केल्व्हिन, बॅरन विल्यम टॉमसन: (२६ जुलै १८२४–१७ डिसेंबर १९०७). ब्रिटिश गणितज्ञ, भौतिकीविज्ञ व अभियंते. उष्णता, विद्युत् शास्त्र व तारायंत्रविद्या या शाखांत विशेष महत्त्वाचे कार्य. त्यांचा जन्म आयर्लंडमधील बेलफास्ट येथे झाला व शिक्षण ग्लासगो व केंब्रिज येथील विद्यापीठांत झाले. १८४५ साली स्मिथ पारितोषिक मिळवून ते रँग्लर झाले. ग्लासगो विद्यापीठात १८४६ मध्ये भौतिकीच्या प्राध्यापकपदावर त्यांची नेमणूक झाली व त्यानंतर ५३ वर्षे त्यांनी याच जागेवर काम केले. 

ऊष्मागतिकीचा (उष्णता व यांत्रिक आणि इतर स्वरूपांतील ऊर्जा यांतील संबंधाचे गणितीय विवरण करणाऱ्या शास्त्राचा) पहिला नियम (म्हणजेच ऊर्जेच्या अविनाशित्वाचा नियम) प्रस्थापित करण्यात हेल्महोल्ट्स यांच्याबरोबरच केल्व्हिन यांनीही पुढाकार घेतला. कार्नो यांच्या आदर्श उष्णता एंजिनासंबंधी अभ्यास करून कोणत्याही तापमापक पदार्थाच्या गुणधर्मावर अवलंबून नसलेला एक सैद्धांतिक तापमान मापक्रम केल्व्हिन यांनी प्रस्थापित केला व तो ‘केल्व्हिन तापमान मापक्रम’ या नावानेच ओळखला जातो[→ केल्व्हिन निरपेक्ष तापक्रम]. १८५१ मद्ये त्यांनी एडिंबरोच्या रॉयल सोसायटीपुढे उष्णतेच्या गत्यात्मक सिद्धांताविषयी एक निबंध मांडला. या निबंधात त्यांनी कार्नो, डेव्ही, जूल व क्लॉसियस यांच्या कार्याचा समन्वय करून ऊष्मागतिकीतील पहिल्या व दुसऱ्या नियमांना अंतिम स्वरूप देण्याचे महत्त्वाचे कार्य केले. ऊर्जा ऱ्हासाचा नियमही त्यांनी याच निबंधात प्रथम मांडला. तापविद्युतासंबंधीच्या (तापमानातील फरकामुळे निर्माण होणाऱ्या विद्युतासंबंधीच्या) त्यांच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या नियमाचा त्यांनी १८५६ साली शोध लावला. 

आंदोलक विद्युत् प्रवाहासंबंधी १८५३ मध्ये केल्व्हिन यांनी एक निबंध लिहून बिनतारी तारायंत्राच्या पुढील विकासाचा सैद्धांतिक पाया घातला. १८५६–६६ या काळात यूरोप आणि अमेरिका या खंडांना अटलांटिक महासागरातून जोडणारी केबल टाकण्याची योजना तयार करण्यात व ती पार पाडण्यात केल्व्हिन यांनी प्रामुख्याने भाग घेतला. या कामाच्या संबंधात त्यांनी केबलद्वारे होणाऱ्या संदेशवहनासंबंधीचा गणितीय सिद्धांत मांडला. तसेच आरशाचा गॅल्व्हानोमीटर, संदेश प्रेषक व पाण्याखालील केबलींमधून दूर अंतरावर संदेश पाठविण्यास आणि क्षीण संदेशांचीही नोंद करण्यास उपयुक्त असलेला वक्रनलिका संदेश-नोंदक ही उपकरणे तयार केली. 

विद्युत् राशींची प्रमाणे निश्चित करण्यासाठी एक समिती नेमावी अशी त्यांनी ब्रिटिश अ‍सोसिएशनला १८६१ साली सूचना केली. एखाद्या संवाहकातून माहीत असलेला प्रवाह नेल्यास उत्पन्न होणाऱ्या उष्णतेचे मापन करून त्यांनी स्वतः विद्युत् रोधाचे निरपेक्ष परिणामातील एकक निश्चित केले. केल्व्हिन यांच्या तारायंत्रासंबंधीच्या कार्यामुळे निरनिराळ्या विद्युत् राशी मोजणारी उपकरणे तयार करण्यास मोठी चालना मिळाली.

केल्व्हिन यांनी १८६६ नंतरच्या काळात नौकानयनासाठी लागणाऱ्या उपकरणांसंबंधी संशोधन केले. पाण्याची खोली अचूकपणे मोजणारे उपकरण, भरती-ओहोटीची पूर्वसूचना देणारे उपकरण, तसेच आवर्त (ठराविक अंतरालाने विशिष्ट स्वरूपाची पुनरावृत्ती होणाऱ्या) वक्रांचे विश्लेषण करणारा हरात्मक विश्लेषक ही उपयुक्त उपकरणे त्यांनी तयार केली [→ हरात्मक विश्लेषण]. यांशिवाय जहाजाच्या चुंबकत्वामुळे होकायंत्राच्या निरीक्षणांत कराव्या लागणाऱ्या दुरुस्त्यांमध्ये सुलभता आणण्याच्या दृष्टीने त्यांनी होकायंत्रात बऱ्याच सुधारणा केल्या (१८७३–१८७८). 

अणूची प्रतिकृती आणि ईथरचे अस्तित्व  यांसंबंधीचे आपले विचार १८८४ मध्ये त्यांनी बॉल्टिमोर विद्यापीठात व्याख्यानांद्वारे मांडले. १८९९ मध्ये सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी बॉल्टिमोर येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठात प्रकाशाच्या तरंग सिद्धांताविषयी संशोधन करून आपल्या १८८४ सालच्या व्याख्यानांची दुरुस्त आवृत्ती १९०४ मध्ये प्रसिद्ध केली. त्याच वर्षी ग्लासगो विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर त्यांची निवड झाली. 

भौतिकीच्या विविध शाखांसंबंधी केल्व्हिन यांनी सु. ३०० विचार प्रवर्तक निबंध लिहिले. हे निबंध फिजिकल पेपर्स (१८८२ – १९११) या शीर्षकाखाली पाच खंडांत प्रसिद्ध झाले. केल्व्हिन यांना त्यांच्या कार्याच्या गौरवार्थ मिळालेल्या बहुमानात ‘नाइट’ हा किताब (१८६६), ‘बॅरन केल्व्हिन ऑफ लार्गझ’ हा अधिकार (१८९२), ‘ऑर्डर ऑफ मेरीट’ (१९०२), रॉयल सोसायटीचे रॉयल पदक (१८५६) आणि कॉप्ली पदक (१८८४) तसेच सोसायटीचे अध्यक्षपद (१८९०–१८९५) हे उल्लेखनीय आहेत. ते लार्गझजवळील नेदर हॉल येथे मृत्यू पावले. 

भदे, व. ग.