हिग्ज, पीटर वेर : (२९ मे १९२९). ब्रिटिश सैद्धांतिक भौतिकीविद. मूलकण भौतिकीमधील एका यंत्रणेचा सैद्धांतिक शोध लावल्याबद्दल त्यांना २०१३ सालचे भौतिकीचे नोबेल पारितोषिकफ्रांस्वा एंग्लर्ट यांच्याबरोबर विभागून देण्यात आले. अणूपेक्षा आकारमानाने लहान अशा मूलकणांना असलेल्या द्रव्यमानाची उत्पत्ती जाणून घेण्यासाठी या हिग्ज यंत्रणेची मदत झाली आहे. हिग्ज यांच्या या शोधाची खातरजमा ⇨ सेर्न या संस्थेमध्ये ४ जुलै २०१२ रोजी झाली. कारण त्या दिवशी हिग्ज यांनी भाकीत केलेल्या ⇨ हिग्ज-बोसॉन मूलकणा सारख्या सु. १२६ गिगॅइलेक्ट्रॉन-व्होल्ट (ॠशत) या द्रव्यमानाच्या पल्ल्यातील मूलकणाचा शोध सेर्न या संस्थेच्या लार्ज हेड्रॉन कोलायडर या ⇨ कणवेगवर्धकातील प्रयोगांद्वारे लागला. अर्थात या मूलकणाच्या अपेक्षित गुणधर्मांची खातरजमा केली जात आहे. 

 

हिग्ज यांचा जन्म न्यूकॅसल अपॉन टाईन (इंग्लंड) येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. १९४१–४६ दरम्यान त्यांनी ब्रिस्टल येथील कोथॅम ग्रामर स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. तेथे असताना हिग्ज यांना त्याच शाळेचे विद्यार्थी आणि ⇨ पुंजयामिकी या विद्याशाखेचे संस्थापक ⇨ पॉल एड्रिएन मॉरिस डिरॅक यांच्या संशोधनातून स्फूर्ती मिळाली. त्यानंतर हिग्ज यांनी सिटी ऑफ लंडन स्कूलमध्ये गणिताचे विशेष शिक्षण घेतले (१९४६). लंडनच्या किंग्ज कॉलेजात दाखल झाल्यानंतर (१९४७) त्यांनी भौतिकीमधील पदवी (१९५०) प्रथम वर्गात आणि पदव्युत्तर पदवी (१९५२) संपादन केल्या. त्यांना १९५१ रॉयल कमिशनकडून संशोधन शिष्यवृत्ती मिळाली होती. १९५४ मध्ये त्यांनी पीएच्.डी. पदवी मिळविली. ‘सम प्रॉब्लेम्स इन थिअरीऑफ मॉलेक्यूलर व्हायब्रेशन्स’ (रेणवीय कंपनांच्या सिद्धांतातील काही समस्या) हे त्यांच्या पीएच्.डी. प्रबंधाचे शीर्षक होते. १९५४–५६ दरम्यान ते एडिंबरो विद्यापीठात वरिष्ठ संशोधन छात्र होते. नंतर त्यांनीलंडन येथील इम्पिरीअल कॉलेज व युनिव्हर्सिटी कॉलेज या ठिकाणीविविध पदांवर काम केले. तेथे ते अल्पकाळ गणिताचे व्याख्याते होते (१९५८–६०). १९६० मध्ये एडिंबरोला परत आल्यावर एडिंबरो विद्या-पीठात ते १९७० मध्ये प्रपाठक आणि १९८० मध्ये सैद्धांतिक भौतिकीचे प्राध्यापक झाले. १९९६ मध्ये सेवानिवृत्त झाल्यावर ते एडिंबरो विद्यापीठात गुणश्री प्राध्यापक झाले.  

पीटर वेर हिग्ज
 

 

हिग्ज यांना एडिंबरोला असताना द्रव्यमानाविषयी कुतूहल निर्माण झाले होते. जेव्हा विश्वाची सुरुवात झाली तेव्हा मूलकणांना द्रव्यमान नव्हते आणि नंतर सेकंदाच्या अल्प भागात एका सैद्धांतिक क्षेत्राशी त्यांची परस्परक्रिया होऊन मूलकणांना द्रव्यमान प्राप्त झाले, ही कल्पना हिग्ज यांनी १९६४ मध्ये मांडली. या क्षेत्राला नंतर ‘हिग्ज क्षेत्र’ हे नाव देण्यात आले. हे क्षेत्र अवकाशात पसरले असून त्याच्याशी परस्परक्रिया करणाऱ्या सर्व मूलकणांना द्रव्यमान प्राप्त होते, हे त्यांनी मांडलेले गृहीततत्त्व आहे. हिग्ज यंत्रणेत हिग्ज क्षेत्र गृहीत धरले असून ते क्वार्क व लेप्टॉन या मूलकणांना द्रव्यमान देते, असेही यात गृहीत धरलेले आहे. हिग्ज यंत्रणा या नावाने ओळखण्यात येणारी ही सैद्धांतिक प्रतिकृती त्यांनी एका शोधनिबंधात विशद केली होती. त्यांचा हा शोधनिबंध सेर्न (स्वित्झर्लंड) येथे संपादित होणाऱ्या फिजिक्स लेटर्स या यूरोपातील भौतिकीविषयीच्या आघाडीच्या ज्ञानपत्रिकेत छापायला संपादकाने नकार दिला होता (उघडपणे हा लेख भौतिकीच्या संदर्भात अप्रस्तुत आहे, असे त्या संपादकांना वाटले होते) . एक जादा परिच्छेद लिहून हा शोधनिबंध हिग्ज यांनी फिजिकल रिव्ह्यू लेटर्स या भौतिकीच्या दुसऱ्या आघाडीवरील ज्ञानपत्रिकेकडे पाठविला व त्यात तो १९६४ सालाच्या शेवटी प्रसिद्ध झाला. या लेखात द्रव्यमानयुक्त शून्य परिवलन असलेल्या नवीन बोसॉन मूलकणाचे त्यांनी भाकीत केले होते. आता याला हिग्ज-बोसॉन मूलकण म्हणतात. रॉबर्ट ब्राऊट व फ्रांस्वा एंग्लर्ट, तसेच जेरल्ड गुरॅल्निक, सी. आर्. हागेन व टॉम किबल हे भौतिकीविदही याच सुमारास अशाच निष्कर्षापर्यंत आले होते. प्रसिद्ध झालेल्या लेखात हिग्ज यांनी ब्राऊट व एंग्लर्ट यांच्या लेखनाचा उल्लेख केला होता. प्रमाणभूत प्रतिकृती (स्टँडर्ड मॉडेल) हा मूलकण व त्यांच्या परस्परक्रिया या विषयाचा सिद्धांत आहे आणि हिग्ज यंत्रणा व हिग्ज-बोसॉन मूलकण हे या प्रतिकृतीचे आवश्यक घटक मानले जातात. 

 

हिग्ज हे काही काळ कॅम्पेन फॉर न्यूक्लिअर डिसअर्मामेंटचे सक्रिय सदस्य होते. तसेच त्यांनी ॲसोसिएशन ऑफ युनिव्हर्सिटी टीचर्स या संघटनेसाठी काम केले आहे. चालणे, पोहणे आणि संगीतश्रवण हे त्यांच्या आवडीचे छंद आहेत. 

 

हिग्ज यांना पुढील अनेक मानसन्मान मिळाले आहेत : ह्यूजेस पदक( रॉयल सोसायटी, १९८१), रदरफर्ड पदक (इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, १९८४), डिरॅक पदक व पारितोषिक (इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, १९९७), हाय एनर्जी अँड पार्टिकल फिजिक्स पारितोषिक (यूरोपियन फिजिकल सोसायटी, १९९७), भौतिकीचे वुल्फ पारितोषिक (२००४), ऑस्कर क्लीन स्मृती व्याख्यान पदक (रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, २००९), जे. जे. साकुराई पारितोषिक (अमेरिकन फिजिकल सोसायटी, २०१०), एडिंबरो पुरस्कार (२०११), हिग्ज पदक (रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो, २०१२), नोमिनो पारितोषिक आणि एडिंबरो पदक (२०१३). यांशिवाय रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो व रॉयल सोसायटी ऑफ लंडन (१९८३), इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (१९९१), किंग्ज कॉलेज, लंडन (१९९८) व स्वान्झी युनिव्हर्सिटी (२००८) यांचे ते फेलो होते. तसेच ब्रिस्टल (१९९७), एडिंबरो (१९९८), ग्लासगो (२००२), हेरियट वॉल्ट (२०१२), डर्बन (२०१३), मँचेस्टर (२०१३) आणि युनिव्हर्सिटी ऑफ सेंट अँड्रज (२०१४) या विद्यापीठांच्या सन्माननीय पदव्या त्यांना मिळाल्या आहेत. १९९९ मध्ये मिळालेला ‘सर’ किताब त्यांनी नाकारला, मात्र ‘द ऑर्डर ऑफ द कम्पॅन्यन ऑनर’चे सदस्यत्व त्यांनी २०१४ मध्ये स्वीकारले. यांव्यतिरिक्त एडिंबरो विद्यापीठाने हिग्ज सेंटर फॉर थिऑरेटिकल फिजिक्स हे त्यांचे नाव दिलेले नवीनसंशोधन केंद्र स्थापन केल्याची घोषणा केली. हे केंद्र सैद्धांतिक भौतिकीतील संशोधनाची पुष्टी करणार आहे, तसेच ‘विश्वाचे कार्य कसे चालते हे अधिक सखोलपणे जाणून घेण्यासाठी’ हे केंद्र जगभरातील भौतिकीविदांना एकत्र आणणारे आहे. 

 

हिग्ज हे निरीश्वरवादी आहेत. हिग्ज-बोसॉन मूलकणासाठी वापरण्यात येणाऱ्या गॉड पार्टिकल (देवकण) यापर्यायी शब्दाबद्दलची नापसंतीहिग्ज यांनी नंतर व्यक्त केली. कारण त्यांना वाटते की, ‘धार्मिक वृत्तीचे लोक यामुळे चिडू शकतील ‘. या पर्यायी नावाचे श्रेय बहुधा ⇨ लीऑन मॅक्स लेडरमन यांना दिले जाते. लेडरमन यांच्या पुस्तकाचे शीर्षक द गॉड पार्टिकल : इफ द युनिव्हर्स इज द आन्सर, व्हॉट इज द क्वेश्चन ⇨ हे आहे. मात्र प्रकाशकाच्या आग्रहापोटी त्यांनी हे पर्यायी नाव वापरलेले दिसते. मुळात त्याचा उल्लेख ‘गॉडडॅम पार्टिकल’ (अतिशय गुंतागुंतीचा किंवा आगळावेगळा कण) असा करण्याचा लेडरमन यांचा इरादा होता. कदाचित ख्रिश्चन धर्माच्या दृष्टीने ‘डॅम’ हा शब्द निषिद्ध असल्याने तो गाळल्याने ‘गॉड पार्टिकल’ असा शब्द राहिला. स्वतः हिग्ज विनयशील असल्याने त्यांना हिग्ज-बोसॉन असा उल्लेख करायलाही संकोच वाटतो. मात्र देवकणाविषयीचा त्यांचा तिटकारा पाहता, ते हिग्ज-बोसॉन असा उल्लेख करायला आक्षेप घेणार नाहीत. 

 

पहा : कणवेगवर्धक मूलकण सेर्न हिग्ज-बोसॉन मूलकण. 

ठाकूर, अ. ना.