गॅबर, डेनिस: (५ जून १९००– ). ब्रिटिश भौतिकीविज्ञ, १९७१ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे विजेते. ⇨होलोग्राफी (भिंगरहित त्रिमितीय छायाचित्रण) तंत्राचे जनक. त्यांचा जन्म हंगेरीतील बूडापेस्ट येथे झाला. त्यांचे शिक्षण बूडापेस्ट व बर्लिन येथील तांत्रिक विद्यालयांत झाले. सिमेन्स कंपनीत १९२७–३३ या काळात त्यांनी संशोधक अभियंता म्हणून काम केले. हिटलर यांच्या कारकीर्दीत १९३३ मध्ये ते ब्रिटनला गेले व तेथे १९३४–४८ या काळात टॉमसन-ह्यूस्टन कंपनीत त्यांनी संशोधक अभियंता म्हणून काम केले. १९४८–५८ मध्ये ते लंडन विद्यापीठाच्या इंपिरियल कॉलेज ऑफ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिकी विभागात प्रपाठक होते. याच संस्थेत ते १९५८ पासून अनुप्रयुक्त इलेक्ट्रॉनिकीचे प्राध्यापक आहेत.

गॅबर यांचा होलोग्राफीचा शोध नेचर  या नियतकालिकात १९४८ मध्ये पत्ररूपाने प्रसिद्ध झाला होता. मूलतः होलोग्राफीच्या साहाय्याने नवीन सूक्ष्मदर्शीय तंत्र उपलब्ध होईल या हेतूने त्यांनी ही कल्पना मांडलेली होती. तथापि तांत्रिक अडचणींमुळे ही कल्पना १९६० पर्यंत प्रत्यक्षात येऊ शकली नाही. त्यानंतर ⇨लेसरच्या  शोधामुळे कलासंबद्ध (ज्यातील तरंगांच्या कलांचा परस्परसंबंध ठराविक कालावधीत कायम असतो अशा कला म्हणजे तरंगाची एखाद्या स्वेच्छ संदर्भ बिंदूपासून मोजण्यात येणारी स्थिती) प्रकाश किरणांचा उद्‍गम उपलब्ध झाला व त्यामुळे होलोग्राफीचे तंत्र प्रत्यक्षात आलेले आहे. वेगवान बदल घडून येणाऱ्या विविध घटनांचे चित्रण करून त्यांचा तपशीलवार अभ्यास करणे, अल्प जागेत माहितीचा संचय करणे इ. विविध संशोधनांत या तंत्राचा आता उपयोग होत आहे. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाची विभेदनक्षमता (निकट वस्तूंच्या प्रतिमा अलग करण्याची क्षमता) सुधारण्यासाठीही त्याचा उपयोग होत आहे.

गॅबर यांनी क्षणिक विद्युत् प्रवाह (विद्युत् दाब अचानक वाढल्यामुळे निर्माण होणारा प्रवाह), वायू विसर्जन (विद्युत् भारित अणू वा रेणू म्हणजे आयन तयार झाल्यामुळे वायूतून विद्युत् प्रवाह वाहणे), इलेक्ट्रॉन गतिकी (गतिविज्ञान), संदेशवहन सिद्धांत आणि भौतिकीय प्रकाशकी (विवर्तन, व्यतिकरण इ. प्रकाशीय आविष्कारांचा तरंगगतीनुसार अभ्यास करणारे शास्त्र) या विषयांवर सु. १०० संशोधनपर निबंध लिहिलेले असून त्यांचे द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप (१९४६), इलेक्ट्रॉनिक इन्व्हेन्शन्स अँड देअर इंपॅक्ट ऑन सिव्हिलायझेशन (१९५९), इन्व्हेटिंग द फ्यूचर (१९६३) व इन्व्हेन्शन्स, सायंटिफिक, टेक्‍नॉलॉजीकल अँड सोशल (१९७०) व द मॅच्युअर सोसायटी (१९७२) हे ग्रंथ प्रसिद्ध झालेले आहेत. १९५६ साली त्यांची रॉयल सोसायटीच्या सदस्यत्वावर निवड झाली. सोसायटीने १९६८ मध्ये त्यांना रम्फर्ड पदकाचा बहुमान दिला. ते हंगेरियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, अमेरिकेची नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस इ. अनेक संस्थांचे सन्माननीय सदस्य असून टॉमस यंग पदक (१९६७), मायकेलसन पदक (१९६८) इ. अनेक बहुमान त्यांना मिळालेले आहेत.

भदे, व. ग.