ॲबे, अर्न्स्ट : (२३ जानेवारी १८४० – १४ जानेवारी १९०५). जर्मन भौतिकीविज्ञ, प्रकाशकीविषयक महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म आयसेनाख, थुरिंजिया येथे झाला व शिक्षण गटिंगेन व येना येथे झाले. येना विद्यापीठात १८७० मध्ये भौतिकीचे प्राध्यापक व नंतर तेथील वेधशाळेचे ते मुख्याधिकारी होते. कार्ल झाइस व शॉट यांच्या समवेत प्रकाशीय उपकरणांना उपयुक्त असणाऱ्या काचेचे व उत्तम प्रतीच्या भिंगांचे उत्पादन करण्याच्या पद्धतीत त्यांनी आपल्या प्रयोगांद्वारे अनेक सुधारणा केल्या. सूक्ष्मदर्शकाच्या वस्तुभिंगाचे (निरीक्षण करावयाच्या पदार्थाजवळील भिंगाचे) केंद्रांतर (भिंगाच्या प्रधान केंद्राचे भिंगापासून अंतर) मोजण्यासाठी त्यांनी ‘फोकोमीटर’ हे उपकरण शोधून काढले.

‘ॲबे प्रणमनांकमापक’ हे उपकरण त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे. [→प्रणमनांकमापन]. कॅमेरे व सूक्ष्मदर्शक यांच्या भिंगांतही त्यांनी बर्‍याच सुधारणा केल्या. ऊष्मीय प्रसरणाचे सूक्ष्ममापन करण्यासाठी त्यांनी फीझो यांच्यासमवेत ‘ॲबे-फीझो द्रवप्रसारमापक’ हे उपकरण तयार केले. ते येना येथे मृत्यू पावले.

भदे, व. ग.