता व दिशा असणारी राशी) ‘पॉयंटिग सदिश’ या नावाने ओळखण्यात येतो. हे प्रमेय मांडण्यासाठी त्यांनी मॅक्सवेल यांच्या विद्युत चुंबकीय क्षेत्र सिध्दांताचा उपयोग केलेला होता. विद्यूत प्रवाह आणि सभोवतालच्या क्षेत्रातील विद्यूत व चुंबकीय प्रवर्तन या विषयांवर १८८८ मध्ये पॉयंटिंग यांनी लिहिलेला निबंधही महत्त्वाचा गणला जातो. प्रारणाचा (तरंगरूपी ऊर्जेचा) दाब,⇨तर्षण आणि घन द्रव अवस्थांतील प्रावस्था संक्रमण [⟶प्रावस्था नियम ] या विषयांतही त्यांनी महत्त्वाचे सैध्दांतिक कार्य केले.

रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून १८८८ मध्ये त्यांची निवड झाली. १९१०-११ मध्ये ते रॉयल पदक (१९०५) व केंब्रिज फिलॉसॉफिकल सोसायटीचे हॉपकिन्स पारितोषिक हे बहुमान मिळाले. ते बर्मिंगहॅम येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.