आ. १. जोशी परिणाम दर्शविणारा आलेख : (१) अंधार असतानाचा विद्युत् प्रवाह (i1 ), (2) प्रकाशझोत टाकवल्यावर वाहणारा विद्युत् प्रवाह (i2).विद्युत् प्रकाशकी परिणाम : वायूमधून विजेचा प्रवाह वाहण्याच्या क्रियेला वायूमधील विद्युत् विसर्जन म्हणतात. वायूचा दाब खूप कमी आणि विद्युत् दाब पुष्कळ असला, तरच असे विसर्जन होऊ शकते. इलेक्ट्रॉन (विजेचा प्रवाह) व वायूचे रेणू यांच्यातील टकरींमुळे आयन (विद्युत् भारित अणू वा रेणू) निर्माण होतात आणि या आयनांच्या हालचालींद्वारे हे विद्युत् विसर्जन होते. विद्युत् विसर्जनाच्या ओझोनीकारक नलिका उपकरणातील (ऑक्सिजनाचे ओझोनामध्ये रूपांतर करणाऱ्या उपकरणातील) वायूचा दाब व विद्युत् दाब हे स्थिर असताना व ती नलिका अंधारात असताना त्यातील विद्युत् प्रवाह विशिष्ट मूल्यावर स्थिर असतो. अशा विद्युत् नलिकेवर प्रकाश झोत पडल्यास त्यातील विद्युत् प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही अथवा झालाच, तर विद्युत् प्रवाह वाढेल अशी सर्वसाधारण समजूत होती. मात्र श्रीधर सर्वोत्तम जोशी यांनी ही समजूत बरोबर नसल्याचे दाखवून दिले. त्यांनी अशा रीतीने प्रकाश टाकल्याने विद्युत् विसर्जन प्रवाह एकदम कमी होऊ शकतो आणि कधीकधी तो वाहीनासा होतो, तसेच या उपकरणाभोवती अंधार केल्यास पूर्वीइतका प्रवाह वाहू लागतो, असे प्रयोगांद्वारे १९३९ साली दाखवून दिले (आ.१), म्हणून या परिणामाला ‘जोशी परिणाम’ असे म्हणतात. या परिणामात नंतरच्या काळात सुधारणा होत गेल्या व तो व्यापकही करण्यात आला. अशा सुधारित व्यापक परिणामाला ‘विद्युत् प्रकाशकी परिणाम’ किंवा ‘प्रकाश-विद्युतीय परिणाम’ असे म्हणतात.

ऑक्सीजन वायूतून दीप्तिमान विद्युत् विसर्जन करून त्याचे ओझोन वायूत रूपांतर करणारी ओझोनकारी नलिका हे असे एक उपकरण आहे. या नलिकेवर प्रकाशझोत टाकल्यास तिच्या विसर्जन प्रवाहावर परिणाम होतो व निळसर  जांभळट द्युती दिसते. याचा अर्थ वायूतून विद्युत् प्रवाह जात असताना त्याच्यावर प्रकाश पडल्यास विद्युत् प्राह कमी होतो. 

आ. २. जोशी परिणाम स्पष्ट करणारी आकृती : (१) दिवा, (२) सरक झाकण , (३) उच्च विद्युत् दाब, (४) विद्युत् प्रवाहमापक, (५) काचेचे पात्र, (६) काचेची ओझोनीकारक विसर्जन नलिका, (७) पाण्यातील मिठाचा विरल विद्राव, (८) कमी दाबाचा वायु, (९) अधातूची अपारदर्शक पेटी.

जोशी यांनी हा शोध अखिल भारतीय विज्ञान परिषदेच्या रसायनशास्त्र विभागाच्या अध्यक्षपदावरून १९४३ साली जाहीर केला. त्यांच्या मते विद्युत् विसर्जनाने पृष्ठशोषक स्तर निर्माण होतो व त्यामधून ⇨प्रकाशविद्युत् निर्माण झाल्याने हा परिणाम होतो. याची खातरजमा करण्यासाठी त्यांनी अनेक वायू वापरले, तसेच दृश्य प्रकाशाप्रमाणे इतर विद्युत् चुंबकीय तरंगही (उदा., जंबुपार–दृश्य वर्णपटातील जांभळ्या रंगाच्या पलीकडील अदृश्य – किरण, क्ष-किरण), तसेच अणुकेंद्रीय प्रारणही (उदा., गॅमा किरण प्रारण म्हणजे तरंगरूपी ऊर्जा) वापरले. हा परिणाम -२०० ते २०० से. या तापमानांदरम्यान आढळला आहे. हा परिणाम सहजपणे समजावा म्हणून त्यांनी एक उपकरण तयार केले होते. त्या उपकरणाची कल्पना आ. २ वरून येईल. या विषयावर त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ३०० पेक्षा जास्त लेख लिहिले आहेत. रासायनिक विक्रियांची गती व यंत्रणा यांविषयीच्या अध्ययनांत त्यांना या संशोधनाचा उपयोग झाला.

विद्युत् प्रकाशकी परिणामावर विविध ठिकाणी संशोधन करण्यात आले असून उच् विद्युत् मंडलांचे नियमन, अत्यल्प कालावधीत होणाऱ्या प्रक्रियांचे अध्ययन इत्यादींसाठी हा परिणाम उपयुक्त ठरू शकेल. अमेरिकेतील नॅशनल ब्यूरो ऑफ स्टँडर्ड्स या संस्थेमार्फत या परिणामाविषयीचे प्रयोग करण्यात आले आहेत. 

 श्रीधर सर्वोत्तम जोशी (१६ ऑक्टोबर १८९८-२४ जुलै १९८४) यांचा जन्म व मृत्यु पुण्यात झाला. त्यांचे शिक्षण पुणे (बी. एस्.,१९२१),बनारस हिंदू विश्वविद्यालय, वाराणसी (एम्. एस्सी., १९२४) व लंडन (डी. एस्सी., १९२८) येथे झाले. त्यांनी बनारस हिंदू विश्वविद्यालयात रसायनशास्त्राचे आचार्य व विभाग प्रमुख आणि तेथील विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य (१९३७-५९) म्हणून काम केले. तेथून सेवानिवृत्त झाल्यावर ते पुण्यात स्थायिक झाले. तेथे १९६८ पर्यंत ते संशोधन करीत होते. अखेरपर्यंत त्यांनी विशेषतः पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना व संशोधकांना मार्गदर्शन केले. वायूमधील विद्युत् विसर्जन हा त्यांच्या संशोधनाचा प्रमुख विषय होता. शिवाय त्यांनी कलिल, विद्युत् रसायनशास्त्र, रासायनिक संश्लेषण इ. विषयांतही संशोधन केले. 

ठाकूर, अ. ना.