टॉमसन, सर जॉर्ज पॅजेट : (३ मे १८९२–  ). ब्रिटिश भौतिकीविज्ञ. मुक्त इलेक्ट्रॉनांच्या कणात्मक वर्तनाबरोबरच त्यांना तरंगांचे गुणधर्मही असतात, असे प्रत्यक्ष प्रायोगिक पद्धतीने त्यांनी सिद्ध केले. सी. जे. डेव्हिसन यांनीही स्वतंत्रपणे हाच निष्कर्ष काढलेला होता, परंतु त्याकरिता निराळे तंत्र वापरले होते. या कार्याबद्दल टॉमसन व डेव्हिसन यांना १९३७ चे भौतिकीचे नोबेल पारितोषिक विभागून देण्यात आले. टॉमसन हे सुप्रसिद्ध भौतिकीविज्ञ जे. जे. टॉमसन यांचे पुत्र होत.

त्यांचा जन्म केंब्रिज (इंग्लंड) येथे झाला व शिक्षण तेथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये झाले. १९१३ मध्ये पदवी संपादन केल्यावर काही काळ वडिलांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संशोधन केले. पहिल्या महायुद्धात फ्रान्समध्ये आघाडीवर काम केल्यावर त्यांनी फार्नबरो येथे वायुगतिकीसंबंधी संशोधन केले. १९१७–१८ मध्ये अमेरिकेस गेलेल्या ब्रिटिश युद्ध समितीचे ते सदस्य होते. तेथे काही दिवस त्यांनी आर्. ए. मिलिकन या प्रसिद्ध शास्त्रज्ञांच्या हाताखाली संशोधन केले. युद्ध संपल्यावर त्यांनी केंब्रिज येथे पुन्हा संशोधन सुरू केले व त्याच वेळी कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजात १९२२ पर्यत अध्यापन केले. पुढे ॲबर्डीन विद्यापीठात (१९२२–३०) व लंडन विद्यापीठाच्या इंपिरियल कॉलेजमध्ये (१९३०–५२) ते भौतिकीचे प्राध्यापक होते. दुसऱ्या महायुद्धात ते पुन्हा फार्नबरो येथे संशोधनासाठी गेले व त्याच वेळी पहिल्या ब्रिटिश अणुऊर्जा समितीच्या अध्यक्षपदावर त्यांची नेमणूक झाली. या समितीने अणुबाँबनिर्मितीच्या शक्यतेचा अहवाल तयार केला व टॉमसन यांनी तो अमेरिकेला सादर केला. १९४२ मध्ये हवाई खात्याच्या सल्लागार पदावर त्यांची नेमणूक झाली. ब्रिटिश अणुऊर्जा मंडळातर्फे औष्णिक अणुकेंद्रीय प्रक्रियांसंबंधी चाललेल्या संशोधनाचे ते सल्लागार होते. संयुक्त राष्ट्रांच्या अणुऊर्जा मंडळातील ब्रिटिश शिष्टमंडळाचेही ते सदस्य होते.

ॲबर्डीन येथे असताना टॉमसन यांनी धातूच्या अगदी पातळ पट्टिकांमधून जाणाऱ्या इलेक्ट्रॉनांचा अभ्यास करण्यासाठी अनेक प्रयोग केले आणि त्या आधारे इलेक्ट्रॉनाचे कणात्मक व तरंगीय असे दुहेरी स्वरूप प्रस्थापित केले. या प्रयोगांत इलेक्ट्रॉंनांच्या विवर्तनासाठी (पार्य वा आपार्य पदार्थाच्या कडेवरून जाताना होणाऱ्या दिशाबदलासाठी) त्यांनी वापरलेले तंत्र घन पदार्थांच्या पृष्ठभागांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरलेले आहे.

लंडनच्या रॉयल सोसायटीने १९३० मध्ये टॉमसन यांची सदस्य म्हणून निवड केली आणि त्यांना ह्यूज (१९३६) व रॉयल (१९४९) या पदकांचा सन्मान दिला. १९४३ मध्ये त्यांना‘नाइट’ हा किताब मिळाला. केंब्रिज येथील कॉर्पस ख्रिस्ती कॉलेजाचे १९५२–६२ या काळात ते मास्टर होते. इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (१९५८–६०) व ब्रिटिश ॲसोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स (१९५९–६०) या संस्थांचे ते अध्यक्ष होते. टॉमसन यांनी लिहिलेलेॲप्लाइडएरोडायनॅमिक्स (१९१९),वेव्ह मेकॅनिक्स ऑफ द फ्री इलेक्ट्रॉन (१९३०),द ॲटम (१९३० सहावी आवृत्ती, १९६२), थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ इलेक्ट्रॉनडिफ्रॅक्शन (डब्ल्यू. कॉक्रन यांच्याबरोबर, १९३९),द फोअरसिएबल फ्यूचर(१९५५),द इन्स्पिरेशन ऑफ सायन्स (१९६१) आणिजे. जे. टॉमसन अँड द कॅव्हेंडिश लॅबोरेटरी इन हिज डेज(१९६५) हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या वडिलांचाकंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी थ्रू गॅसेस(दोन खंड तिसरी आवृत्ती, १९२८–३३) हा ग्रंथ सुधारण्यासही मदत केली.

भदे, व. ग.