टॉम्पसन, सर बेंजामिन :(काउंट फोन रम्फर्ड २६ मार्च १७५३–२१ ऑगस्ट १८१४). ब्रिटिश-अमेरिकन शास्त्रज्ञ. उष्णतेसंबंधीच्या संशोधनाकरिता विशेष प्रसिद्ध. त्यांचा जन्म वूबर्न (मॅसॅचूसेट्स) येथे झाला. त्यांचे पारंपरिक असे फारसे शिक्षण झाले नाही. तथापि त्यांच्या उद्योगप्रिय व चिकाटीच्या स्वभावामुळेच त्यांना शास्त्रीय संशोधन करणे शक्य झाले. सेलेम येथे १७७६ मध्ये त्यांनी मालाच्या वखारीत उमेदवारी करण्यास सुरुवात केली व तेथेच त्यांना रसायनशास्त्रात व यांत्रिक प्रयोगांत गोडी निर्माण झाली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांशी सहकार्य केल्यामुळे १७७६ मध्ये त्यांना अमेरिका सोडून लंडनला यावे लागले व तेथे त्यांना परराष्ट्र खात्यात नोकरी मिळाली. चार वर्षांतच बढती मिळून ते खात्याचे उपसचिव झाले. या काळातही त्यांनी बंदुकांची रचना, बंदुकीच्या दारूच्या स्फोटात निर्माण होणारी प्रेरणा, सागरी संदेशवहन पद्धती इ. बाबतींत विशेष रस घेतला. १७८१ साली त्यांची रॉयल सोसायटीचे सदस्य म्हणून निवड झाली.

त्यानंतर काही काळ त्यांनी ऑस्ट्रियात व बव्हेरियात नोकरी पतकरली. बव्हेरियात त्यांनी सैन्याची पुनर्घटना करण्यास व औद्योगिक कामगारांची परिस्थिती सुधारण्यास मदत केली. तसेचफिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स या नियतकालिकात कित्येक निबंधही लिहिले. त्याच वेळी इंग्लंडचे राजे तिसरे जॉर्ज यांनी त्यांना ‘नाइट’ हा किताब दिला व ब्रिटिश सरकारच्या परवानगीने त्यांनी म्यूनिक येथे अकरा वर्षे बव्हेरियन सरकारच्या नागरी व लष्करी खात्यांत नोकरी केली. १७९३ मध्ये बव्हेरियाच्या राजांनी टॉम्पसन यांना ‘काउंट’ हा किताब दिला व त्यांनी आपल्या पत्नीच्या कुटुंबियांच्या अमेरिकेतील रम्फर्ड या गावावरून रम्फर्ड हे पद धारण केले.

टॉम्पसन १७९५ साली इंग्लंडला परत आले व तेथे इमारती गरम ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शेकोट्या व धुराच्या चिमण्या यांसंबंधी संशोधन करून त्यांच्या बांधकामाकरिता त्यांनी उपयुक्त सूचना केल्या. १७९८ मध्ये त्यांनी घर्षणामुळे उत्पन्न होणाऱ्या उष्णतेसंबंधीचा आपला सुप्रसिद्ध निबंध रॉयल सोसायटीपुढे मांडला. ‘उष्णता ही गतीमुळे निर्माण होते’ हा क्रांतिकारक विचार मांडून त्यांनी ‘उष्णता हा भौतिक पदार्थ आहे’ (कॅलरिक सिद्धांत) ह्या त्या काळच्या प्रचलित विचारास मोठा विरोध केला [⟶ उष्णता]. पदार्थांचे बल, बंदुकीच्या दारूची स्फोटक प्रेरणा व प्राक्षेपिकी (दारूच्या साहाय्याने क्षेपित केलेल्या वस्तूच्या गतीसंबंधीचे शास्त्र) यासंबंधीच्या त्यांच्या संशोधनामुळे तोफखान्यांमध्ये बरीच सुधारणा झाली.

टॉम्पसन यांनी जोसेफ बँक्स यांच्या सहकार्याने १७९९ मध्ये रॉयल इन्स्टिट्यूशनची योजना आखली व तिची स्थापना करण्यास मदतही केली. त्यांनी रॉयल सोसायटीचे रम्फर्ड पदक सुरू केले व त्याचा त्यांनाच पहिला बहुमान मिळाला. तसेच अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेस या संस्थेचे रम्फर्ड पदक व हार्व्हर्ड विद्यापीठातील रम्फर्ड प्राध्यापकपद त्यांनी सुरू केले. त्यांचे संपूर्ण शास्त्रीय कार्य अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्‌स अँड सायन्सेसने १८७०–७५ मध्ये प्रसिद्ध केले. १८०४ साली त्यांनी पॅरिसला प्रयाण केले. पॅरिसजवळील ओटई येथे ते मृत्यू पावले.

भदे, व. ग.