बोटे, व्हाल्टर व्हिल्हेल्म गेओर्ख फ्रांट्स : [८ जानेवारी १८९१ – २ ऑगस्ट (८ फेब्रुवारी ?) १९५७]. जर्मन भौतिकीविज्ञ. विश्वकिरण (बाह्य अवकाशातून पृथ्वीवर येणारे अतिशय भेदक किरण) व अणुकेंद्रीय भौतिकी यांच्या अभ्यासात उपयुक्त असणारी महत्त्वाची तंत्रे त्यांनी विकसित केली. मूलकण मोजण्यासाठी त्यांनी हान्स गायगर यांच्या सहकार्याने संपात पद्धतीचा [एकाच वेळी नोंद करणाऱ्या पद्धतीचा ⟶ कण अभिज्ञातक] शोध लावला आणि तिचा उपयोग करून महत्त्वाचे शोध लावले. या कार्याबद्दल त्यांना १९५४ सालच्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचा ⇨ माक्स बोर्न   यांच्या समवेत बहुमान मिळाला.

बोटे यांचा जन्म बर्लिनजवळील ओरान्यबुर्कला झाला. १९०८-१२ मध्ये बर्लिन विद्यापीठात शिक्षण घेतल्यावर माक्स प्लांक यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून १९१४ मध्ये त्यांनी डॉक्टरेट पदवी मिळविली. पहिल्या महायुद्धात त्यांना रशियनांनी कैद केले व सायबीरियात एक वर्ष कैदेत घालविल्यावर १९२० मध्ये त्यांना जर्मनीत परत धाडण्यात आले. कैदेत असताना त्यांनी गणित व रशियन भाषा यांचा विशेष अभ्यास केला. १९१३-३० या काळात (युद्धकाळातील लष्करी सेवेखेरीज) त्यांनी बर्लिन येथील सरकारी फिजिकल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये काम केले व तेथे ते प्राध्यापक झाले. १९३० मध्ये गीसेन विद्यापीठात भौतिकीचे प्राध्यापक व तेथील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे संचालक म्हणून त्यांची नेमणूक झाली. नंतर १९३२ साली ते हायडल्‌बर्ग विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सचे संचालक झाले. १९३४ मध्ये तेथील कैसर व्हिल्हेल्म इन्स्टिट्यूट (मागाहून माक्स प्लांक इन्स्टिट्यूट) फॉर मेडिकल रिसर्चमधील इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्सच्या संचालकपदावर त्यांची नेमणूक झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर १९४६ पासून मृत्यूपावेतो त्यांनी हायडल्‌बर्ग विद्यापीठात भौतिकीच्या अध्यासनावरही काम केले.

फिजिकल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये गायगर यांच्या बरोबर संशोधन करून १९२४ मध्ये बोटे यांनी आपली संपात पद्धत प्रसिद्ध केली. ही पद्धत दोन अगर अधिक गायगर गणित्रांमधून [⟶ कण अभिज्ञातक] एकच कण गेल्यास प्रत्येक गणित्रात उत्पन्न होणारे स्पंद कालदृष्ट्या व्यवहारतः संपाती असतात (एकाच वेळी उत्पन्न होतात) या तत्त्वावर आधारित आहे. प्रत्येक गणित्रातील स्पंद मग एका संपाती विद्युत् मंडलाकडे पाठविले जातात व त्यावर कालदृष्ट्या संपाती असलेले स्पंद दर्शविले जातात. संपात पद्धतीने मांडलेली गायगर गणित्रे दिलेल्या एका दिशेतील कण निवडतात आणि ही पद्धत (उदाहरणार्थ) विश्वकिरणांचे कोनीय वितरण मोजण्यासाठी वापरता येते. बोटे यांनी ही पद्धत अणुकेंद्रिय भौतिकीतील एक खर्वांश सेकंदापेक्षा अल्प कालखंड मोजण्यासाठी तसेच विश्वकिरण, ⇨कॉम्पटन  परिणाम  व भौतिकीतील इतर समस्यांचा अभ्यास करण्याकरिता यशस्वी रीत्या वापरली. ही पद्धत पुढे अणुकेंद्रीय विक्रियांकरिताही वापरण्यात आली आणि त्यावरून विक्रियेतील ऊर्जा व अणुकेंद्रीय द्रव्यमाने अचूक रीत्या मोजणे शक्य झाले.

बोटे आणि गायगर यांनी प्रकाशकिरणांचे लघुकोनात प्रकीर्णन (विखुरणे) होण्यासंबंधीच्या संकल्पनेचे स्पष्टीकरण देऊन प्रकीर्णन प्रक्रियांच्या आधुनिक विश्लेषण पद्धतींचा पाया घातला. १९२३-२६ या कालखंडात बोटे यांनी प्रकाशाच्या कणरूप सिद्धांताविषयी प्रायोगिक व सैद्धांतिक अभ्यास केला. कॉम्पटन परिणामाचा शोध लागण्यापूर्वी काही महिने अगोदर हायड्रोजनाने भरलेल्या विल्सन बाष्पकोठीत [⟶ कण अभिज्ञातक] क्ष-किरणांच्या प्रत्यागती इलेक्ट्रॉनांचे लघू मार्ग बोटे यांना आढळले होते आणि त्यांनी प्रकाशाच्या क्रियेने उत्सर्जित होणाऱ्या इलेक्ट्रॉनांच्या दिशेवर अधिक संशोधनही केले. गायगर व बोटे यांनी कॉम्पटन परिणामाची नील्स बोर, एच्. ए. क्रॅमर्स आणि जे.सी. स्लेटर यांच्या सिद्धांताशी सांगड घातली. या त्यांच्या कार्यामुळे प्रकाशाच्या कणरूप सिद्धांताला मजबूत आधार मिळण्याबरोबरच आणवीय स्तरावरील ऊर्जेच्या अक्षय्यतेच्या मूलभूत तत्त्वाची [⟶ द्रव्य आणि ऊर्जा यांची अक्षय्यता] व्यापकता सिद्ध झाली.

बोटे यांनी १९२७ मध्ये आल्फा किरणांच्या [⟶ किरणोत्सर्ग] भडिमाराने हलक्या मूलद्रव्यांच्या होणाऱ्या रुपांतरणाचा अभ्यास करण्यास प्रारंभ केला. या भडिमारामुळे तयार होणाऱ्या भंजन (अणुकेंद्र फुटल्यामुळे तयार होणाऱ्या) उत्पादांचे अस्तित्व फक्त चमकांद्वारे डोळ्यांना जाणवत असे. बोटे यांनी एच्. फ्रांट्स यांच्या सहकार्याने विकसित केलेल्या गणित्रात या भंजन उत्पादांची संख्या दर्शक काट्याद्वारे दाखविणे शक्य होऊ लागले. १९२९ मध्ये डब्ल्यू. कोल हॉर्स्टर यांच्या सहकार्याने बोटे यांनी सोयीस्कर रीतीने मांडणी केलेल्या गायगर गणित्रांतून विश्वकिरण जाऊ देऊन त्यांचा अभ्यास करण्याची नवीन पद्धत प्रचारात आणली. या पद्धतीचा उपयोग करून त्यांनी विश्वकिरण हे केवळ भेदक गॅमा किरणांचे बनलेले नसून त्यांत भेदक विद्युत् भारित कणही असतात. असे दाखवून दिले तसेच पृथक् किरणांचे मार्गही निर्धारित केले. १९३० साली एच्. बेकर यांच्या सहकार्याने बोटे यांनी बेरिलियमावर (आणि त्यानंतर बोरॉन व लिथियम या मूलद्रव्यांवरही) पोलोनियमापासून उत्सर्जित होणाऱ्या आल्फा किरणांचा भडिमार करून रेडियमापासून मिळणाऱ्या अती भेदक गॅमा किरणांपेक्षाही अधिक भेदक असलेले प्रारण (तरंगरुपी ऊर्जा) मिळविले आणि यावरूनच पुढे १९३२ मध्ये सर जेम्स चॅडविक यांनी न्यूट्रॉन या मूलकणांचा शोध लावला. जर्मनीतील पहिला सायक्लोट्रॉन [⟶ कणवेगवर्धक] बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली १९४४ मध्ये उभारण्यात आला. १९३९-४५ या युद्धकाळात त्यांनी न्यूट्रॉनांचा विसरण (उत्स्फूर्त गती व प्रकीर्णन) सिद्धांत व त्याविषयीची मापने यांवर संशोधन केले. जर्मनीच्या अणुकेंद्रीय ऊर्जेसाठी आयोजित केलेल्या युरेनियम प्रकल्पातील ते एक अग्रेसर शास्त्रज्ञ होते.

बोटे हायडल्‌बर्ग व गटिंगेन येथील ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसचे सदस्य होते. नोबेल पारितोषिकाखेरीज त्यांना माक्स प्लांक पदक, राष्ट्रसेवेसाठी ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर इ. बहुमान मिळाले. त्यांचे बहुतेक सर्व शास्त्रीय निबंध Zeitschrift fur Physik  या नियतकालिकात प्रसिद्ध झाले. ते हायडल्‌बर्ग येथे मृत्यू पावले.  

भदे, व. ग.