कूश, पॉलिकार्प : (२६ जानेवारी १९११ — ). अमेरिकन भौतिकीविज्ञ. १९५५ च्या भौतिकीच्या नोबेल पारितोषिकाचे सहविजेते. त्यांचा जन्म जर्मनीतील ब्‍लँकेनबर्ग येथे झाला. ते एक वर्षाचे असतानाच त्यांना अमेरिकेस प्रयाण करावे लागले. क्लीव्हलँड येथील केस इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी व इलिनॉय विद्यापीठ येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रकाशीय रेणवीय वर्णपटविज्ञानासंबंधी इलिनॉय विज्ञान विद्यापीठात व द्रव्यमान वर्णपटविज्ञानासंबंधी मिनेसोटा विद्यापीठात संशोधन केले [→ द्रव्यमान वर्णपटविज्ञान वर्णपटविज्ञान]. १९३७ साली कोलंबिया विद्यापीठात त्यांची नेमणूक झाली. दुसऱ्‍या महायुद्धात त्यांनी वेस्टिंगहाऊस, बेल टेलिफोन लॅबोरेटरी व कोलंबिया विद्यापीठ येथे सूक्ष्मतरंग जनित्रासंबंधी संशोधन केले. १९४६ पासून ते कोलंबिया विद्यापीठातच अध्यापनाचे कार्य करीत आहेत.

इझीडोर राबी यांनी कोलंबिया विद्यापीठात रेणवीय शलाका पद्धतीने आणवीय, रेणवीय व अणुकेंद्रीय गुणधर्मांसंबंधी केलेल्या संशोधनात कूश यांनी महत्त्वाचे सहकार्य केले. राबी, नेल्सन व  नेफ यांनी १९४७ मध्ये हायड्रोजनामधील इलेक्ट्रॉनाच्या असंगत व अतिसूक्ष्म परस्परक्रियेचा शोध लावला. अणु-शलाकेच्या साहाय्याने कूश यांनी निरनिराळ्या अणूंतील झीमान परिणामाचा अभ्यास करून इलेक्ट्रॉनाच्या असंगत गुणधर्मांचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यानंतर १९५२ मध्ये त्यांनी हायड्रोजनामधील इलेक्ट्रॉनाच्या चुंबकीय परिबलाचे (एखाद्या अक्षाभोवती फिरण्याच्या क्षमतेचे) व अतिसूक्ष्म परस्परक्रियांचे अचूक मापन केले. या त्यांच्या कार्याबद्दल विलिस लँब यांच्याबरोबर कूश यांना १९५५ च्या नोबेल पारितोषिकाचा बहुमान मिळाला. रेडिओ कंप्रता (दहा सहस्र हर्ट्‌झ ते सु. ३०० दशलक्ष हर्ट्‌झ मर्यादेत कंप्रता म्हणजे दर सेकंदास होणारी कंपन संख्या असलेल्या, हर्ट्‌झ हे कंप्रतेचे एकक आहे) शलाका तंत्राच्या साहाय्याने त्यांनी अनेक आणवीय, रेणवीय आणि अणुकेंद्रीय गुणधर्मांचे अत्यंत अचूक व खात्रीलायक मापन केलेले आहे.

फिजिकल रिव्ह्यू  व इतर शास्त्रीय नियतकालिकांतून त्यांचे शास्त्रीय निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. १९५६ साली अमेरिकेच्या नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेसच्या सदस्यत्वावर त्यांची निवड झाली.

भदे, व. ग.